जातीयवाद आणि अखंड हिंदुस्थानचा सुवर्ण सूर्योदय !

‘हिंदु, हिंदुत्व, हिंदुस्थान, वैदिक संस्कृती आणि परंपरा लाभलेली, परमेश्वराचे अवतारस्थान, ऋषिमुनींचे तपस्थान, शूरविरांच्या परंपरेने अन् संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही पुण्यभूमी म्हणजेच भारतभूमी ! अगदी कितीही थोरवी गायली तरीही ती अल्पच आहे, अशा मायभूमीमध्ये आपण जन्माला आलो. किती ते भाग्य उजळावे आणि हे पुण्य आपल्या नशिबी यावे ! ‘पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरीचे दास जन्म घेती ।।’ (तुकाराम गाथा, अभंग ३२४१, ओवी १), म्हणजे ‘ज्या कुळात हरीचे दास जन्म घेतात, ते कुळ पवित्र आणि तो देश पवित्र आहेत.’ सूर्य तेजाने आपल्या सूर्यकिरणांना जन्म द्यावा आणि दुसरीकडे त्याच तेजाने आपापसांतील मतभेदाने आपले अमूल्य जीवन त्यागून द्यावे, अशी आजची समाजस्थिती आहे.

कु. उद्धव वैरट

१. इंग्रजांनी भारतात जात आणली !

सध्या अस्तित्त्वात असलेली, मोगल काळाच्या अंताकडे आणि ब्रिटिशांच्या (इंग्रजांच्या) कालखंडाच्या आरंभी ‘फोडा आणि राज्य करा’, अशा ब्रिटीश कुविचारातून भारतीय समाजामध्ये जातीव्यवस्था निर्माण झाली. अगदी १७ व्या शतकात पोर्तुगिजांकडून आलेला ‘कास्ट’ शब्द, म्हणजेच जात. जी जात नसावी; म्हणून तिचे नाव ‘जात’ असे असावे ! आधुनिकता आणि स्पर्धात्मक युगात आपण नवनवीन गोष्टींशी स्पर्धा करत असतांना हे कुठले ‘फॅड’ आपल्या विवेक विचारसरणीला ग्रहण लावत आहे ?, हे दैवच जाणो.

२. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी ‘भगवंतासमोर लहान-मोठे असे काहीही नसते’, असे सांगणे !

धर्मशास्त्र, वेदशास्त्र, संत साहित्याने नाकारलेली, अगदी दैवच ज्याला मानत नाही, ती ही जात. जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात,  ‘उंचनिंच नेणे कांहीं भगवंत । तिष्ठे भाव भक्ती देखोनियां ।।’ (तुकाराम गाथा, अभंग २८१०, ओवी १), म्हणजे ‘भक्त उच्च जातीचा आहे कि नीच जातीचा आहे, हे भगवंत पहात नाही. त्याचा शुद्ध भक्तीभाव पाहूनच देव त्याचे कार्य करण्यास तत्पर असतो’; पण आपणच ‘उच-नीच’ अशी द्वीअवस्था करून घेतली. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘आपण सर्व वैष्णवच आहोत, मग यात भेदाभेद कशासाठी ?’

३. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली एकीची प्रार्थना !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ‘‘भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ।।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९४), म्हणजे ‘प्राणीमात्रांची एकमेकांशी जीवाभावापासून मैत्री व्हावी.’

४. एकीची भावनाच जगाला सुखी ठेवील !

संतांनी अशा एक ना अनेक अभंगांतून जगाच्या उद्धारासाठी हे पवित्र व्रत हाती घेतले; पण समाजाने त्याकडे कानाडोळा केला. तथापि आज संत साहित्याचा महिमा गायला जात आहे. भगवंताच्या चरणीच जर उच-नीच चालत नसेल, तर ही विचारसरणी जाणार कधी ? आपणच आपल्या विचारसरणीला लावून घेतलेली ही जातरूपी कीड जाणार कधी ? प्रत्येक देहामध्ये भगवंताचा अंश पहाणार्‍या आपल्या संतपरंपरेला आपण लाथाडत आहोत का ? तरी काळाच्या ओघात विज्ञानाच्या या प्रयोगशील विद्यार्थीदशेत हेच विचार जरा मावळत्या दिशेने जातांना दिसतात. तरुणांमध्ये हाच विचार मित्रत्वभावाने मागे सारला आहे. कामगार वर्गापासून ते अगदी उच्च वर्गापर्यंत जातीची मुळे अत्यंत बळकट झालेली दिसतात. मग ते गावातील राजकारण असो किंवा तालुक्याचे. जोपर्यंत आपण सर्व एक आहोत आणि आपल्यातील वैरत्व भावाची निवृत्ती होऊन मित्रत्व भावनेची प्राप्ती होणार नाही, तोपर्यंत हे जग सुखी होणार नाही.

