हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांच्या वैचारिक आतंकवादाचा सडेतोड प्रतिवाद करणारे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक !

दाभोलकरांच्या हत्येनंतरच्या सनातनच्या संघर्षमय काळाला उजाळा देणारे अनुभव !

प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याविषयी सनातन संस्थेच्या मनात आदरच आहे. अनेक घोटाळे उघड करणारे आणि राजकारण्यांवर चाप बसवणारे पत्रकार जवळून पाहिले आहेत. या सर्वांविषयी आमच्या मनात आदराचीच भावना आहे; परंतु दाभोलकरांच्या हत्येनंतर सनातनद्वेषी पत्रकारिता करून काही साम्यवादी विचारसरणीच्या पत्रकारांच्या टोळीने वैचारिक प्रदूषण करून समाजमन कलुषित करण्याचा प्रयत्न केला. याविषयी माहिती देणे, हा या लेखाचा उद्देश आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर राजकारण्यांनी सनातनला थेट आरोपी घोषित केले. त्यानंतर सनातनच्या साधकांच्या चौकशा, आश्रमावरील धाडी, साधकांचे अटकसत्र आदी चालू असतांना या हिंदुद्वेषी पत्रकारितेचा आणि राजकारण्यांचा भयानक अनुभव सनातनचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांना आला. आज सनातनचे साधक यातून तावून सुलाखून बाहेर पडले आहेत. श्री. वर्तक हे हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आणि साम्यवादी यांच्या वैचारिक आतंकवादाला कसे सामोरे गेले आणि या सर्वांचा वैचारिक प्रतिवाद कसा केला, याचे काही अनुभव त्यांनी येथे थोडक्यात मांडले आहेत. ११ मे या दिवशी आपण श्री. वर्तक यांना राजकारण्यांनी ‘हिंदु आतंकवादा’ला खतपाणी घालण्यासाठी केलेला अश्लाघ्य प्रयत्न आणि पीतपत्रकारितेचा अनुभव पाहिला. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

उत्तरार्ध

(पूर्वार्ध वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/792618.html)

श्री. अभय वर्तक

६. सनातनचे प्रवक्ते पसार झाल्याचे धादांत खोटे वृत्त प्रसारित करणारी वृत्तवाहिनी !

‘अभय वर्तक पसार’ अशा प्रकारचे वृत्त एका वाहिनीने प्रसारित केले होते, तसेच सनातन संस्थेच्या अन्य साधकांची नावे घेऊन अयोग्य लिखाण प्रसारित केले होते. त्यांच्या विरोधात कल्याण येथील सत्र न्यायालयामध्ये मी मानहानीचा दावा प्रविष्ट केला. अखेर वर्ष २०२४ मध्ये या दाव्यावर सदर वाहिनीने श्री. अभय वर्तक आणि सनातन संस्था यांची सार्वजनिक क्षमायाचना केली अन् ‘दावा मागे घेण्या’ची विनंती केली. अर्थात् या गोष्टीसाठी ७-८ वर्षे आम्हाला सातत्याने न्यायालयात जावे लागले. या काळात आमच्या अधिवक्त्यांना झालेला त्रास आणि आम्हाला झालेला मनस्ताप यांची भरपाई कशी होणार ? हा मोठा प्रश्न आहे. काही काळाने छोटीशी क्षमा मागून ते मोकळे झाले; परंतु ज्या दिवशी ‘अभय वर्तक पसार’ ही बातमी पाहून माझे नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे, समाजातील लोक यांना काय वाटले असेल ? याची कल्पना कोण करणार ?

७. अंनिसच्या घोटाळ्यांविषयी मौन बाळगणारी आणि सनातनला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारी दुटप्पी प्रसारमाध्यमे !

