
पणजी, २४ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती असलेले धडे आता पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जाणार आहेत. त्यांच्या शौर्याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा विधानसभा अधिवेशनात भाजपचे आमदार कृष्णा साळकर यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तरादाखल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित धडे इयत्ता ४ थी आणि इयत्ता ७ वीमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. गोव्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कार्यवाही चालू झालेली आहे. गोव्यात राष्ट्रीय शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाची (एन्.सी.ई.आर्.टी.ची) पाठ्यपुस्तके लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी आणि सहावी यांसाठी ही पुस्तके लागू करण्यात आलेली आहेत. उर्वरित इयत्ता चौथी, पाचवी, सातवी, आठवी, नववी आणि दहावी यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाची पाठ्यपुस्तके लागू होणार आहेत. ही पुस्तके अजून आलेली नाहीत. ही पुस्तके आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह देशासाठी मोठे योगदान दिलेले राष्ट्रपुरुष यांचे धडे अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाणार आहेत. सध्या मराठीमध्ये ‘खंडोजींचे कर्तव्यपालन’ आणि इंग्रजीत ‘मराठा’ हे धडे अभ्यासक्रमात आहेत.’’