‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची १०० वर्षे : उज्ज्वल राष्ट्रभक्तीचा निरंतर प्रवास !

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या स्थापनेचे शताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने…

एखाद्या स्वयंसेवी संघटनेने त्याच्या मूळ ध्येयापासून विचलित न होता आणि संघटनेत कुठल्याही प्रकारची शकले न होता शताब्दीकडे वाटचाल करणे, हाच मुळात एक विक्रम आहे; पण या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्धिष्णू (वाढत्या) कार्याचा आढावा घेणे हेही एक मोठे आव्हानच आहे ! मुळात संघाची शताब्दी ही गोष्ट रा.स्व. संघाचे संस्थापक सरसंघचालक पूजनीय डॉ. हेडगेवार यांच्या कल्पनेपेक्षा आणि अपेक्षेपेक्षा विपरित आहे. त्यांनी कायम ‘संघ ही समाजातील कृत्रिम व्यवस्था आहे आणि संघ अन् समाज हे जर एकरूप झाले, तर या व्यवस्थेची आवश्यकता उरणार नाही’, अशी मांडणी केली.

पू. माधव सदाशिवराव गोळवलकरगुरुजी

३० मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पू. डॉ. हेडगेवार यांचे रा.स्व. संघ स्थापनेपूर्वीचे चिंतन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना आणि पू. डॉ. हेडगेवार यांनी स्थापित केलेला आदर्श, पू. माधव सदाशिवराव गोळवलकरगुरुजी यांनी केलेल्या कार्यामुळे संघाची लोकप्रियता वाढणे अन् गांधी यांच्या हत्येनंतरच्या काळात संघाची अपकीर्ती रोखण्यासाठी पू. गोळवलकरगुरुजी यांनी केलेले यशस्वी कार्य’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

लेखाचा भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/897717.html

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रार्थना करताना

६. पू. गोळवलकरगुरुजी यांच्या दूरदृष्टीमुळे संघाचा विचार प्रभावी ठरणे

रा.स्व. संघ हा त्याच्या मूळ उद्देशापासून भरकटला नाही आणि टिकून राहिला, याचे श्रेय निश्चितच पू. गोळवलकरगुरुजी यांच्या नेतृत्वाला द्यावे लागेल. याच काळात संघ विचारांची वाटचाल विविध क्षेत्रांत चालू झाली. विद्यार्थी, कामगार, शिक्षण, वनवासी, राजकीय, धार्मिक अशा सर्व क्षेत्रांत संघाची दमदार वाटचाल चालू झाली. आज सर्व समाजजीवनात संघाचा विचार प्रभावी ठरत आहे, यामागे पू. गुरुजींची दूरदृष्टी कारणीभूत आहे, असे म्हणावे लागेल. चीनपासून असणारा धोका, भाषावार प्रांतरचना, सीमेकडे दुर्लक्ष, घुसखोरांचा धोका याविषयी त्याकाळी त्यांनी केलेले मूलभूत चिंतन दुर्दैवाने शासनकर्ते म्हणवणार्‍यांनी दुर्लक्षित केले. त्याचे परिणाम आम्ही आज दीर्घकाळ बघत आलो आहोत.

पू. बाळासाहेब देवरस

७. इंदिरा गांधी यांच्या काळात पुन्हा एकदा संघावर बंदी लादली जाणे आणि त्यातून बाहेर पडून जोमाने कार्य चालू होणे

मा. बाळासाहेब देवरस यांची ‘उत्तराधिकारी’ म्हणून नियुक्ती करून पू. गोळवलकरगुरुजी यांनी देहत्याग केला. पू. बाळासाहेब यांनाही लगेचच संघाच्या बंदीला तोंड द्यावे लागले. या वेळी निमित्त होते इंदिराजींचे स्वतःची सत्ता टिकवण्याचे. पुन्हा एकदा सत्याग्रह करत आणि भूमीगत होऊन समाज जागृती करत संघाच्या स्वयंसेवकांनी या अन्यायाविरुद्ध दाद मागितली. अनुमाने १९ मास चाललेला लढा यशस्वी पार पडल्यावर त्यातील संघाची प्रमुख भूमिका लक्षात घेता अनेकांनी ‘संघाने थेट राजकीय कार्यात उतरावे, विसर्जित व्हावे’, असे आग्रह केला; पण संघाचे नेतृत्व विचलित झाले नाही आणि संघाने पुन्हा आपल्या व्यक्तीनिर्मितीचे कार्य जोमाने चालू केले.

