Hinduphobic Course In Houston University : अमेरिकेतील ह्यूस्टन विद्यापिठात हिंदु धर्माविषयीच्या अभ्यासक्रमात हिंदु धर्माची अपकीर्ती

हिंदु विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर विद्यापिठाकडून स्पष्टीकरण

ह्युस्टन विद्यापीठातील हिंदूविरोधी अभ्यासक्रम उघड करणारा भारतीय विद्यार्थी वसंत भट्ट

नवी देहली – अमेरिकेतील ह्यूस्टन विद्यापिठात ‘लिव्हड हिंदु रिलिजन’ नावाने  अभ्यासक्रम शिकवण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाद्वारे हिंदूंना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याने हिंदु विद्यार्थ्याकडून आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर आता ह्यूस्टन विद्यापिठाने स्पष्टीकरण दिले आहे. विद्यापिठाने म्हटले आहे की, ते शैक्षणिक स्वातंत्र्याला महत्त्व देते आणि शिक्षकांना जटील अन् संवेदनशील सूत्रांवर चर्चा करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते.

१. वसंत भट्ट नावाच्या विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाच्या मजकुरावर आक्षेप घेत त्याला ‘हिंदुफोबिक’ (हिंदुद्वेषी) म्हटले. त्यानंतर विद्यापिठाने त्याचे म्हणणे मांडले. विद्यापिठाचे अधिष्ठाता आणि धार्मिक अभ्यास विभागाचे संचालक यांनी अभ्यासक्रमाचा आढावा घेतला आणि शिक्षकांशी या विषयावर चर्चा केली.

२. हा अभ्यासक्रम शिकवणारे प्राध्यापक आरोन मायकेल उलेरी यांनी सांगितले की, त्यांचे उद्दिष्ट हिंदु धर्माच्या विविध रूपांचे स्पष्टीकरण देणे, हे आहे. हिंदु धर्म हा अनेक वेगवेगळ्या परंपरा आणि श्रद्धा यांचे एकीकरण आहे. प्राचीन काळात भारतीय संस्कृत साहित्यात ‘हिंदु’ शब्द आढळत नव्हता; परंतु तो भौगोलिक आणि सांस्कृतिक ओळख म्हणून विकसित झाला. वर्ष १९२२ मध्ये ‘हिंदुत्व’ ही एक राजकीय विचारसरणी म्हणून उदयास आली आणि त्याचे ऐतिहासिक पैलू अभ्यासक्रमात योग्यरित्या शिकवले जातात.

काय आहे प्रकरण ?

राज्यशास्त्राचा विद्यार्थी वसंत भट्ट

ह्यूस्टन विद्यापिठाचा ‘लिव्हड हिंदु रिलिजन’ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्राध्यापक आरोन मायकेल उलेरी हे प्रत्येक आठवड्याला ऑनलाईन व्याख्याने देतात. वसंत भट्ट हे याच विद्यापिठात राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहेत. त्यांनी ‘कॉलेज ऑफ लिबरल आर्ट्स अँड सोशल सायन्सेस’च्या अधिष्ठांताकडे तक्रार नोंदवली आहे. भट्ट यांच्या मते प्राध्यापक उलेरी यांनी हिंदु धर्म प्राचीन आणि जिवंत धर्म नसून एक राजकीय शस्त्र असल्याचे म्हटले आहे. हिंदु राष्ट्रवादी ते शस्त्र म्हणून वापरतात. ही अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांची व्यवस्था आहे. तसेच ‘हिंदु धर्म प्राचीन आहे’ ही वस्तूस्थितीही नाकारण्यात आली आहे.

भट्ट यांनी यासाठी पुरावेही दिले आहेत. या अभ्यासक्रमात असे म्हटले आहे की, ‘हिंदु’ शब्द आधुनिक आहे आणि धर्मग्रंथांमध्ये आढळत नाही. हिंदुत्व किंवा हिंदुत्वनिष्ठ हा शब्द हिंदु राष्ट्रवादी त्यांच्या धर्माचे वैशिष्ट्य दाखवण्यासाठी आणि इतरांना, विशेषतः इस्लामला अपकीर्त करण्यासाठी वापरतात. हे लोक असा विश्वास ठेवतात की, हिंदु धर्म हा भारताचा अधिकृत धर्म असावा.

संपादकीय भूमिका

विदेशी विद्यापिठात हिंदु धर्माविषयी शिक्षण देण्यात येत असल्याने हिंदूंना आनंद होतो; मात्र प्रत्यक्षात त्यात हिंदु धर्माची अपकीर्ती करण्यात येते. हे पहाता असे अभ्यासक्रम अशा विद्यापिठांनी भारताकडून पडताळून घेण्याचा कायदाच आता भारताने केला पाहिजे !