|
ओटावा (कॅनडा) / नवी देहली – कॅनडातील खलिस्तानी(Khalistani ) आतंकवादी हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येच्या प्रकरणी कॅनडाने(Canada) तेथील भारतीय उच्चायुक्त संजय कुमार आणि इतर काही मुत्सद्दी यांच्यावर संशयित म्हणून उल्लेख केल्याने भारताने संजय कुमार वर्मा यांना भारतात परत बोलावले आहे. तसेच भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तालयातील ६ अधिकार्यांना भारत सोडण्याचा आदेश दिला आहे. भारताच्या या कृतीनंतर कॅनडानेही तेथील भारतीय उच्चायुक्तालयातील ७ भारतीय अधिकार्यांना कॅनडा सोडण्याचा आदेश दिला. भारताने कॅनडाच्या अधिकार्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत देशातून जाण्याची मुदत दिली आहे. कॅनडाने लावलेले आरोप ठामपणे फेटाळत भारताने म्हटले की, यामागे ट्रुडो सरकारचे राजकीय धोरण आहे, जे खलिस्तान्यांच्या मतपेढीने प्रेरित आहे. कॅनडा बर्याच काळापासून हे करत आहे. त्यांच्या मंत्रीमंडळात भारताविरुद्ध कारवाया करणारे आतंकवादी आणि फुटीरतावादी धोरणांशी संबंधित असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
Canada’s Justin Trudeau Government’s accusations inspired by Khalistani vote bank. – India responds staunchly to #Canada‘s allegations that India’s High Commissioner in Canada was behind the killing of #Khalistani terrorist Nijjar.
👉 This absurdity by Canada to secure… pic.twitter.com/dyvrJdTwyl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 15, 2024
पंतप्रधान ट्रुडो यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये काही आरोप केले होते. मात्र, कॅनडाच्या सरकारने अनेकदा विचारणा करूनही एकही पुरावा भारत सरकारला दिलेला नाही. हा नवा आरोपही अशाच पद्धतीने करण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात पुढे म्हटले की, ट्रुडो सरकारला माहिती असूनही त्याने कॅनडातील भारतीय मुत्सद्दी आणि समुदायाचे नेते यांना धमकावणार्या हिंसक कट्टरतावादी अन् आतंकवादी यांना आश्रय दिला आहे. यामध्ये भारतीय नेत्यांना जिवे मारण्याच्या धमक्यांचाही समावेश आहे. बेकायदेशीरपणे कॅनडामध्ये प्रवेश केलेल्या काही लोकांना नागरिकत्व लवकर देण्यात आले. कॅनडातील आतंकवादी आणि संघटित गुन्हेगारी करणारे यांच्या प्रत्यर्पणासाठी भारत सरकारच्या अनेक विनंत्याही फेटाळल्या गेल्या आहेत.
कॅनडाच्या भारतातील राजदूतांना भारताने सुनावले !
कॅनडाने भारताला पाठवलेल्या पत्रामध्ये हरदीपसिंह निज्जर याचे नाव घेतले नसून ‘कॅनडाचा नागरिक’ असा उल्लेख केला आहे. कॅनडाचे पत्र मिळताच भारताने १४ ऑक्टोबरला सायंकाळी कॅनडाच्या भारतातील राजदूतांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावून ‘कॅनडाने केलेले आरोप निराधार आहेत’ अशा शब्दांत सुनावले. यानंतर भारताने कॅनडातील उच्चायुक्त आणि इतर अधिकारी यांना परत बोलावण्याची माहिती दिली.
(म्हणे) ‘आम्ही पुरावे दिले आहेत !’ – कॅनडा
कॅनडाचे भारतातील उप उच्चायुक्त स्टुअर्ट व्हीलर यांनी परराष्ट्र मंत्रालयातून बाहेर पडल्यानंतर सांगितले की, भारताने अनेक दिवसांपासून ज्याची मागणी केली होती, ती कॅनडा सरकारने पूर्ण केली आहे. कॅनडाच्या भूमीवर कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येशी भारतीय हस्तकांचा संबंध जोडणारे भक्कम पुरावे आम्ही भारताला दिले आहेत. आता या आरोपांवर भारत काय कारवाई करतो, हे पहायचे आहे. हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे. कॅनडा सहकार्य करण्यास सिद्ध आहे.
कॅनडावर आमचा विश्वास नाही ! – भारत
या संदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, कॅनडातील भारताचे उच्चायुक्त वर्मा यांना सुरक्षा देण्यासाठी कॅनडाच्या सरकारवर आमचा विश्वास नाही.
भारतीय हस्तकांना बिश्नोई टोळीचे साहाय्य ! – कॅनडाचे पोलीस
कॅनडाच्या पोलिसांनी १४ ऑक्टोबरला पत्रकार परिषदही घेतली. यात पोलीस आयुक्त माईक दुहेमे यांनी सांगितले की, कॅनडातील भारतीय मुत्सद्दी आणि अधिकारी त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्यांनी भारत सरकारसाठी गुप्तपणे माहिती गोळा केली आहे. यासाठी भारतीय अधिकार्यांनी हस्तकांचा वापर केला. यापैकी काही हस्तकांना धमकावण्यात आले आणि भारत सरकारसमवेत काम करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. भारताने गोळा केलेल्या माहितीचा उपयोग दक्षिण आशियाई लोकांना लक्ष्य करण्यासाठी केला जातो. याचे पुरावे आम्ही भारत सरकारच्या अधिकार्यांना दिले होते आणि त्यांना हिंसाचार थांबवून सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.
साहाय्यक आयुक्त ब्रिजिट गौविन म्हणाले की, आमच्या अन्वेषणात असे आढळून आले की, हे हस्तक संघटित गुन्हेगारी घटकांचा वापर करतात. या गटामध्ये विशेषतः बिश्नोई टोळीचा समावेश आहे. आम्हाला विश्वास आहे की, हा गट भारत सरकारच्या हस्तकांशी संबंधित आहे.
सध्या जे काही चालू आहे, ते आम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही ! – पंतप्रधान ट्रुडो
ओटावा येथे पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतावर आरोप करतांना म्हणाले की, निज्जर हत्याप्रकरणात भारताचे अधिकारी वैयक्तिकरित्या सहभागी आहेत, हे आम्हाला ठाऊक आहे. आम्ही वेळोवेळी याची माहिती भारत सरकारला दिली आहे. याचे पुरावेही भारत सरकारला सादर करण्यात आले. हे पुरावे आम्ही गेल्या आठवड्यात भारत सरकारकडे सादर केले होते. तसेच आम्ही ‘या प्रकरणाच्या अन्वेषणात सहकार्य करा’, अशी त्यांना विनंती केली होती; मात्र भारताने आम्हाला कोणतेही सहकार्य केले नाही. इतकेच नाही, तर मी स्वत: याप्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्याचा काहीही लाभ झाला नाही. भारताने प्रत्येक वेळी हे आरोप धुडकावून लावले. याउलट भारताकडून माझ्यावर वैयक्तिक आरोप करण्यात आले, असा आरोपही ट्रुडो यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, दोन्ही देशांतील संबंध महत्त्वाचे आहेत. याची आम्हाला जाणीवही आहे. दोन्ही देशांतील संबंध बिघडावे, या हेतूने आम्ही हे आरोप केलेले नाहीत; पण सध्या जे काही चालू आहे, ते आम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. आम्ही भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा आदर करतो, तसेच भारतानेही कॅनडाच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा आदर करावा, अशी आमची अपेक्षा आहे. एक पंतप्रधान म्हणून देशातील असुरक्षित घटकांच्या पाठीशी उभे रहाणे, हे माझे कर्तव्य आहे.
निज्जर हत्येचे प्रकरण
१. १८ जून २०२३ या दिवशी कॅनडातील सरे येथील गुरुद्वाराजवळ खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याची हत्या करण्यात आली होती.
२. पुढे १८ सप्टेंबर २०२३ या दिवशी कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप केला होता, तो भारताने फेटाळला होता.
३. यानंतर यावर्षी ३ मे या दिवशी निज्जर याच्या हत्येतील ३ आरोपींना अटक करण्यात आली. तिन्ही आरोपी भारतीय आहेत. कॅनडाच्या पोलिसांनी सांगितले की, पोलीस अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. निज्जरला मारण्याचे काम भारताने त्यांच्यावर सोपवले होते, असे त्यांचे मत आहे. तेव्हा भारताने या प्रकरणावर म्हटले होते की, हा कॅनडाचा अंतर्गत प्रश्न आहे.
ट्रुडो यांच्यासाठी हे प्रकरण महत्त्वाचे का ?
कॅनडात ऑक्टोबर २०२५ मध्ये संसदीय निवडणुका होणार आहेत. खलिस्तान समर्थक हे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पक्षाची मोठी मतपेढी मानली जाते. गेल्या महिन्यातच खलिस्तान समर्थक जगमीत सिंह यांच्या एन्.डी.पी. पक्षाने ट्रुडो सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. यामुळे ट्रुडो सरकार अल्पमतात आले; मात्र १ ऑक्टोबरला झालेल्या बहुमत चाचणीत ट्रुडो यांच्या पक्षाला दुसर्या पक्षाचा पाठिंबा मिळाला. यामुळे त्यांचे सरकार वाचले.
वर्ष २०२१ च्या जनगणनेनुसार कॅनडाची एकूण लोकसंख्या ३ कोटी ८९ लाख आहे. त्यापैकी १८ लाख भारतीय आहेत. हे कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या ५ टक्के आहेत. यांपैकी ७ लाखांहून अधिक शीख आहेत, जे एकूण लोकसंख्येच्या २ टक्के आहेत. त्यातील मोठी संख्या ही खलिस्तान समर्थक आहे.
संपादकीय भूमिकाखलिस्तान्यांची मते मिळवण्यासाठी ट्रुडो सरकार खलिस्तानी आतंकवाद्यांना पाठीशी घालून भारतावर खोटे आरोप करत आहे. त्यामुळे भारताने कॅनडाला जागतिक स्तरावर उघडे पाडत राहिले पाहिजे ! |