श्री. रवींद्र मुळे

८. जातीव्यवस्था दूर करण्याविषयी पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी मांडलेली भूमिका

याच वेळी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे जे भाषण झाले, त्याने संघस्वयंसेवकांना एक नवी दिशा मिळाली. ‘अस्पृश्यतेची प्रथा जर वाईट नसेल, तर जगात कुठलीच गोष्ट वाईट नाही आणि म्हणून अशा कुप्रथा समाजाने झिडकारल्या पाहिजेत’, असे वक्तव्य त्यांनी व्याख्यानमालेत केले.

संघाला ‘जातीव्यवस्थेचे आणि चातुर्वर्ण्य सिद्धांताचे पुरस्कर्ते मानणारे’, तसा प्रचार जाणीवपूर्वक  करणारे अन् त्यामुळे दलित बंधू, वनवासी, तसेच बहुजन समाज याला हिंदुत्वाच्या विचारांपासून दूर ठेवणार्‍या मंडळींना जबरदस्त चपराक मिळाली. अर्थात् ही भूमिका प्रगट करण्याची संधी जाहीरपणे सरसंघचालकांना जरी आता मिळाली होती, तरी संघाची अंगभूत भूमिकाच ती होती. केवळ ती भूमिका प्रत्यक्षात आणण्याची कार्यपद्धत लोकांच्या लक्षात येत नव्हती.

९. पू. बाळासाहेब देवरस यांच्या भूमिकेमुळे जनजाती आणि उपेक्षित वस्तीतील लोक संघाजवळ येणे

पुढील १४ वर्षे संघाच्या एकूण प्रवासातील सर्वांत गतिमान वर्षे होती. पू. गोळवलकरगुरुजींच्या काळात संवर्धित झालेली शक्ती पू. बाळासाहेब देवरस यांनी जनजागरणासाठी अत्यंत कौशल्याने उपयोगात आणली. पू. बाळासाहेब हे पू. डॉ. हेडगेवार यांच्या पहिल्या फळीतील स्वयंसेवक ! त्यांच्या वागण्या, बोलण्यावर पू. डॉ. हेडगेवार यांचा प्रभाव असायचा. पू. गोळवलकरगुरुजी तर त्यांना ‘खरे सरसंघचालक’ असे म्हणायचे ! वर्ष १९८० च्या ‘जनजागरण अभियाना’च्या नंतर गंगाजल यात्रेमुळे हिंदु समाजातील वातावरण ढवळून निघाले. पू. बाळासाहेबांनी वसंत व्याख्यानमालेत केलेल्या वक्तव्याला गतीशील कृतीची जोड दिली. यासह वर्ष १९८९ मध्ये पू. डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने सेवाकार्याचे एक मोठे जाळे विणण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली. त्यातून जनजाती आणि उपेक्षित वस्तीतील बंधू वेगाने संघाच्या जवळ येऊ लागले.

१०. वर्ष १९८४ ते वर्ष २००६ या काळात संघाने राबवलेल्या मोहिमांमुळे कार्य गतीमान होणे

हिंदुजागृतीच्या या प्रयत्नांना वर्ष १९८४ मध्ये चालू झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनाने निर्णायक भूमिका बजावली. रामशीला पूजन, रामज्योत यात्रा आणि शेवटची कारसेवा (बाबरी ढाचा पाडण्यासाठी केलेले अभियान) याने भारतातील हिंदु जनमानस पालटण्यास प्रारंभ झाला. माध्यमे, विचारवंत आणि राजकीय नेतृत्व यांच्यामध्ये हिंदुत्वाकडे बघण्याच्या  दृष्टीकोनात मोठा पालट झाला. वर्ष १९४७ नंतर हिंदुत्वाच्या भूमिकेचे राजकीय क्षेत्रात यशस्वीपणे प्रस्थापित होण्यास प्रारंभ झाला. हिंदुत्वाचा सामाजिक आणि राजकीय आशय समाजात पोचण्यास या सर्व घटनांमुळे साहाय्य झाले.

