मुसलमान आक्रमकांनी भारतावर आक्रमण करून हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी आणि दर्गे बांधले, हा इतिहास आता नवा राहिलेला नाही. मुसलमानांनी हिंदूंची मंदिरे पाडण्यामागे सर्वांत मोठे कारण म्हणजे इस्लाममध्ये मूर्तीपूजेला स्थान नाही आणि त्यांच्या धर्मग्रंथांत अशा ठिकाणांना तोडण्यास सांगण्यात आले आहे. त्याचेच पालन मुसलमान आक्रमणकर्ते करत होते आणि त्यांनी भारतात मंदिरे पाडली अन् तेथे मशिदी बांधल्या. काही इतिहासतज्ञ आणि इस्लामविषयीचे जाणकार यांचे म्हणणे आहे की, जेथे अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे आहेत, ती पाडून तेथे मशिदी बांधणे इस्लामनुसार चुकीचे आहे. ‘जर असे असते, तर इतक्या आक्रमकांनी जे काही केले, ते इस्लामविरोधी होते आणि त्यांच्या या इस्लामविरोधी कृत्याचे समर्थन आज त्यांचे वंशज करत आहेत, तेही चुकीचे आहे’, असेच म्हणावे लागेल. त्यातही असे समर्थन करणारे इस्लामचे मोठ मोठे धर्मगुरु आणि जाणकार आहेत, हे विशेष ! ‘याचा अर्थ काय घ्यायचा ?’, असा प्रश्न निर्माण होतो. जर इस्लामनुसार अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळी मशिदी बांधणे चुकीचे आहे, हे सत्य असेल, तर देशातील सहस्रो मशिदी हिंदूंना परत द्याव्या लागतील. त्यांची आताची मानसिकता पहाता हे होऊ शकणार नाही. अयोध्येतील श्रीराममंदिराविषयीचा इतिहास स्पष्ट असतांना मुसलमानांनी स्वतःहून ही जागा हिंदूंना दिली नाही. त्यासाठी न्यायालयात लढा द्यावा लागला आणि ते स्थान हिंदूंना मिळवावे लागले. त्यामुळे अन्य मंदिरांचेही असेच करावे लागणार, यात शंका नाही. देशात आज २० कोटी मुसलमान आहेत; मात्र त्यांपैकी पुरातत्वज्ञ के.के. महंमद यांच्याव्यतिरिक्त असा एकही मुसलमान नाही, जो उघडपणे मान्य करून म्हणतो की, ‘जेथे मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत, त्या हिंदूंना सोपवण्यात याव्यात.’ यातून मुसलमान कोणत्या भावनेने वागतात, हे लक्षात येते. भारतात मोहनदास गांधी यांनी सर्वधर्मसमभावाचे डोस पाजले; मात्र हे डोस केवळ हिंदूंनाच त्यांचे नाक दाबून पाजण्यात आले, तर मुसलमानांनी ते फेकून दिले. वास्तविक त्यांना हे डोस पाजण्याचा प्रयत्नच करण्यात आलेला नाही. त्यामुळे हिंदूच सर्वधर्मसमभावाचे पालन करत राहिले आणि आत्मघात करून घेऊ लागले. या डोसाच्या प्रभावातून आता हिंदू बाहेर पडू लागले आहेत आणि त्यांना आता त्यांची संस्कृती अन् धर्म यांची जाणीव होऊ लागली आहे. त्यांचा धर्माभिमान जागृत होऊ लागला आहे आणि ते आता त्यांची मंदिरे परत मागू लागले आहेत. ही हिंदूंसाठी आनंदाची गोष्ट असली, तरी यासाठी पुष्कळ मोठा संघर्ष करावा लागणार आहे. या संघर्षात मुसलमानांशी लढण्यासह मोठ्या प्रमाणात हिंदूंशीच लढावे लागणार आहे. हा संघर्ष देव आणि संत यांच्या आशीर्वादाविना यशस्वी होणार नाही. हेच जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ‘मंदिरांसाठी आमचा संघर्ष चालूच रहाणार आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. यातून हिंदूंना संघर्ष करण्याला पर्याय नाही, हे स्पष्ट होते.
संतांच्या आज्ञेचे पालन करण्यातच हिंदूंचे भले !