५. शासनकर्त्यांच्या जातीयवादात न अडकता अखंड हिंदुस्थानाचे सुवर्ण स्वप्न सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न करूया !

आपण जोपर्यंत हातात हात घालून कलियुगाला सामोरे जाणार नाही, तोपर्यंत आपला घात निश्चित आहे. आपण आपल्या वैदिक, सनातन, हिंदु परंपरेला, पुरोगामी विचार म्हणून मागे सारत आहोत कि काय ? पाश्चात्त्य विकृतीचा प्रभाव पहाता मराठी मनाने शासनकर्त्यांच्या जातीयवादामध्ये न अडकता सनातन अखंड हिंदुस्थानाचे सुवर्ण स्वप्न कसे सत्यात उतरेल ?, याचा विचार प्रामुख्याने करायला हवा.

६. जातीयवाद मुळासह नष्ट होणे अत्यंत आवश्यक !

‘अखंड हिंदुस्थान’ याचा अर्थ आम्ही केवळ हिंदुत्व जागृती आणि इतरांविषयी वैरत्वभाव असा मुळीच विचार नाही. गंगामाता, गोमाता, वेदमाता, जन्म देणारी माता, भूमाता, हिंदु देवतांना पूज्य मानणारा, महापुरुषांना आदर्श मानणारा कुणीही अहिंदु जरी असला, तरी तो आम्हाला हिंदूच आहे. या जागृती कार्यासाठी प्रथम जातीयवाद मुळासह नष्ट होणे अत्यंत अगत्याचे आहे.

७. आक्रमकांविरुद्धची लढाई ज्याप्रमाणे वज्रमुठीद्वारे जिंकलो, तशा वज्रमुठीची पुनरावृत्ती होणे आवश्यक !

वाढती अधर्मी हिंसक वृत्ती आणि त्याचे समाजावर होणारे आघात पहाता आपल्यातील हिंदुत्व जागे ठेवणे आवश्यक आहे. स्वराज्यावर कालौघात करून आलेली मोगलशाही, कुतुबशाही, आदिलशाही, पोर्तुगीज, इंग्रज या सर्व अपप्रवृत्तींविरुद्धची लढाई आपण शिवकाळात स्वराज्यातील १८ पगड जातींनी एकत्र वज्रमुठीद्वारे जिंकली, याच वज्रमुठीची पुनरावृत्ती होणे आवश्यक आहे.

याखेरीज समाजातील स्त्रीभ्रूण हत्या, गोहत्याबंदी, शासन, शैक्षणिक व्यवस्था, व्यसनमुती, प्रदूषण, बेरोजगारी असे प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी तरुणांची सदाचारी, निर्व्यसनी आणि विवेकशील फळी उभारण्याची आवश्यकता आहे.

८. युवकांनी धर्माचरणी आयुष्य जगावे !

‘‘धर्माचे पालन करणे पाखंड खंडन । हेचि  आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम ।।’’ या जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे धर्माचे पालन म्हणून युवकांनी धर्माचे आचरण करून विवेक विचारसरणीला प्राधान्य देऊन धर्माला साजेसे आयुष्य जगले पाहिजे.

९. हिंदूऐक्य राखून कार्य करणे आवश्यक !

एकंदरीत समाजाची सद्यःस्थिती पहाता ही गोष्ट अत्यंत गंभीर आणि प्रकर्षाने समाजात पसरली जात असून अखंड हिंदुस्तानाच्या सुवर्ण सूर्योदयासाठी आपण सर्वांनी ‘हे तो दैवी इच्छा’ समजून हिंदूऐक्य राखून कार्य करायला हवे. याच विचारांचा दिवा घरोघरी आणि मनामनांत अग्नी धारण करील, तेव्हा आपणच अखंड हिंदुस्थानच्या सुवर्ण सूर्योदयाचे साक्षीदार असू !’

– कु. उद्धव भानुदास वैरट, खजिनदार, व्यसनमुक्त युवा छावा संघ, महाराष्ट्र राज्य. (२५.३.२०२५)