४५ कोटी लोकांना युद्धासाठी सिद्ध रहाण्यासाठी आवाहन !

ब्रसेल्स (बेल्जियम) – रशियाच्या वाढत्या आक्रमक धोरणामुळे युरोप आता तिसर्या महायुद्धाच्या छायेत पोचला आहे. ‘रशियाची वर्ष २०३० पर्यंत युरोपवर आक्रमण करण्याची क्षमता वाढेल’, अशी चेतावणी ‘नाटो’चे महासचिव मार्क रूट यांनी दिली. या पार्श्वभूमीवर युरोपातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. युरोपीयन युनियन (युरोपमधील देशांची संघटना) आणि नाटो यांनी सतर्कतेची चेतावणी दिली आहे. युरोपीयन युनियनने त्याच्या ४५ कोटी नागरिकांना सूचना दिल्या आहेत की, ते कोणत्याही स्थितीसाठी सिद्ध रहावेत. लोकांनी अत्यावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा, ज्यामध्ये किमान ७२ घंटे पुरेल एवढे अन्न, पाणी आणि जीवनावश्यक वस्तू असाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. युरोपच्या सुरक्षेविषयी आता नाटो सदस्य देश अधिक गांभीर्याने विचार करत असून फ्रान्स, जर्मनी आणि पोलंडसह अनेक देश युद्धाच्या सिद्धतेत आहेत.
नाटोच्या अहवालानुसार वर्ष २०३० पर्यंत रशिया युरोपवर थेट आक्रमण करू शकतो, त्यामुळे नाटो देशांनी सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर पालट करायला प्रारंभ केली आहे. फ्रान्स, जर्मनी आणि पोलंड यांनी सैन्य दलाची शक्ती वाढवण्याचे ठरवले आहे.