पेण अर्बन बँक आणि संचालक यांची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करणार ! – बाळासाहेब पाटील, सहकार मंत्री

मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील खातेदार आणि गुंतवणूकदार यांच्या समवेत वर्ष २०१० मध्ये ५९७ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संचालकांसह बँकेच्या जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांच्या ठेवीची रक्कम परत करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी २४ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. सदस्य पराग शाह यांनी हा तारांकित प्रश्न विचारला होता. या वेळी झालेल्या चर्चेत भाजपचे सदस्य प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेतला.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, या प्रकरणी अनेक चौकशी झाल्या आहेत. हे प्रकरण किचकट झाले आहे. या प्रकरणातील दोषी संचालकांच्या ९७ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. बँकेचा परवाना रहित करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या बँकेचे एकूण ५८ सहस्र २०४ खातेदार असून त्यांच्या एकूण ८६ कोटी ठेवी आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेण अर्बन बँकेवर लागू केलेल्या आर्थिक निर्बंधामुळे ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करता येत नाहीत. बँक अवसायानात काढण्याविषयी काही लोकांचा विरोध, तर काही लोकांचा पाठिंबा होता, त्यामुळे बँक अवसायानात काढता आली नाही.