तमिळनाडूतील हिंदुद्वेषी स्टॅलिन सरकारने भारत आणि हिंदु संस्कृती विरोधी ‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्पाच्या समर्थनार्थ ठराव संमत केला आहे. हा प्रकल्प म्हणजे रामसेतू तोडून जलमार्ग बनवणे आहे. ‘या प्रकल्पामुळे श्रीलंकेपर्यंत जाण्यासाठी केरळ आणि तमिळनाडू येथील कित्येक समुद्री मैल अंतर अल्प होऊ शकेल. या प्रकल्पाद्वारे सहस्रोंना रोजगार मिळेल’, असे ‘द्रविड मुन्नेत्र कळघम्’ला (द्रमुकला) वाटते. रामेश्वरमधील धनुष्कोडी ते श्रीलंकेतील तलैमन्नार यांना रामसेतू जोडतो. लाखो वर्षांपूर्वी रामायणाच्या काळात प्रभु श्रीरामाच्या मार्गदर्शनाखाली बलाढ्य वानरसेनेने बनवलेल्या या अद़्भुत आणि अद्वितीय स्थापत्यकलेचा नमुना असलेला सेतू आजही अनेकांना आश्चर्यचकीत करत आहे. सध्याच्या वैज्ञानिक युगाच्या दृष्टीने विचार केला, तर लाखो वर्षांपूर्वी दोन देश जोडण्यासाठी समुद्रावर मार्ग बांधला जाऊ शकतो आणि त्यावरून लाखोंच्या संख्येत असलेले सैन्य मार्गक्रमण करून दुसर्या देशात युद्ध करण्यासाठी जाऊ शकेल, याची कल्पनाही करता येत नाही; मात्र ही वस्तूस्थिती आहे. प्रभु श्रीरामाच्या आशीर्वादाने वानरसेनेने तेव्हा उपलब्ध साहित्याद्वारे त्याची उभारणी केली आणि राम-रावण युद्धानंतर बिभीषणाच्या विनंतीनंतर पुन्हा हा सेतू काही अंतर पाण्याखालीही बुडवला. बिभीषणाची एवढीच इच्छा होती की, नंतरच्या काळात भारतातून पराक्रमी राजांनी या सेतूमार्गे येऊन श्रीलंकेवर आक्रमण करू नये.
प्रकल्पाचा घटनाक्रम
आताचे तमिळनाडूचे जे हिंदुद्वेषी शासनकर्ते आहेत, ते तर हा सेतूच तोडायला निघाले आहेत. सेतूसमुद्रम् प्रकल्पाचा विचारविनिमय आताच्या काळातील नव्हे, तर स्वत:ला ‘अपघाताने हिंदु’ म्हणणार्या जवाहरलाल नेहरू यांच्या सत्ताकाळातील आहे. नेहरू यांच्या मंत्रीमंडळाने वर्ष १९६३ मध्ये ४ थ्या पंचवार्षिक योजनेत सेतूसमुद्रम् प्रकल्पाला स्थान दिले होते. द्रमुकचे संस्थापक अण्णादुराई यांनी वर्ष १९६७ मध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी आग्रह धरला. काँग्रेसने या प्रकल्पासाठी २ सहस्र ४२७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत ‘हा प्रकल्प राबवतांना रामसेतूला धक्का पोचवणार नाही. जलमार्गाचे अन्यही पर्याय असू शकतात, त्यांचा विचार केला पाहिजे’, असे विधान केले होते.
केंद्रात काँग्रेस सरकार असतांनाच्या काळात जलमार्गाच्या नावाखाली हा सेतू तोडण्यासाठी प्रयत्न झाले. सेतू तोडण्यासाठी भारतभरातून काँग्रेसला विरोध झाला. भाजपचे डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात खटला प्रविष्ट केला. तेव्हा काँग्रेसने सर्व मर्यादा ओलांडत ‘श्रीराम असा कुणी झालाच नाही’, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयात खटला चालू असतांनाही सेतू तोडण्याचे काम थांबले नाही. सेतू तोडण्यासाठी आणलेल्या यंत्राचे पाते सेतू तोडतांना अनेक वेळा तुटले. प्रकल्पात विविध अडथळे आले. नंतर या प्रकल्पाचे काम थांबले होते. ‘रामसेतूचे रक्षण स्वत: रामाचा सेवक मारुति करतो’, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. तेच हिंदूंनी अनुभवले होते; कारण केंद्र आणि तमिळनाडू सरकार, प्रशासन हे प्रकल्पाच्या बाजूने, नव्हे तेच प्रकल्प राबवत असतांना हिंदूंना मारुतिरायाचाच आधार होता. काँग्रेसने रामसेतूला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे काँग्रेसच्या सत्तेलाच केंद्रासह अनेक राज्यांमध्ये खिंडार पडले आणि भाजपचे सरकार केंद्रात आले.
