‘स्टँडअप कॉमेडी’चा अधिकार; पण स्वातंत्र्याचा स्वैराचार अमान्य ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अवमानाचे प्रकरण

  • कुणाल कामरा याने क्षमा मागितली नाही, तर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा

मुंबई, २४ मार्च (वार्ता.) : सामाजिक माध्यमांत एका व्यंगात्मक गाण्याच्या व्हिडिओमध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख ‘गद्दार’ केला. याचे पडसाद २४ मार्च या दिवशी विधानसभेत उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्टँडअप कॉमेडी करण्याचा सर्वांना अधिकार आहे; पण स्वातंत्र्याचा स्वैराचार मान्य नाही’, अशा शब्दांत कुणालला सुनावले. या प्रकरणी ‘कामरा याने शिंदे यांची क्षमा मागितली पाहिजे, अन्यथा त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल’, अशी चेतावणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कुणाल कामराने गायिलेले विडंबनात्मक गाणे –

(हा व्हिडिओ देण्यामागे कुणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने देत आहोत. – संपादक)

कुणाल कामरा याच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घ्या !

सभागृहात शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर विषय मांडतांना म्हणाले की, कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांचा अवमान केला आहे, शिवाय यापूर्वी त्याने हिंदु संस्कृती, तसेच हिंदु देवतांचे विडंबन करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. असे करून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. कुणाल कामरा हा सुपार्‍या घेऊन वातावरण दूषित करत आहे. त्याचा बोलविता धनी कोण आहे, त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे. अशी विकृती पुन्हा डोके वर काढू नये, यासाठी कामरा याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत. त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार खोतकर यांनी या वेळी केली.

कामरा याच्यावर कठोर कारवाईसाठी भाजप-शिवसेना आमदार आक्रमक !

त्यानंतर सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. कामरा याच्यावर कारवाईसाठी आमदारांनी अध्यक्षासमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाल्याने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. सभागृहात गदारोळ चालू असतांना विरोधी सदस्यांपैकी एकानेही कुणाल याचा निषेध केला नाही, उलट त्याला समर्थन असल्यासारखे विरोधक शांत बसले होते.

कुणाल कामरा याच्यावर कठोर कारवाई करून त्याला धडा शिकवणार ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा असा अवमान करणे, ही गंभीर गोष्ट आहे. कामरा याने केवळ प्रसिद्धीसाठी हे कृत्य केले आहे. महाराष्ट्रातील जनतेने वर्ष २०२४ मध्ये कोण ‘गद्दार’ अन् कोण ‘खुद्दार’ हे दाखवून दिल्याचे त्याला ठाऊक असायला हवे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कुणाकडे गेला ? हे जनतेने ठरवलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या पातळीवरील कॉमेडी करून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असा अनादर करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तुम्ही कॉमेडी अवश्य करा; पण त्याद्वारे कुणी अवमानित करण्याचे काम करत असेल, तर हे सहन केले जाणार नाही. कुणाल कामरा याने असे कृत्य केल्यावर त्याचे काही विरोधी सदस्य समर्थन करतात, हे दुर्दैवी आहे. कुणाल कामरा जे राज्यघटनेचे पुस्तक दाखवत आहेत, ते त्यांनी वाचले असेल, तर त्यातच सांगितलेले आहे की, स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसर्‍याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. कुणाल कामरा याच्यावर कठोर कारवाई करून त्याला धडा शिकवला जाईल.