१. रोहिंग्या मुली २०,००० ते १ लाख रुपयांना विकल्या जात आहेत !
५२ वर्षीय अफझल यांचे कुटुंब बर्याच दिवसांपासून लग्नासाठी मुलगी शोधत होते; पण त्यांना मुलगी सापडली नाही. अचानक एके दिवशी शेजारच्या लोकांना कळले की, त्याचे लग्न झाले आहे. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले, तेव्हा ती मुलगी रोहिंग्या असल्याचे निष्पन्न झाले. कुणीतरी त्या मुलीला काश्मीरमध्ये २०,००० रुपयांना विकले. जम्मू आणि काश्मीरमध्ये अशी अनेक प्रकरणे पहायला मिळत आहेत.
या प्रकरणाच्या एक दिवस आधी कोलकाता येथील रेल्वे पोलिसांनी अब्दुल रहमान नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. तो बांगलादेशातील रोहिंग्या मुसलमान आहे आणि अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये कामगार म्हणून काम करत आहे. त्याच्यासह अनुमाने १२ वर्षांच्या २ मुली होत्या, ज्यांना तो त्याच्यासह काश्मीरला घेऊन जात होता. या मुली भाग्यवान होत्या की, पोलिसांना सुगावा लागला; परंतु प्रतिदिन अशा अनेक रोहिंग्या मुलींना जम्मू-काश्मीरसह देशातील अनेक राज्यांमध्ये बेकायदेशीरपणे आणले जात आहे आणि त्यांच्या संमतीविना त्यांना बळजोरीने ‘वधू’ बनवले जात आहे.
हे रॅकेट जम्मू आणि काश्मीर येथे बर्याच काळापासून चालू आहे. आधी बांगलादेश आणि आता म्यानमार येथूनही रोहिंग्या मुलींना खोटी आश्वासने अन् स्वप्ने दाखवून येथे आणले जाते. नंतर तिचे लग्न तिच्या दुप्पट वयाच्या पुरुषाशी होते. इतकेच नाही, तर जम्मू आणि काश्मीरमध्ये लग्न करू न शकणारे अपंग किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग लोकही या बेकायदेशीर मार्गाने वधू खरेदी करत आहेत. गेल्या मासातच जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अशा अनेक समुहांची ओळख पटवली होती, जे स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली हे काम करत होते. प्रशासनाच्या मते डिसेंबर २०२४ पर्यंत जम्मूमध्ये किमान २४ आणि काश्मीरमध्ये १२४ रोहिंग्या मुली ‘वधू’ बनल्या आहेत. तज्ञांच्या मते जम्मू आणि काश्मीरसाठी ही धोकादायक परिस्थिती असू शकते. याचा अपलाभ पाकिस्तान घेऊ शकतो.
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा हस्तक्षेप थांबला पाहिजे ! – एस्.पी. वैद, माजी पोलीस महासंचालक, जम्मू-काश्मीरही परिस्थिती योग्य नाही. आपण त्यांना परत पाठवले पाहिजे. भारत धर्मशाळा नाही. जम्मू-काश्मीरमध्ये रोहिंग्यांची संख्या झपाट्याने वाढणे, हे योग्य नाही. आपणही अमेरिका आणि युरोप या देशांप्रमाणे कठोर पावले उचलली पाहिजेत. विशेषतः संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा हस्तक्षेप पूर्णपणे थांबवला पाहिजे. सध्या देशभरात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांची संख्या वाढत आहे. या घुसखोरांना कशा प्रकारे वसवले जाते ? रोहिंग्या मुसलमान मुलींची विक्री करून त्यांचा कशा प्रकारे छळ करण्यात येत आहे आणि यामागे असलेले षड्यंत्र याचा उहापोह या लेखात करण्यात आला आहे. |
२. ही परिस्थिती धोकादायक का आहे ?
१५ वर्षांपूर्वी जम्मूमध्ये २०० रोहिंग्या मुसलमान होते. सध्या ११,००० पेक्षा अधिक रोहिंग्या असल्याचे अनुमान आहे. त्यांच्या वस्त्या लष्करी छावण्या, रेल्वेस्थानक, पोलीस वसाहत इत्यादी संवेदनशील भागांजवळही आहेत. मानवी तस्करी, अमली पदार्थांची तस्करी आणि इतर अनेक गुन्हे यांमध्ये रोहिंग्यांचा सहभाग असल्याचे आरोप होत आहेत. जम्मू-काश्मीरमधील रोहिंग्यांच्या वाढत्या संख्येचा अपलाभ पाकिस्तान घेऊ शकतो.
३. रोहिंग्यांचे ‘रॅकेट’ (जाळे) कसे काम करते ?
