गोवा विधानसभा अधिवेशन

पणजी, २४ मार्च (वार्ता.) – राज्यातील रस्त्यावरील रहदारीचा ताण अल्प करण्यासाठी पेडणे ते काणकोण अर्ध्या घंट्यात पोचणारी रेल्वे सेवा चालू केली जाणार आहे. त्यासाठी मये, नेवरा आणि सारझोरा येथील रेल्वेस्थानकांची आवश्यकता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली. सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘नेवरा स्थानक हे प्रवाशांसाठी नसून ते केवळ ‘क्रॉसिंग’साठी असणार आहे. करमळी रेल्वेस्थानकावर अधिक गाड्या थांबाव्यात यासाठी रेल्वेमंत्र्यांकडे सविस्तर बोललो आहे. करमळी येथून २० मिनिटांत पणजीत पोचता येत असल्याने करमळी येथे स्थानिक आणि पर्यटक यांच्या दृष्टीने अधिक रेल्वेगाड्या थांबणे आवश्यक आहे. करमळी येथे जलद रेल्वे थांबण्यासाठी करमळी स्थानकाची आवश्यकता आहे.’’ चर्चेत सहभाग घेतांना वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो म्हणाले, ‘‘प्रस्तावित मये, नेवरा आणि सारझोरा ही रेल्वेस्थानके वर्ष १९९८ मध्ये संमत झालेली आहेत आणि कोकण रेल्वेमार्गावरील वाढत्या रेल्वेवाहतुकीमुळे ही स्थानके आवश्यक आहेत.’’