गेली अनेक दशके हिंदूंकडून काशी, मथुरा आणि अयोध्या या ३ प्रमुख तीर्थक्षेत्रांवरील मशिदींच्या संदर्भात आंदोलन केले जात होते. ही तीर्थक्षेत्रे मुक्त करणे, हे हिंदूंचे प्रमुख कार्य होते. ते हिंदू आजही करत आहेत. ते अद्याप पूर्ण झालेले नाही. श्रीराममंदिराच्या संदर्भात हिंदूंना यश मिळाले आणि तेथे भव्य मंदिर बांधून झाले; मात्र काशी आणि मथुरा येथे न्यायालयीन संघर्ष चालू आहे. गेल्या दशकभरापासून हिंदू मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळा, कुतूबमिनार, ताजमहाल यांची मागणी करत होते; मात्र त्यांतील भोजशाळा सोडून अन्य २ ठिकाणी हिंदूंना अपयश मिळाले. आता हिंदूंमध्ये अधिक जागृती होत असून संभल येथील हरिहर मंदिराविषयी हिंदूंना लढा चालू केला आहे. येथे कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णूचा कल्कि अवतार होणार आहे. त्यामुळे या मंदिराचे महत्त्वही तितकेच आहे. त्यासमवेत अजमेर येथील दर्ग्याविषयी न्यायालयीन लढाई चालू झाली आहे. ही लढाई चालू असतांना महाराष्ट्रातील कल्याण येथील दुर्गाडी मंदिराचा लढा हिंदूंनी जिंकला, हे मोठे यश आहे. येथे गेली ५ दशके हिंदू लढा देत होते आणि त्यांना शेवटी देवीच्या आशीर्वादाने विजय मिळवता आला. आता वरील प्रकरणांतही पुढील काही वर्षांत हिंदूंना विजय मिळेल, असा आशावाद ठेवावा लागेल. त्यात काळात देशातील अन्य मंदिरांच्या मुक्तीचाही लढा चालू होऊ शकतो. उत्तरप्रदेशात काही ठिकाणी तो चालूही झाला आहे. अन्यत्रही होऊ शकतो. पू. सीताराम गोयल यांनी त्यांच्या मंदिरांच्या संदर्भातील पुस्तकात १८ सहस्र मंदिरांची माहिती दिली आहे ज्या ठिकाणी मंदिरे तोडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत. हिंदू आता सर्व मंदिरे मुक्त करण्यासाठी संघटित होऊ लागले आहेत; कारण मंदिरे हिंदूंची अस्मिता आहे. त्यावर घाला घालून हिंदूंना ललकारण्यात आले होते. आता हिंदूंनी हे आव्हान स्वीकारले आहे.
दुसरीकडे काही जण त्याला विरोध करत आहेत. ‘प्रत्येक मशिदीवर हिंदूंनी दावा करू नये’, अशा आशयाची वक्तव्ये काही हिंदु नेत्यांकडून येऊ लागली आहेत. त्यांच्या या म्हणण्याच्या मागील उद्देश आहे की, देशात अशांतता निर्माण होऊन त्याचा तोटा भारताच्या प्रगतीवर आणि परराष्ट्रनीतीवर होऊ शकतो. त्यांचे म्हणणे काही अंशी योग्य आहे, असे जरी धरून चालले, तरी जे संतांना वाटते, त्यानुसार वागणे आता आवश्यक आहे. संतांना त्रिकाल ज्ञान असते. त्यामुळे ‘भविष्याच्या उदरात जे काही दडले आहे, जे नंतर पुढे येणार आहे, ते पहाता संत सांगतात, त्याचे पालन केले, तर आपले भलेच होणार’, हा भाव ठेवून कृती करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची रायरेश्वराच्या चरणी प्रार्थना केली आणि पुढील काही दशकांत भारतात हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. जर ‘हे शक्य नाही आणि त्यामुळे संघर्ष होऊ शकतो’, असा विचार केला असता, तर ते साध्य झाले नसते. संघर्ष करावा लागला, हे सत्यच आहे; मात्र संघर्षाविना यश मिळत नाही, हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच स्वामी रामभद्राचार्य महाराज संघर्ष करण्यास सिद्ध असल्याचे सांगत आहेत; कारण त्यांना ठाऊक आहे की, या संघर्षातून हिंदूंचाच विजय होणार आहे आणि पुढे भारत हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणार आहे. एक सहस्र वर्षांचा गुलामगिरीचा इतिहास पुसून हिंदूंना मंदिरे मुक्त करावी लागणार आहेत. अशा वेळी देशात कुणी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास, त्याचा योग्य बंदोबस्त करण्यासाठी हिंदूंनी निवडून दिलेल्या सरकारांनी प्रयत्न केला पाहिजे. तो प्रयत्न सध्या उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत आहेत. तसे झाले, तर सर्व काही शांततेत होऊ शकते !
हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासह संतांच्या मार्गदर्शनानुसार संघर्ष करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! |