पुणे – भारताने कॅनडातील संघटित गुन्हेगारीचे सूत्र उपस्थित केले होते; परंतु कॅनडा सरकारने त्याकडे डोळेझाक केली. कॅनडा सरकार भारतीय उच्चायुक्त आणि मुत्सद्दी यांना लक्ष्य करत होते. त्याला भारताने ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले. जेव्हा भारताचे राष्ट्रहित, अखंडता किंवा सार्वभौमत्त्व यांचा प्रश्न येतो, तेव्हा भारत कठोर पावले उचलतो, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, कॅनडामध्ये एक छोटासा गट (खलिस्तानी) आहे, ज्याने स्वःला मोठी राजकीय शक्ती बनवले आहे. दुर्दैवाने तेथील राजकारणी त्या गटाचे लांगूलचालन करत आहेत. ते केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर उभय देशांच्या संबंधांसाठी वाईट आहे. हे कॅनडासाठीदेखील धोक्याचे आहे. ज्या देशाला आपण अनुकूल लोकशाही देश मानतो, त्या देशाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला असून अत्यंत अव्यावसायिक वृत्ती स्वीकारली आहेे. समाधानकारक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करता आला असता.
भारत-चीन सीमेवर २ कारणांमुळे करार, म्हणजे सर्व समस्यांचे निराकरण नाही !
भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याविषयी झालेल्या करारावर परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर म्हणाले की, भारत सरकारने स्वतःच्या शब्दावर ठाम राहून काम केले आहे. आज आपण जिथे आहोत, तिथे पोचण्याची २ कारणे आहेत.
प्रथम आम्ही आमच्या शब्दावर मागे हटलो नाही. हे केवळ देशाच्या संरक्षणासाठी सैन्य प्रत्येक संधीवर ठाम राहिल्यामुळेच शक्य झाले. सैन्याने त्याचे काम केले. दुसरे मुत्सद्देगिरीने काम केले. या कराराचा अर्थ असा नाही की, दोन्ही देशांमधील समस्यांचे निराकरण झाले आहे; पण सैन्य मागे घेण्याचा पहिला टप्पा गाठण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. साहजिकच विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि एकत्र काम करण्यासाठी वेळ लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषदेसाठी रशियातील कझान येथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली, तेव्हा दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची भेट घेऊन पुढे कसे जायचे ?, हे पाहण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कॅनडाने भारताच्या पाठीत सुरा खुपसला ! – भारताचे कॅनडातील माजी उच्चायुक्त संजय वर्मा
कॅनडातील भारताचे माजी उच्चायुक्त संजय वर्मा यांनी कॅनडाच्या वागणुकीवर आक्षेप घेतांना ‘लोकशाही असलेल्या देशाने पाठीत खंजीर खुपसला आहे’, असा गंभीर ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला. वर्मा यांनी कॅनडातील खलिस्तानी चळवळीची उत्पत्ती, स्थानिक राजकारण्यांकडून निवडणुकीतील लाभासाठी मिळत असलेला पाठिंबा आदींविषयी सांगितले. खलिस्तानी त्यांची संख्या वाढवण्यासाठी गुन्हेगारी कारवाया करतात, असा आरोपही त्यांनी केला.