
नवी देहली – अलीकडेच म्यानमार आणि थायलंड या देशांमध्ये विनाशकारी भूकंप झाला. या भूकंपाविषयी २० वर्षीय अभिज्ञ आनंद या तरुण ज्योतिषाने ३ आठवड्यांपूर्वीच भाकित वर्तवले होते. त्यांनी त्यांच्या यू ट्यूब वाहिनीवर ‘१ मार्च या दिवशी या २ देशांमध्ये भूकंप येणार’, असे सांगितले होते. या भाकितानंतर अवघ्या काही आठवड्यांत त्यांची भूकंपाची भविष्यवाणी खरी ठरली.
कोण आहे अभिज्ञ आनंद ?२० वर्षीय अभिज्ञ आनंद यांनी वयाच्या ११ व्या वर्षापासून ज्योतिष विद्या शिकण्यास आरंभ केला. ते मूळचे कर्नाटकातील म्हैसुरू येथील रहिवासी आहेत. ते सर्वांत अल्प वयाचे ज्योतिषी आहेत. त्यांनी अवघ्या ७ व्या वर्षी भगवद्गीता मुखोद्गत केली आहे. ते लहानपणापासून संस्कृत भाषा शिकत आहेत. अभिज्ञ आनंद यांचे स्वतःची यू ट्यूब वाहिनी आहे. त्यावर त्यांनी अनेक व्हिडिओज प्रसारित केले आहेत. त्यात त्यांनी अनेक भविष्यवाण्याही केल्या आहेत. |
(सौजन्य : Abhigya Anand | Praajna Jyotisha)
ज्योतिष आणि संस्कृत शिकण्याविषयी श्रीकृष्णाने केले मार्गदर्शन !
टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ज्योतिष आणि संस्कृत शिकण्याचा मार्ग निवडण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने मार्गदर्शन केल्याचे सांगितले. ‘प्राजना ज्योतिष’ या स्वत:च्या संस्थेच्या माध्यमातून ते १ सहस्र २०० मुलांना आणि १५० संशोधकांना शिकवतात. या संस्थेचा आरंभ त्यांनी वर्ष २०१८ मध्ये केला होता. अभिज्ञ यांनी वयाच्या १२ व्या वर्षी वास्तूशास्त्र विषयात पदवी मिळवली होती.
अभिज्ञ आनंद यांनी वर्तवलेली महत्त्वपूर्ण भाकिते
अभिज्ञ आनंद यांनी वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारी येणार, वर्ष २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध होणार, वर्ष २०२३ मध्ये इस्रायलवर हमासचे आतंकवादी आक्रमण होणार, तसेच वर्ष २०२४ मध्ये बांगलादेशातील सत्ता पालटाविषयी भाकीत वर्तवले होते.