मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – मुंबई येथील विद्याविहारमधील के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, एस्.के. सोमय्या विनय मंदिर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स या महाविद्यालयांत बनावट गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करून विद्यार्थ्यांनी इयत्ता ११ वीमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवल्याचे निदर्शनास आले आहे. ५१ विद्यार्थ्यांना बनावट गुणपत्रिका दिल्याप्रकरणी २ लिपिकांना निलंबित करण्यात आले आहे, तर या प्रकरणी १० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज्यातील इतर महाविद्यालयांत असे प्रकार होत असण्याविषयी कुणी तक्रार केल्यास चौकशी करून संबंधित दोषी महाविद्यालयांवरही कारवाई केली जाईल, अशी माहिती मंत्री पंकज भुईर यांनी विधानसभेत दिली. २४ मार्च या दिवशी विधानसभेत सदस्य सुनील प्रभू यांनी हा तारांकित प्रश्न विचारला होता.