Former Nepal King Gyanendra : नेपाळचे माजी राजा ज्ञानेंद्र यांच्या सुरक्षेत कपात !

नेपाळमधील हिंदु राष्ट्राच्या मागणीच्या वेळी हिंसाचार झाल्याचा परिणाम

नेपाळचे माजी राजा ज्ञानेंद्र

काठमांडू (नेपाळ) – नेपाळ सरकारने माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांची सुरक्षा अल्प करण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळमध्ये राजेशाहीच्या मागणीसाठी हिंसाचार उफाळला असतांना हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांच्यासह अनेक नेत्यांनी या हिंसाचारासाठी माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांच्यावर गंभीर आरोप केले. ज्ञानेंद्र शाह यांच्या खासगी निवासस्थान निर्मल निवास येथे २५ सुरक्षा कर्मचारी तैनात होते; परंतु आता सरकारने त्यांची संख्या १६ इतकी केली आहे.

१. नेपाळच्या गृहमंत्रालयाने माजी राजाच्या संरक्षणासाठी तैनात असलेले सुरक्षा कर्मचारीही पालटले आहेत. सरकारने माजी राजावरही पाळत वाढवली आहे. नेपाळमधील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसनेही हिंसाचारासाठी माजी राजाला उत्तरदायी ठरवले आहे.

२. माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी म्हटले की, आता हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे की, या सगळ्यामागे ज्ञानेंद्र शाह आहेत. ज्ञानेंद्र शाह यांचे हेतू योग्य नाहीत, हे आधीही दिसून आले आहे आणि आताही दिसून येत आहे; पण आता सरकारने कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे. ज्ञानेंद्र शाह यांना आता पूर्ण स्वातंत्र्य देता येणार नाही. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि नेपाळ सरकारने हे सूत्र गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.

३. २८ मार्च या दिवशी नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारात २ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात एक निदर्शक आणि एक पत्रकार यांचा समावेश होता. हिंसाचार इतका नियंत्रणाबाहेर गेला होता की, हिंसाचारग्रस्त भागात संचारबंदी लागू करावी लागली आणि सैन्याला तैनात करावे लागले. नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा स्थापित करण्याच्या मागणीमुळे ही हिंसाचार घडला. संवैधानिक राजेशाही आणि हिंदु राष्ट्राची पुनर्स्थापना, हा देशाच्या समस्यांवर उपाय आहे, असा निदर्शकांचा दावा आहे.