७ अ. अंनिसच्या घोटाळ्यांसंबंधी दिलेल्या पुराव्यांकडे प्रसारमाध्यमांकडून दुर्लक्ष ! : प्रसारमाध्यमांकडून दाभोलकर मंडळींच्या ‘अंनिस’ आणि ‘परिवर्तन’ या दोन्ही न्यासांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या बातम्या दडपल्या गेल्या. माहिती अधिकार कार्यकर्ते अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते आणि वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांनी डॉ. दाभोलकरांच्या ‘अंनिस’ अन् ‘परिवर्तन’ या दोन्ही न्यासांतील विविध घोटाळे बाहेर काढले. विदेश निधी घोटाळा, न्यासाच्या स्थावर मालमत्तेचा घोटाळा, निधीचा अपव्यवहार घोटाळा असे जवळजवळ ९ प्रकारचे घोटाळे या दोघांनी सर्व प्रसारमाध्यमांतील पत्रकारांच्या समोर मांडले. मीही अनेक वृत्तवाहिन्यांवर ही कागदपत्रे दाखवली; परंतु बहुतांश वाहिन्यांच्या केंद्रस्थानी शहरी नक्षली विचारसरणीचे तथाकथित पत्रकार ठाण मांडून बसल्याने या सर्व घोटाळ्यांच्या महत्त्वाच्या बातम्या अक्षरशः दडपल्या गेल्या. ही पीतपत्रकारिता आम्ही जवळून अनुभवली !

७ आ. सनातनवरील अत्याचारांच्या वृत्तांना सोयीस्करपणे बगल ! : सनातन संस्थेच्या दीड सहस्रांहून अधिक कुटुंबांची दाभोलकर हत्या खटल्यामध्ये चौकशी झाली. सनातनची अधिकोषातील खाती तपासली गेली. आश्रमावर धाडी घालून आणि त्याच्या बातम्या पत्रकारांना अगोदरच देऊन अन्वेषण यंत्रणांनी तर कहरच केला होता. प्रत्यक्षात या धाडींमध्ये कोणतेही शस्त्र अथवा हत्येसंबंधी पुरावे कधीही सापडले नाहीत. संस्थेच्या साधकांचा होणारा छळ आणि पोलिसांची मनमानी यांविषयीची माहिती आम्ही विविध पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांसमोर मांडली होती; परंतु या कालावधीत या पुरोगामी पत्रकार टोळीने एकही वस्तूस्थिती दर्शवणारी बातमी प्रसिद्ध केली नाही. सनातनच्या बाजूने उभ्या रहाणार्‍या पत्रकाराला त्याच्या कार्यालयातून दबाव टाकून बातम्या लिहिण्यास मज्जाव केला जात होता.

८. पत्रकारितेत शिरलेल्या पुरोगामी आतंकवादाची काही उदाहरणे !

८ अ. सनातनविषयी खरी माहिती छापणार्‍या महिला पत्रकारावर पुरोगामी पत्रकारांची दडपशाही : एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या एका महिला पत्रकाराने सनातन संस्थेच्या देवद, पनवेल येथील आश्रमाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी ‘सनातन संस्थेच्या आश्रमात कसे चांगले साधक आहेत ?’ आणि तेथे ‘आध्यात्मिक वातावरण कसे आहे ?’ अशा प्रकारचा एक अर्धा पान लेख लिहून प्रसिद्ध केला. हा लेख छापून आल्यावर ही पुरोगामी पत्रकारांची टोळी त्या महिला पत्रकारावर अक्षरशः तुटून पडली आणि तिला ‘मेमो’ देण्यात आले. पुढे ती पत्रकारितेच्या क्षेत्रात कधीच दिसली नाही. हा एक प्रकारचा ‘पुरोगामी आतंकवाद’ होता. अशा प्रकारामुळे ‘सनातनच्या बाजूने काही लिहावे’, असे कुठल्याही पत्रकाराचे धैर्य होत नव्हते.

८ आ. सनातनला साहाय्य करणार्‍या प्रथितयश वृत्तपत्राच्या उपसंपादकावर वरिष्ठांचा दबाव ! : मराठी प्रथितयश वृत्तपत्राच्या एका उपसंपादकाने सनातनच्या आश्रमास भेट दिली आणि सनातनचे कार्य समजून घेतले. त्याने सनातनची बाजू मांडणार्‍या आणि सनातनवर होणार्‍या अन्यायाच्या काही बातम्या त्याच्या वर्तमानपत्रात लावल्या. परिणामी त्या वर्तमानपत्राच्या संपादकांनी त्याचा छळ चालू केला. तो पत्रकार स्वतः भक्कम असल्यामुळे त्याची नोकरी टिकवू शकला; परंतु त्यानंतर त्याने सनातनच्या समर्थनार्थ एकही बातमी लावली नाही. खासगी भेटीमध्ये त्यांनी आमच्याकडे दिलगिरी व्यक्त केली, ‘माझ्यावर दबाव असल्यामुळे मी तुम्हाला साहाय्य करू शकणार नाही.’ पुरोगामी पत्रकारांच्या आतंकवादाच्या अशा अनेक घटनांना आम्ही सातत्याने सामोरे जात होतो.