वर्ष १९९२ नंतर संघाच्या कामात संपर्क, प्रचार आणि सेवा या कार्यविभागाची वाढ झाली अन् संघ, तसेच समाज यांतील अंतर न्यून होण्यास प्रारंभ झाला. संघाला समजून घेण्यास उत्सुक असणार्‍या सर्वांना यातून एक माध्यम मिळाले आणि संघ अधिक लोकप्रिय होऊ लागला. पू. रज्जूभैया आणि पू. सुदर्शनजी यांच्या रूपाने संघाला प्रथमच महाराष्ट्राच्या बाहेरचे नेतृत्व मिळाले होते अन् काही प्रमाणात संघाचे अखिल भारतीय स्वरूप हे सिद्ध होत होते. संघाने वर्ष २००९ पर्यंतच्या काळात अधिक गतीने आपल्या कार्यवाढीसाठी प्रयत्न केले. यात २ महत्त्वाचे टप्पे आले. एक म्हणजे संघाला पूर्ण झालेली ७५ वर्षे आणि दुसरे म्हणजे पू. गोळवलकरगुरुजी यांची जन्मशताब्दी !

वर्ष २००० मध्ये संघाने ‘राष्ट्रजागरण अभियान’ राबवतांना घरोघरी पोचण्यासाठी योजना आखली आणि पुन्हा एकदा हिंदु जनमानस ढवळून निघाले. वर्ष २००६ ची पू. गोळवलकरगुरुजी जन्मशताब्दी संघकार्याला गतीमान करण्यासाठी पर्वणी ठरली. सर्व मंडलस्थानी पोचणे, बौद्धिक परिसंवाद, सद्भावना मेळावे अशा विविध कार्यक्रमांतून संघाने हिंदुत्व, समरसता आणि सद्भावना यांचे जागरण केले.

या काळात दोन राजकीय स्थित्यंतरे अनुभवायला मिळाली. देशाच्या सर्वोच्च स्थानी एका स्वयंसेवकाचे स्थापित होणे, हे जुन्या पिढीतील अनेक कार्यकर्त्यांना समाधान देणारे होते ! संघाचे कार्य राजकीय परिवर्तनासाठी नसले, तरी हिंदुत्वाच्या विचारांचा माणूस राजकीय क्षेत्रात यशस्वी होणे, ही गोष्ट या विचारधारा मानणार्‍या मंडळींना सुखावणारी होती.

पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

११. काँग्रेस सरकारने संघ आणि हिंदुत्व यांचे विचार चिरडण्याचा केलेला प्रयत्न अन् डॉ. मोहन भागवत यांची ‘सरसंघचालक’पदी नियुक्ती

पुढे मात्र वर्ष २००४ मध्ये झालेले राजकीय परिवर्तन हे अनेक आव्हाने निर्माण करणारे ठरले. संघ आणि हिंदुत्व यांचे विचार चिरडून टाकण्याच्या उद्देशाने पेटलेल्या साम्यवादी विचाराने पाठिंबा दिलेल्या अन् काँग्रेस प्रणित सरकारने पद्धतशीरपणे अनेक कटकारस्थाने रचत हिंदु नेत्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्यास प्रारंभ केला. हिंदु नेते, संत, महंत यांची समाजातील प्रतिमा बिघडवायची आणि मुसलमान, तसेच ख्रिस्ती यांचे लांगूनचालन करायचे, ‘हिंदु आतंकवाद’ किंवा ‘भगवा आतंकवाद’ असे शब्द रूढ करत हिंदुत्वाची चळवळ संपवण्याचे कटकारस्थान रचले गेले होते. या परिस्थितीमध्ये संघाचे पू. सरसंघचालक म्हणून डॉ. मोहन भागवत यांची नियुक्ती सुदर्शनजी यांनी केली आणि ते निवृत्त झाले.

वर्ष २००९ च्या निवडणुकीनंतर हिंदु श्रद्धा आणि हिंदु संघटना यांच्यावर अधिक गतीने आघात चालू झाले. असीमानंद आणि इंद्रेश कुमार यांच्यावर थेट आरोप झाले अन् पुन्हा एकदा हिंदुत्वाची चळवळ बचावाच्या भूमिकेत जाते कि काय ? अशी स्थिती होती. गोध्रा जळीत कांड त्या पाठोपाठ झालेली गुजरात दंगल ही हिंदु विचारधारेला एकप्रकारे धडा शिकवणारी गोष्ट होती; पण याच पार्श्वभूमीवर एक राजकीय नेतृत्व उदयास येत होते आणि हिंदुत्व अन् विकास या दोन आधारावर यशस्वी राजकारण, तसेच समाजकारण होऊ शकते, हे यातून हिंदु समाजाला दिसत होते.

