अशा राजाला सदैव हृदयात स्मरू ।

पराक्रमास त्या सीमा नसे,
राजा माझा ‘मेरू’सम भासे ।
धर्मवीर संभाजी महाराज,
छत्रपती शिवरायांचीच
प्रतिमा दिसे ॥ १ ॥

कु. अपाला औंधकर

हरपली जरी मातृछाया,
आई भवानीची असे अखंड कृपा ।
राजमाता जिजाऊ घडवी
भोसले वंशाच्या कुलदीपा ॥ २ ॥

सिंहाचा जबडा फाडिला,
होय, खर्‍या सिंहाचा जबडा फाडिला ।
छत्रपती शिवरायांचा छावा
खर्‍या छाव्यास भारी पडला ॥ ३ ॥

कणांकणात असे स्वराज्य भक्ती,
बाहूंमध्ये असे प्रचंड शक्ती ।
अखेर सापडे त्या औरंग्यास,
कटू वाटे काळाची नीती ॥ ४ ॥

असा युद्धवीर पुन्हा होणे नव्हे,
यमयातना भोगूनी आनंदे ‘जगदंब, जगदंब’ म्हणे ।
गुणगान करावे तयाचे सहस्रोमुखे,
‘जगदंब’ जयजयकार गरजे अवघे ॥ ५ ॥

असे हे अनाकलनीय बलीदान तयाचे,
समर्पणाचा शिरोमणी, त्यागाचा कळस ।
सकल रयतेचा उद्धारू,
अशा राजाला सदैव हृदयात स्मरू ॥ ६ ॥

छत्रपती संभाजी महाराज यांचे बलीदान प्रत्येक हिंदूच्या केवळ डोळ्यांत पाणी आणणारे नव्हे, तर डोळे उघडणारे आहे. त्यांच्या धर्माभिमानास आणि बलीदानास स्मरून त्यांच्या चरणी हे काव्य अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करते.

– कु. अपाला औंधकर, फोंडा, गोवा. (२७.३.२०२५)