
मुंबई – गोड्या पाण्यातील मासेमारीमुळे भोई आणि इतर समाजांतील मासेमारी करणार्या मासेमारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी सक्षम धोरण आखण्याचा हेतू मत्स्य विभागाचा आहे. जेणेकरून हे मासेमार आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि गोड्या पाण्याच्या मासेमारीत महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या ३ क्रमांकांत येईल. मासेमारांसाठी स्वतंत्र योजना चालू करण्याचा प्रयत्न आहे. तलावाचा गाळ काढणे आणि तलावांवरील अतिक्रमण हटवणे यालाही मत्स्यव्यवसाय खात्याकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी अभ्यास गट बनवले जातील. नेदरलँड, सिडनी आणि इंडोनेशिया या देशांप्रमाणे महाराष्ट्रातही मत्स्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी २४ मार्च या दिवशी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
वातावरणामुळे निर्माण झालेल्या आंबा बागायतदारांच्या समस्या तातडीने सोडवण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार मोठ्या अडचणीत आले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे मोहोर गळू लागल्यामुळे आंब्यांची गुणवत्ता देखील घसरत आहे. परिणामी यावर्षी मर्यादित स्वरूपात आलेले आंब्यांचे उत्पादन आणखी घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूण परिस्थितीचा विचार करता आंबा उत्पादक शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात हानी सोसावी लागणार आहे. ही समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन आंबा आणि इतर फळबागायतदार संघटनेने राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना दिले आहे.