१२. समाज परिवर्तनाचे कार्य आणि तत्कालीन राजकीय परिस्थिती

संघाचे नेतृत्व या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते आणि त्याच वेळेस संघाच्या कार्याला नवीन आयामांची जोड देण्याचे प्रयत्नही चालू होते. संघटन आणि जागरण यांसह संघात गतीविधी आयाम जोडले गेले. समाज परिवर्तनाच्या कामात संघ आता या माध्यमातून थेट उतरला होता. ग्रामविकास, धर्म जागरण, सद्भावना आणि समरसता हे विषय या माध्यमातून स्वयंसेवकांनी पुढे नेण्यास प्रारंभ केले. अनेक स्वयंसेवक आणि समाजातील सहभागी होऊ इच्छिणारे घटक यांना यामुळे काम करण्याची संधी मिळत होती. तरीसुद्धा समाजातील अनुकूलतेला राजकीय परिवर्तनाची आवश्यकता होती; कारण काही गोष्टी पुष्कळ टोकाला जाण्यास प्रारंभ झाला होता. काश्मीरचा भूभाग भारतापासून स्वतंत्र करण्याचा मनसुबाच तत्कालीन सरकारने घेतला होता. रामजन्मभूमीचा लढा जाणीवपूर्वक न्यायालयीन प्रक्रियेत अडकवला गेला होता. व्यापारासाठी ‘रामसेतू’ उध्वस्त करण्याची सिद्धता चालू होती. आतंकवाद्यांचे उदात्तीकरण होत होते आणि त्यातून जिहादी कारवाया वाढत होत्या. अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अशा दोन्ही दृष्टीने देश संकटात होता.

१३. संघाने केलेल्या प्रयत्नांमुळे देशात राजकीय परिवर्तन होणे

संघाचा राजकीय परिवर्तनापेक्षा समाज परिवर्तनावर विश्वास आहे; पण प्रसंगी देशहितासाठी संघाची भूमिका लवचिक बनू शकते, हे एकदा वर्ष १९७७ मध्ये संघाने दाखवून दिले होते आणि स्वतःच्या शक्तीचा प्रभाव दाखवून दिला होता. वरील सर्व पार्श्वभूमीवर जेव्हा वर्ष २०१४ ची निवडणूक आल्यावर प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘सर्वांनी मतदान करावे आणि १०० टक्के मतदानासाठी स्वयंसेवकांना प्रबोधन करण्याचा मंत्र दिला.’ कुठल्याही नेत्यांचे किंवा पक्षाचे नाव न घेता केलेले आवाहन आणि त्यासाठी आखलेली योजना अभूतपूर्व ठरली. मतदानाची टक्केवारी प्रचंड वाढली आणि देशाच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण बहुमताने काँग्रेसेतर सरकार सत्तेत आले. हेच नाही, तर वर्ष २०१९ ला अधिक बहुमताने सरकार निवडून आले.

बर्‍याच वेळा संघाच्या अनुकूल काळाची सांगड राजकीय परिवर्तनाच्या घटनेशी जोडली जाते; पण वस्तूस्थिती तशी नाही; कारण मुळात संघाने अथक प्रयत्नातून आपल्या कार्यपद्धतीत पालट करतांना दाखवलेला लवचिकपणा, त्यातून समाजमानसात झालेला पालट आणि संघाच्या विचारविश्वातून प्राणवायू घेत संघ स्वयंसेवकांनी उभ्या केलेल्या विविध क्षेत्रांचा पडलेला प्रभाव याचा स्वाभाविक परिणाम राजकीय परिवर्तनात झाला आहे.