८ इ. वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांचे सनातनची अपकीर्ती करण्यासंदर्भातील अत्यंत कटू अनुभव ! : एका प्रथितयश वृत्तवाहिनीचा पत्रकार आणि त्याचा गट सनातनच्या पनवेल येथील आश्रमात आला. त्याने सर्व आश्रम पाहिला आणि कार्य समजून घेतले. अत्यंत गोड बोलून त्यांनी आश्रमातील ध्यानमंदिर आणि साधक यांचे चित्रीकरण केले अन् प्रत्यक्षात मात्र सनातनच्या विरोधात धादांत खोटे वृत्त त्याच्या वाहिनीवर प्रसारित केले. अशाच प्रकारे पुरोगामी पत्रकार राणा आयुब यांनीही खोटे नाव सांगून गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रवेश मिळवला. तेथे त्यांना कोणतेही अपकृत्य आढळले नसतांनाही धादांत खोटे वृत्त प्रकाशित केले. पत्रकार एवढे खोटे वागू शकतात, हे पाहून तर आम्ही आश्चर्यचकित झालो. एका वाहिनीच्या पत्रकाराने आश्रमाच्या शेजारील गावातील लोकांना आश्रमाच्या विरोधात चिथावून एकत्र केले. मी वाहिनीवर चर्चासत्राच्या कार्यक्रमाला जात असतांना संस्थेची गाडी अडवली. त्यामुळे पोलिसांना बोलवावे लागले. काही वेळा वाहिन्यांचे पत्रकार येऊन सनातनच्या पनवेल येथील आश्रमाच्या जवळच्या गावातील लोकांच्या निराधार मुलाखती घेत होते. त्या आधारे ते आश्रमाची अत्यंत हीन पातळीला जाऊन अपकीर्ती करत होते.

८ ई. सनातनवर बंदी न घालण्याच्या संदर्भातील शेकापच्या ६ आमदारांच्या मागणीकडे माध्यमांची डोळेझाक ! : मी आणि सनातनचे सहकारी साधक यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात विविध आमदारांच्या भेटी घेतल्या. अनेक आमदार सनातनच्या आश्रमामध्ये यापूर्वीच येऊन गेले होते. अनेकांनी सनातनचे कार्य जवळून बघितले होते. त्या सर्वांना ठाऊक होते की, सनातन ही आध्यात्मिक संघटना असून यांना फसवले जात आहे. त्या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे (‘शेकाप’चे) ७ आमदार विधानसभेमध्ये होते. यांपैकी ६ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र लिहून ‘सनातनवर बंदी घालू नये’, अशा प्रकारची मागणी केली. ‘आम्ही सनातन संस्थेला चांगले ओळखतो. अशा संस्थेवर बंदी घालणे कसे अयोग्य आहे ?’, हे त्यांनी लिहून दिले. खरेतर ‘शेकाप’ हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. या पक्षाच्या आमदारांनी पत्रे दिली होती. त्यामुळे ही तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी ‘ब्रेकिंग न्यूज’ होती; परंतु ही बातमी कुठेही प्रसारित झाली नाही.

८ उ. सनातनला पाठिंबा न देण्यासाठी आमदारांवरही दबाव टाकण्याचा प्रयत्न : त्या काळी शेकापच्या आमदारांवर दबाव टाकून सनातन संस्थेला विरोध करण्याची बळजोरी करण्याचे प्रकारही चालू झाले. एका आमदाराने तर ‘माझ्यावर वरून दबाव येत आहे की, तुमच्या विरोधात मोर्चा काढा. मला ठाऊक आहे की, तुमचे कार्य किती चांगले आहे’, असे मला बोलावून सांगितले. तत्कालीन शिवसेना आणि भाजप यांच्या अनेक आमदारांनी सनातन संस्थेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून संस्थेच्या बंदीचा प्रस्ताव हाणून पाडला !

९. काळानुसार प्रसारमाध्यमांच्या पीत पत्रकारितेला लगाम आणि पुरोगामी पत्रकारांची टोळी अस्तंगत !

