लक्षतीर्थ वसाहतीमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या अमृतमहोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने भव्य वैकुंठगमन सोहळ्यास प्रारंभ !

दिंडीत आषाढी वारीतील शितोळे सरकार यांचा मानाचा अश्व सहभागी !

सोहळ्यासाठी सिद्ध करण्यात आलेला विशेष गरुड आणि श्री तुकाराम महाराज यांची मूर्ती

कोल्हापूर, २४ मार्च (वार्ता.) – लक्षतीर्थ वसाहतीमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या अमृतमहोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने २४ ते २८ मार्च या कालावधीत भव्य वैकुंठगमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचा प्रारंभ २४ मार्चला सकाळी ७ वाजता भव्य दिंडी सोहळ्याने झाला. यात पालखीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा ठेवण्यात आली होती. टाळ, मृदंग घेतलेले बालवारकरी, ‘ज्ञानोबो-तुकाराम’चा जयघोष, आषाढी वारीतील शितोळे सरकार यांचा मानाचा अश्व सहभागी झाल्याने लक्षतीर्थ वसाहतीमधील वातावरण चैतन्यमय झाले होते. दिंडीच्या स्वागतासाठी संपूर्ण वसाहतीत ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांच्या रांगोळ्या काढल्या होत्या, तसेच ठिकठिकाणी पालखीला ओवाळण्यात आले.

दिंडीच्या कालावधीत धावणारा माऊलींचा अश्व

या सोहळ्याच्या निमित्ताने तुकोबारायांचा २१ फुटी गरुडावर आरूढ होऊन वैकुंठगमन करणार्‍या दृश्याचा देखावा केला असून हा गरूड दिंडीत सहभागी होता. प्रारंभी ह.भ.प. श्रीगुरु हरिप्रसाद महाराज देहूकर यांच्या हस्ते अश्वपूजन झाले. सोहळ्यात अश्वांच्या विशेष उपस्थितीत ‘उभे रिंगण’ आणि ‘गोल रिंगण’ पार पडले. डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा अनेकांनी ‘याची देही-याची डोळा’ पाहिला.

सोहळ्यात सहभागी डावीकडून ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, ह.भ.प. बाबा केसरकर, ह.भ.प. महादेव महाराज यादव आणि ह.भ.प. श्रीगुरु हरिप्रसाद महाराज देहूकर (उजवीकडे)

या दिंडीत ह.भ.प. बाबा महाराज केसरकर, ह.भ.प. महादेव महाराज यादव, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज यादव, ह.भ.प. उद्धव महाराज काजवे, ह.भ.प. अजित शिंदे यांच्यासह सर्वश्री विलास तवार, प्रथमेश मोरे, अजित शिंदे, सुरेश चाचुर्डे यांच्यासह वारकरी, भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिंडी झाल्यावर ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ झाला. प्रतिदिन सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत कीर्तन होत आहेत.