हिंदुद्वेषी द्रमुक
एकीकडे हिंदुद्वेषी काँग्रेस आणि दुसरीकडे तर हिंदूंना शत्रूप्रमाणे असणारा द्रमुक हा पक्ष ! ज्यांच्या प्रेरणेने हा पक्ष सत्तेत आहे, ते पेरियार स्वत: हिंदु धर्माचा पराकोटीचा द्वेष करत. पेरियार हिंदु देवतांच्या मूर्ती हातगाडीवरून नेऊन एखाद्या नाक्यावर उभे रहायचे आणि हिंदु देवतांवर टीका करत मूर्तीभंजन करायचे. पेरियार यांचे अवगुणच द्रमुकच्या नेत्यांमध्ये आहेत. त्यात स्टॅलिन म्हणजे ‘आधीच मर्कट त्यात मद्य प्यायला’, असे झाले. भारतात बहुसंख्य हिंदू रहात आहेत, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे, राममंदिराची उभारणी वेगात चालू आहे, असे असूनही रामसेतू तोडणार्या प्रकल्पाच्या समर्थनार्थ ठराव करण्याची दुर्बुद्धी होणे, हा द्रमुकच्या विनाशाचा प्रारंभ समजायचा का ?
रामसेतू हिंदूंचे श्रद्धास्थान
द्रमुकला प्रभु श्रीराम त्यांचा वाटत नसला, तरी तो भारताचा युगपुरुष आणि अवतार आहे. विदेशात प्राचीन स्मारके, महापुरुषांनी उभारलेल्या वास्तू, साहित्य यांचे जतन केले जाते. भारतात एकेकाळी आदर्श राज्यकर्ता म्हणून रामराज्याचे उदाहरण जगासमोर ठेवणार्या श्रीरामाशी संबंधित प्रत्येक गोष्टीचे जतन करायला नको का ? कॅनडा येथील त्सुनामी तज्ञ प्रा. एस्. मूर्ती यांनी ‘जलमार्गाची दिशा दक्षिण पूर्व ठेवली, तर त्सुनामी थेट केरळच्या किनार्यावर धडकेल आणि तीच पालटली, तर लाभ होऊ शकतो’, असे सांगितले. रामसेतूविषयी त्सुनामीसारख्या आपत्तीच्या अनुषंगाने तपशीलात अभ्यास केला पाहिजे. रामसेतू समुद्रात असल्यामुळे त्याचा त्सुनामी रोखण्यात निश्चितच लाभ होऊ शकतो; मात्र तो किती होईल ? यासाठी अभ्यास आवश्यक आहे. सागरी जीव तज्ञांच्या मते रामसेतूला हानी पोचवली, तर तेथील सागरी जीवसृष्टीवर मोठा परिणाम होईल.
सेतूसमुद्रम् प्रकल्पाला होणार्या विरोधाची अनेक कारणे असली, तरी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रामसेतू हा हिंदूंच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे ‘केंद्रशासनाने यामध्ये लवकर हस्तक्षेप करून रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे’, अशी हिंदूंची इच्छा आहे. केंद्रशासनाने त्यात विलंब केला, तर ज्याप्रमाणे राममंदिराच्या बांधकामासाठी हिंदूंना रस्त्यावर उतरावे लागले होते, तोच भाग रामभक्तांंना येथेही करावा लागेल. असे होण्यापेक्षा केंद्राने रामसेतूला हानी पोचवू शकणार्या या प्रकल्पालाच पूर्णविराम देऊन हिंदूंच्या धर्मश्रद्धा जपाव्यात, हीच अपेक्षा !
रामसेतूच्या रक्षणासाठी रामभक्त हिंदूंनी रामनामाचा जप करत वैध मार्गाने आंदोलन उभारावे ! |