पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घाला ! – सुफी इस्लामिक बोर्डाची पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी

  • बंदी न घातल्यास आंदोलन करणार !

  • ‘स्वर्गात ७२ पर्‍या मिळतील’, असे आमीष दाखवून मुसलमान तरुणांना जिहादसाठी प्रेरित करण्याचा आरोप

  • पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक देशविरोधी कारवाया आतापर्यंत उघड झालेल्या असतांना केंद्र सरकारकडून तिच्यावर बंदी न घालणे, हे आश्‍चर्यजनकच होय !
  • हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी संघटनांकडून आतापर्यंत या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी होत असतांना आता मुसलमानांच्या धार्मिक संघटनेकडून अशी मागणी होत आहे, हे केंद्र सरकारने लक्षात घेऊन लवकरात लवकर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातली पाहिजे !

नवी देहली – सुफी इस्लामिक बोर्ड या मुसलमान संघटनेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंसूर खान आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुफी महंमद कौसर हसन मजीदी यांनी पी.एफ्.आय.वर देशभरात बंदी घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. ‘जर या संघटनेवर बंदी घातली नाही, तर आम्ही आंदोलन करू’, असे या पत्रात म्हटले आहे.

१. बोर्डाचे राष्ट्रीय सरचिटणीस शाह सय्यद हसनैन बकाई यांनी आरोप केला आहे की, पी.एफ्.आय. त्याची राजकीय शाखा असणार्‍या एस्.डी.पी.आय.च्या माध्यमातून मुसलमान तरुणांची दिशाभूल करत आहे. जिहादच्या नावाखाली ७२ पर्‍यांचे आमीष दाखवून त्यांना देशविरोधी कारवाई करण्यासाठी जुंपले जात आहे. ही संघटना आतंकवादी निर्माण करण्याची शाळा आहे. या संघटनेचे संबंध इस्लामिक स्टेटशी आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

२. बोर्डाचे अध्यक्ष मंसूर खान यांनी सांगितले की, पी.एफ्.आय.शी संबंधित लोक अल् कायदाशी संबंधित सघटनांच्या बैठकांमध्ये सहभागी होत असतात. प्रशिक्षण केंद्र, अपहरण, खंडणीसाठी हत्या, रा.स्व. संघ आणि माकप यांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या, बेंगळुरू दंगल यांमध्ये या संघटनेचा हात असल्याचे समोर आले आहे. पी.एफ्.आय. त्याच्या छुप्या धोरणाद्वारे तुर्कस्तानच्या विभाजनकारी योजनेला भारतीय उपखंडामध्ये पसरवू इच्छित आहे. यामुळेच वर्ष २०१६ मध्ये तुर्कस्तानचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी बंडखोरी करत सत्ता हस्तगत केल्याचे पी.एफ्.आय.ने प्रसिद्धीपत्रक काढून अभिनंदन केले होते. कर्नाटकच्या दंगलीची चौकशी करणार्‍या पोलिसांनी ४८ ठिकाणी धाडी घातल्या. त्यातील एस्.डी.पी.आय.च्या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे हस्तगत करण्यात आली. अल् कायदा संघटनेचे समर्थन करणारी तुर्कस्तानमधील आय.एच्.एच्. या संघटनेशी पी.एफ्.आय.चे संबंध आहेत. पी.एफ्.आय. तिच्या ७३ बँक खात्यांमध्ये जमा झालेल्या १२० कोटी रुपयांचा देशविरोधी कारवायांसाठी खर्च करत आहे.

सुफी इस्लामिक बोर्डाने लिहिलेले पत्र वाचण्यासाठी चित्रांवर क्लिक करा – 

३. ऑल इंडिया सुफी सज्जादानशीं काऊंसिलचे सरचिटणीस सय्यद फरीद अहमद निजामी यांनी देहलीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना पत्र पाठवून पी.एफ्.आय.शी त्यांच्या संघटनेचे संबंध असल्याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. काही दिवसांपूर्वी या संघटनेचे पी.एफ्.आय.शी संबंध असल्याचा आरोप झाला होता. निजामी यांनी म्हटले की, पी.एफ्.आय.सारख्या संघटनांची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी स्वतःहून संघटनेविषयीची माहिती उघडपणे सांगितली पाहिजे. ज्या संघटना धर्माचा वापर करून कट्टरता पसरवत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे.