योजना मार्गी लागण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी चालू केले उपोषण
दोडामार्ग – केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ (प्रत्येक घरी पिण्याचे पाणी) योजनेच्या अंतर्गत जलजीवन मिशनच्या माध्यमातून करण्यात येणारे कुडासे गावातील नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या २ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले आहे. संबंधित अधिकार्यांना याविषयी कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कुडासे ग्रामपंचायत सदस्य आत्माराम जिवबा देसाई यांनी २४ मार्च या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे. (अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसह पिण्याचे पाणी प्रत्येकाला मिळणे ही सुद्धा मूलभूत गरज आहे. असे असतांना त्यादृष्टीने चालू करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम २ वर्षे रखडवून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करायला लावणारे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक)
केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ (प्रत्येक घरी पिण्याचे पाणी) योजनेच्या अंतर्गत जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत कुडासे गावातील भरपाल, धनगरवाडी, राऊळवाडी, भोमवाडी आणि इतर वाड्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी ७३ लाख रुपये संमत करण्यात आले. त्यानंतर नळपाणी पुरवठा योजनेचे काम वर्ष २०२१ मध्ये चालू करण्यात आले; मात्र वर्ष २०२५ चालू झाले तरी योजनेचा लाभ गावातील एकाही ग्रामस्थाला मिळालेला नाही. संबंधित ठेकेदार आणि ग्रामीण पुरवठा अधिकारी यांच्यातील संगनमतामुळे गेल्या २ वर्षापासून हे काम रखडले आहे. केंद्र सरकारची ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कामावर लक्ष ठेवून ती पूर्ण करून घेणे बंधनकारक होते; पण तसे झाले नाही. त्यामुळे कामे अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, असा देसाई यांचा आरोप आहे. या उपोषणाला गावातील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आदींनी पाठिंबा दिला आहे.