|
मुंबई, १४ डिसेंबर (वार्ता.) – शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केंद्राचे शेतकरीविरोधी कायदे रहित करण्याचा विषय विधान परिषदेत मांडला. ते म्हणाले, ‘‘हे कायदे रहित होण्यासाठी देहली येथे लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. छत्तीसगड सरकारने काही कायदे केले, तसे कायदे राज्यातील सरकारने करावेत; मात्र राज्यात केंद्राच्या कायद्यांची कार्यवाही करू नये.’’ त्या संदर्भातील विधेयक दोन्ही सभागृहांत मांडण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या मागणीला विरोधकांनी विरोध करून सभागृहात गदारोळ केला. विरोधकांनी काही वेळ जयंत पाटील यांना रोखून धरले, तसेच जोरदार घोषणा दिल्या. यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधान परिषदेचे कामकाज ५ मिनिटांसाठी स्थगित केेले.
१. प्रथम विधान परिषदेच्या कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणाचे सूत्र उपस्थित करून सरकारला धारेवर धरले. कामकाज सल्लागार समितीत आपणच विषय ठरवले असल्याने २ दिवस अधिवेशन वाढवावे, अशी मागणी त्यांनी केली; मात्र सभापती रामराजे निंबाळकर यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली.
२. नवीन कृषी कायद्यांविषयी आमदार जयंत पाटील म्हणाले की, हे ३ कायदे शेतकरीविरोधी आहेत. महाआघाडी सरकारने हा कायदा राज्यात लागू करणार नसल्याचे घोषित केले आहे. शेतीविषयक कायदे करण्याचा अधिकार राज्याला आहे. कोणत्याही राज्यांकडून मागणी केली नसतांना केंद्राने परस्पर लोकसभेत आणि राज्यसभेत कोणतीही चर्चा न करता ही विधयके संमत केली; मात्र हे कायदे शेतकरीविरोधी आहेत.
३.विधान परिषदेच्या सभागृहात बिहार आणि अरुणाचल प्रदेश यांचे माजी राज्यपाल अन् विधान परिषदेचे माजी सदस्य राम प्रधान, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, माजी सदस्य संदेश कोंडविलकर यांच्या निधनाविषयी शोक प्रस्ताव मांडून त्यांना श्रद्धांजली वहाण्यात आली.