ISKCON Chinmoy Prabhu Arrest Row : बांगलादेशात ‘इस्कॉन’चे चिन्मय प्रभु यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंवर मुसलमानांचे आक्रमण

  • ५० हिंदू घायाळ

  • पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून बघ्याची भूमिका

धर्मांध आक्रमणकर्ते (डावीकडे) घायाळ हिंदू (उजवीकडे)

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे सदस्य चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्यानंतर ढाका, चिटगाव, दिनाजपूर आदी ठिकाणी हिंदूंकडून आंदोलन करण्यात येत आहे. ढाक्यातील शाहबागमध्ये आंदोलन करणार्‍या हिंदूंवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. यात ५० हून अधिक हिंदू घायाळ झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना शाहबाग पोलीस ठाण्यापासून केवळ ३० मीटर अंतरावर घडली. पोलीस आणि प्रशासन यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यांनी धर्मांधांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. यावरून बांगलादेशातील पोलीस धर्मांध मुसलमानांच्या आक्रमणांचे समर्थन करत असल्याचे दिसून आले.

१. ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ आणि जमात-ए-इस्लामी या पक्षांच्या धर्मांध मुसलमान कार्यकर्त्यांकडून हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. चितगाव येथे २५ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा सहस्रो हिंदूंनी ‘जय सिया राम’ आणि ‘हर हर महादेव’ असा जयघोष करत ‘मौलवी बाजार’मध्ये मशाल मोर्चा काढला. हिंदूंकडून प्रत्येक जिल्ह्यात ‘शांती सभां’चे आयोजन करण्यात आले होते. या ‘शांती सभे’वर धर्मांधांनी आक्रमण केले.

२. चितगाव विश्‍वविद्यालयाचे प्रा. कुशाल बरन यांच्यावर आक्रमण करण्यात आले. यात ते गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

३. बांगलादेशातील सत्तासंघर्षाच्या काळात ६ ऑगस्ट या दिवशी खुलना जिल्ह्यातील इस्कॉन मंदिराला लक्ष्य करण्यात आले होते. यामध्ये भगवान जगन्नाथाच्या मूर्तींचे दहन करण्यात आले. या आक्रमणानंतर चिन्मय दास यांनी चितगावमधील इतर ३ मंदिरांनाही धोका असल्याचे सांगितले होते. त्यांच्या संरक्षणासाठी हिंदु समाजाला एकत्रित करण्याचे काम ते करत होते. दास म्हणाले होते की, हिंसाचारापासून वाचण्यासाठी हिंदू त्रिपुरा आणि बंगाल येथे आश्रय घेत आहेत.

४. बांगलादेशात इस्कॉनची ७७ मंदिरे आहेत. बांगलादेशातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात इस्कॉनचे मंदिर असून अनुमाने ५० सहस्रांहून अधिक लोक त्यांच्याशी संबंधित आहेत.

चिन्मय प्रभु यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

‘इस्कॉन’चे सदस्य चिन्मय कृष्ण दास प्रभु

चिन्मय प्रभु यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. बांगलादेश पोलिसांनी चिन्मय प्रभु यांच्या कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. कारागृहात त्यांना सर्व धार्मिक लाभ दिले जावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या प्रकरणी तात्काळ पावले उचलावीत ! – केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदार

चिन्मय प्रभु यांच्या अटकेनंतर भारतातील केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत लिहिले की, चिन्मय प्रभु यांना अन्यायकारक पद्धतीने अटक करण्यात आली आहे. त्याचा मी निषेध करतो.

ते बांगलादेशातील सनातनी हिंदु समुदायाच्या अधिकारांसाठी अथक प्रयत्न करत होते. माझी आपले परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांना विनंती आहे की, त्यांनी कृपया हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तात्काळ पावले उचलावीत.

भारत सरकारने तात्काळ बांगलादेश सरकारशी बोलावे ! – इस्कॉनची विनंती

चिन्मय प्रभु यांच्या अटकेनंतर ‘इस्कॉन’ने ‘एक्स’वर एक पोस्ट केली. यात म्हटले आहे की, ‘इस्कॉन बांगलादेशा’चे प्रमुख नेते चिन्मय कृष्ण दास यांना ढाका पोलिसांनी अटक केल्याची चिंताजनक बातमी आम्हाला मिळाली आहे. इस्कॉनचा आतंकवादाशी संबंध आहे, असा आरोप करणे चुकीचे आणि निंदनीय आहे. इस्कॉनने भारत सरकारला त्वरित पावले उचलण्याची आणि बांगलादेश सरकारशी बोलण्याची विनंती केली आहे.

आम्ही एक शांततापूर्ण मार्गाने भक्तीचे कार्य करत आहोत. बांगलादेश सरकारने शक्य तितक्या लवकर चिन्मय कृष्ण दास यांची सुटका करावी. भक्तांच्या सुरक्षेसाठी आम्ही भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करतो.

हिंदूंनी आंदोलन चालू ठेवावे ! – चिन्मय प्रभु

न्यायालयात नेले जात असतांना चिन्मय प्रभु यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘बांगलादेशातील हिंदूंना माझे आवाहन आहे की, त्यांनी नियोजनानुसार आंदोलन चालू ठेवावे.’

संपादकीय भूमिका

‘एक है तो सेफ है’, असे भारतात हिंदूंना आवाहन केले जात आहे. आता हे आवाहन केवळ भारतातील हिंदूंच्या संदर्भात नाही, तर जागतिक, विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंसाठी करणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर हिंदूंनी एक व्हावे, त्यासाठी भारत सरकारने पुढाकार घेऊन या हिंदूंच्या सुरक्षेसाठी युद्धापातळीवर कठोर पावले उचलली पाहिजेत !