चांगल्या आयुष्याच्या शोधात अनेक मुलींनी स्वतःचे जीवन कायमचे नरक बनवले आहे. बांगलादेश आणि म्यानमार येथील रोहिंग्या वस्त्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली तस्कर मुलींची ओळख पटवतात. ते तरुण मुलींवर बारीक लक्ष ठेवतात. ‘कोलकाता, गुवाहाटी यांसारख्या शहरात नोकर्या दिल्या जातील’, अशी फसवणूक त्या मुलींची केली जाते. मग त्यांना गुप्तपणे बस आणि रेल्वे यांमधून जम्मू-काश्मीर किंवा इतर राज्यात नेले जाते. मग या मुली विकल्या जातात. मानवी तस्करीत सहभागी असलेले लोक सर्वत्र पसरलेले आहेत. विशेषतः जिथे रोहिंग्या मुसलमानांच्या वस्त्या आहेत. तस्कर बंगाल, आसाम आणि त्रिपुरा मार्गे मुलींना बेकायदेशीरपणे भारतात आणतात. मग येथून त्या देशातील वेगवेगळ्या राज्यात पाठवल्या जातात. आसाम पोलिसांनी अलीकडेच याविषयी चिंता व्यक्त केली होती. पोलिसांच्या मते रोहिंग्या विशेषतः जम्मू-काश्मीर, देहली, चेन्नई, भाग्यनगर आणि केरळ येथे जातात.
४. शिधापत्रिका, आधार कार्ड सर्रास उपलब्ध करून दिले जाणे
रोहिंग्या मुसलमानांना शिधापत्रिकापासून बेकायदेशीरपणे बनवलेल्या आधार कार्डपर्यंत सर्व काही मिळत आहे. रोहिंग्या जम्मू-काश्मीरमधील त्यांच्या मुलींशी लग्न करून तेथील नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या डिसेंबरमध्येच पोलिसांना जम्मूमध्ये ६१ हून अधिक आणि काश्मीरमध्ये ९७ आधार कार्ड सापडले. हे सर्व आधार कार्ड बेकायदेशीरपणे बनवले गेले होते. जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस्.पी. वैद यांच्या मते रोहिंग्या मुलींचे स्थानिक लोकांशी लग्न बर्याच काळापासून होत आहे. हे काश्मीरपेक्षा जम्मूमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
५. रोहिंग्या महिला विविध अत्याचारांना जात आहेत सामोर्या !
बांगलादेश आणि म्यानमार येथील रोहिंग्या मुसलमानांची परिस्थिती आधीच चांगली नाही. अलीकडच्या राजकीय घडामोडींनंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत चांगल्या जीवनाच्या शोधात असलेल्या रोहिंग्या महिला अशा जाळ्यात अडकत आहेत ज्यातून बाहेर पडणे त्यांच्यासाठी कठीण होते. ‘अल-जझीरा’ने त्यांच्या एका वृत्तात अशाच काही महिलांच्या कहाण्या ऐकल्या.
त्यांची कहाणी अंगावर काटा आणणारी आहे. एका महिलेचे म्हणणे आहे, ‘तिला सांगण्यात आले होते की, तिला बंगालमध्ये नोकरी दिली जाईल. मग बस आणि रेल्वे यांचा बराच प्रवास केल्यानंतर आम्हाला काश्मीरला आणले. तिचे लग्न तिच्यापेक्षा तिप्पट वयाच्या पुरुषाशी झाले होते. मी परत जाण्याविषयी बोलले, तर माझा नवरा मला पुष्कळ मारहाण करतो.’ तस्करांच्या तावडीत अडकलेल्या अशाच आणखी एका महिलेने सांगितले, ‘तिला तस्करांनी ओलीस ठेवले होते. शौचालयातही जाऊ दिले जात नव्हते. त्याला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली आणि पुष्कळ चालायला लावण्यात आले.’
६. पहिला रोहिंग्या कोण होता ?
वर्ष २००९ मध्ये पहिल्यांदाच रोहिंग्या जम्मू-काश्मीरमध्ये येऊ लागले. देशात एकेकाळी २०० असलेली ही संख्या आता ५० सहस्रांच्या पुढे गेली आहे. एकट्या जम्मू-काश्मीरमध्ये ११ सहस्रांहून अधिक रोहिंग्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक होणारे पहिले रोहिंग्या सय्यद हुसेन होते, ज्यांना वर्ष २००९ मध्ये राज्य सरकारने येथे स्थायिक केले होते. परिणामी आता देहली, हरियाणा, आसाम, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये रोहिंग्यांची संख्या वाढत आहे.