आम्ही पक्षपाती पत्रकारिता वर्ष २००८ पासून २०१६ पर्यंत सातत्याने अनुभवत होतो. वर्ष २०१६ नंतर या पीतपत्रकारितेला लगाम घालण्यास समाजाने आरंभ केला. प्रथमतः महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीच्या क्षेत्रातून अशा या संपादकांचा पक्षपातीपणा आणि आक्रस्ताळेपणा यांमुळे विविध वाहिन्यांची चर्चासत्रे बंद झाली. यावरही त्यांनी ‘आमच्यावर भाजपप्रणित मंडळींनी दबाव आणला !’ अशा प्रकारचा कांगावा केला. प्रत्यक्षात या सर्व पुरोगामी पत्रकारांनी स्वतःच्या हाताने त्यांच्या पायावर धोंडा मारून घेतला होता.

आज वर्ष २०२४ मध्ये दाभोलकर खटल्याचा निवाडा लागला. आज मागे वळून पहातांना हे बेछूट आरोप करणारे पत्रकार कुठे आहेत ? असे पाहिले, तर त्यातील काही पत्रकार आज हिंदुत्वनिष्ठ बनले किंवा त्यांनी तसा बुरखा पांघरल्याचे लक्षात येते. काही जणांनी हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या नावाने कंठशोष करून पत्रकारितेला रामराम ठोकला आहे. काही जण निराशेच्या गर्तेत जाऊन ‘यू ट्यूब’ची पत्रकारिता करून जनतेचे मनोरंजन करत आहेत.

१०. सनातनवर बंदी घालण्याची मागणी करणारे पुरोगामी पत्रकार आणि संघटना तोंडघशी !

‘सनातनवरती बंदी घाला’, ही सर्व पुरोगामी पत्रकार आणि संघटना यांची आवडती मागणी होती. कित्येक वर्षे काही झाले की, ‘सनातनवर बंदी घाला’, अशी मागणी अनेक वर्षे वारंवार करण्यात येत होती आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली जायची. यातून ‘सनातन संस्था वाईट आहे’, असे खोटे कथानक सिद्ध करण्याचा खटाटोप चालू होता. ‘सनातनवर बंदी घालण्यात यावी’, अशी शिफारस करणारा अहवाल महाराष्ट्र शासनाने वर्ष २०११ मध्ये सादर केला होता; परंतु तत्कालीन केंद्र शासनाने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही’, असेही फडवणीस यांनी नंतरच्या काळात स्पष्ट केले. एकदा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सनातनवरील बंदीचा प्रस्ताव येण्याची शक्यता दाट वर्तवली जात होती. महाराष्ट्राच्या तत्कालीन राजकीय नेत्यांकडून याविषयी वारंवार मागणी झाल्यानंतर अखेर ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्याची आवश्यकता नाही’, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी १ नोव्हेंबर २०१६ या दिवशी स्पष्ट केले.

११. तत्त्वनिष्ठ पत्रकारिता करणार्‍या वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे यांचा सनातनला आधार !

या पुरोगामी पत्रकारांच्या टोळीपासून लांब असलेले किंवा त्यांच्या विरोधात काही प्रकरणात उभे ठाकलेले काही पत्रकार होते. या विपरीत स्थितीतही त्यांचे स्वतःचे पत्रकारितेचे अस्तित्व त्यांनी वर्ष २०१४ पूर्वी टिकवून ठेवले होते. यात ‘सुदर्शन वृत्तवाहिनी’, ‘नवाकाळ’, ‘वार्ताहर’, ‘दैनिक सामना’ अशी काही हातावर मोजता येतील, अशी नावे आहेत. यांच्या पत्रकारितेने सनातनला आधार दिला.