१४. संघाच्या प्रचार विभागाच्या माध्यमातून विविध विषय हाताळल्याने तो देशाच्या केंद्रस्थानी येणे

‘संघाने राजकीय परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावली’, असे सकृतदर्शनी दिसत असले, तरी आणि ते काही प्रमाणात सत्य असले, तरी संघ त्यातच गुंतून राहिलेला नाही. संघाचे ध्येय देशाला परम वैभवाला नेण्याचे आहे आणि ते सत्तेच्या बळावर नव्हे, तर समाज शक्तीच्या बळावर होय ! म्हणूनच गेल्या १० वर्षांत संघाने अधिक गतीमान होत संघकार्य पुढे नेले आहे. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक मान्यवर लोकांना भेटण्याचा नित्यक्रम संघाने चालू केला आहे. प्रचार विभागाच्या पुढाकारातून सर्व प्रकारची माध्यमे हाताळली जात आहेत. विविध सेवाकार्ये आणि प्रकल्प समाज परिवर्तनाचे काम करत आहेत. गतीविधींमध्ये वर उल्लेख केलेल्या व्यतिरिक्त कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, गोविज्ञान, जलसंधारण, असे विविध विषय हाताळले जात आहेत. या सर्व कामातून संघ आता ग्रामीण, शहरी अशा सर्व भागांत अराष्ट्रीय वृत्तींना आव्हान देत उभा ठाकला आहे. गेल्या १०० वर्षात चेहरा, नाव नसलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून उभा राहिलेला संघ हा खर्‍या अर्थाने देशाच्या केंद्रस्थानी आला आहे.

१५. संघाचे पुढील ध्येय आणि पंचसूत्री

असे असले, तरी या सर्व परिस्थितीमध्ये संघाला केवळ स्वतःचा उदो उदो करण्यात बिलकुल स्वारस्य नाही. काश्मीरचा काही अंशी सुटलेला प्रश्न, राममंदिर निर्मिती दृष्टीपथात आलेले स्वप्न, देशात ‘आत्मनिर्भर भारता’च्या दृष्टीने चाललेली वाटचाल हे सर्व स्वयंसेवकांना आणि नेतृत्वाला समाधान देणारे आहे. ‘तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे’, याची संघ नेतृत्वाला जाणीव आहे. ‘ब्रेकिंग इंडिया’वर (देश तोडू पहाणार्‍यांवर) काम करणार्‍यांनी अजून हार मानलेली नाही, हे अलीकडील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वरील कारवाईतून उघडकीस येणार्‍या गोष्टीतून सिद्ध होत आहे. राष्ट्रविरोधी शक्ती या देशात अजून अस्तित्वात आहेत आणि त्यांना तर काही आंतरराष्ट्रीय समुदायांकडूनही आता पुरस्कृत केले जात आहे. शहरी माओवाद देशात पसरत आहे. काही विद्रोही म्हणवणार्‍या आणि वैचारिक आव आणणार्‍या चळवळी समाजातील अनुसूचित जाती, जमाती यांच्यात चुकीचे कथन प्रस्तुत करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहापासून तोडण्याचे काम करत आहेत. देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा बिघडवण्यात धन्यता मानणारे राजकीय पक्ष दुर्दैवाने देशहितापेक्षा तात्कालिक राजकीय लाभाचा विचार करत आहेत.

संघाने येणार्‍या शताब्दी वर्षात पंचसूत्रीवर वाटचाल करायचे ठरवले आहे. कुटुंब प्रबोधन, समरस समाज, नागरी शिष्टाचार, पर्यावरण आणि स्वबोध या आधारावर संघाची पुढील वाटचाल होणार आहे. यादृष्टीने येणारे संघाचे शताब्दी वर्ष आणि देशाच्या स्वातंत्र्याची वर्ष २०४७ मध्ये होणारी शतकपूर्ती या दोन्ही गोष्टी देश, समाज अन् संघ यांना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. क्रिकेटच्या भाषेत १९ वे षटक चालू झाले आहे. संघाला पुढील काळात सर्व समाजाला स्वतःसमवेत घेऊन ही वाटचाल करायची आहे. त्यामुळे एकांगी टीका करणारे किंवा ज्यांची राजकीय आवश्यकता म्हणून संघाला शिव्याशाप देणारे या सर्व मंडळींनी प्रामाणिकपणे संघकार्य समजून घेण्याची आवश्यकता आहे. १०० वर्षांची वाटचाल हा काही केवळ योगायोग नाही, तर राष्ट्र आराधनेचा अखंड धगधगणारा यज्ञ आहे, ज्या यज्ञाच्या ज्वाळेतून संपूर्ण आसमंत हे भारून गेले आहे. त्यात राष्ट्रविरोधी विषारी कीटकांचे नष्ट होणे अपरिहार्य आहे. आपण आपल्या परीने या यज्ञात समिधा वाहण्यास सिद्ध होऊया !

(समाप्त)

– श्री. रवींद्र मुळे, नगर. (२९.३.२०२५)