‘दैनिक नवाकाळ’च्या संपादिका आणि मालकीण सौ. जयश्री खाडीलकर स्वतः सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. त्यांनी स्वतः सर्व वस्तूस्थिती पाहून सनातनची सत्य बाजू मांडणारा अर्धा पान अग्रलेख लिहिला. ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीने सनातनच्या प्रत्येक बातमीला पुरेपूर वाव दिला. ‘आफ्टरनून व्हॉईस’ या दैनिकाच्या संपादिका आणि मालकीण वैदेही ताम्हण यांनीही सनातनच्या आश्रमास भेट देऊन सनातनची बाजू उचलून धरली. ‘दैनिक सामना’ने वेळोवेळी आम्ही केलेली आंदोलने आणि दाभोलकरांचे भ्रष्टाचार जनतेसमोर आणले. श्री. उदय माहुरकर हे ‘इंडिया टुडे’ चे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक होते. त्यांनी ‘द क्वींट’ या मासिकात ‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनामुळे माझ्या मुलांवर चांगले संस्कार झाले’, हे त्यांनी लेखात उघडपणे सांगितले.

१२. माध्यमांकडून अपकीर्ती होत असतांना समाजाकडून भरभरून प्रतिसाद !

या खडतर काळात वृत्तवाहिन्यांनी अनेक वेळा चर्चासत्राला बोलावले होते. त्यामुळे मला समाजातील अनेक जण ओळखू लागले होते. वाहिन्यांवर चर्चासत्राला बोलावल्यावर संपादक किंवा निवेदक यांनी सनातनच्या प्रवक्त्यांना बोलू न देणे, अंगावर येऊन गप्प बसवणे, सूत्रे खोडून काढणे, अर्थ समजूनही खोटीच सूत्रे पुढे रेटणे, कितीही तळमळीने खरी बाजू पुराव्यांसहित स्पष्ट केली, तरी स्वतःला हवा तो शेवट प्रेक्षकांवर थोपवणे, अशा प्रकारच्या गोष्टी नेहमीच चालू ठेवल्या होत्या. या गोष्टी सूज्ञ जनतेच्या लक्षात येत होत्या आणि लोकांना वास्तव समजत होते. त्यामुळे रस्त्यावरून जात असतांना, रेल्वेगाडीत, बसमध्ये, बसस्थानकावर, बाजारात असे अनेक लोक मला वारंवार भेटत आणि स्वतःहून ‘तुमची बाजू खरी आहे, तुमच्यावर अन्याय होत आहे, हे आम्हाला समजत आहे’, असे आवर्जून सांगत होते. ही आमच्यासाठी जनतेच्या पाठिंब्याची मोठी पोचपावती होती आणि ती आताही अनुभवत आहोत.

१३. सनातनला संपवण्यासाठी विविध हत्या प्रकरणांमध्ये गुंतवण्याचे पूर्वनियोजित षड्यंत्र !

वर्ष २०१३ मध्ये दाभोलकरांची हत्या झाल्यावर पुरोगाम्यांचे सनातनवरील संघटित आक्रमण अनुभवत असतांनाच आणि या संकटातून बाहेर पडत असतांनाच पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा एका पाठोपाठ हत्या झाल्या. ‘दाभोलकर प्रकरणातून सनातनचे निर्दोषत्व सिद्ध झाले, तर पुढे त्यांना अन्य प्रकरणात गुंतवण्याची संधी रहावी’, याची सिद्धताच जणू त्यांनी वर्ष २०१३ ते २०१८ या कालावधीत केली गेली, असे आज लक्षात येते. त्यांनाही १०० टक्के निश्चिती होती की, दाभोलकर प्रकरणात सनातनचा कोणताही सहभाग नसल्यामुळे ते निर्दोष मुक्त होतील. त्या वेळी आपल्याला बोलायला काहीतरी राहिले पाहिजे; म्हणून पुढील घटनांमध्ये आतापासून सनातनला उत्तरदायी ठरवून गुंतवून ठेवावे, हे षड्यंत्र आज लक्षात येते आहे.

आम्ही पत्रकारांच्या विरोधात नाही. काही साम्यवादी पत्रकारांनी केलेल्या अन्यायाची ही उदाहरणे आहेत. या कालावधीत अनेकांनी साहाय्य केले. त्यांचा अनावधानाने उल्लेख राहू शकतो. या सर्वांविषयी अन् भगवान श्रीकृष्णाकडे जेवढी कृतज्ञता व्यक्त करू तेवढे थोडीच आहे !

(समाप्त)

– श्री. अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था.

संपादकीय भूमिका

सनातनला संपवण्यासाठी विविध हत्या प्रकरणांमध्ये गुंतवण्याचे साम्यवादी आणि पुरोगामी यांचे पूर्वनियोजित षड्यंत्र जाणून ते हाणून पाडणे आवश्यक !