
पणजी, २४ मार्च (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने कवळे, फोंडा येथील मठाधीश श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामी यांच्या विरोधात फोंडा पोलिसांनी नोंदवलेला प्रथमदर्शनी गुन्हा रहित केला आहे. वर्ष २०१८ मधील एका प्रकरणात फोंडा पोलिसांनी १५ जानेवारी २०२५ या दिवशी श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामी, तसेच अवधूत शिवराम काकोडकर आणि अधिवक्ता मनोहर आडपईकर यांच्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा नोंद केला होता. यामध्ये श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामी यांनी मठाची मालमत्ता अवैधपणे विक्री करणे आणि बनावट दस्तऐवज सिद्ध करून फसवणूक करणे, असे आरोप करण्यात आले होते. श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामी यांनी हे आरोप निराधार असल्याचा दावा करून त्यांच्या विरोधात नोंद झालेला प्रथमदर्शनी अहवाल रहित करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रविष्ट (दाखल) केली होती. गोवा खंडपिठाने २४ मार्च या दिवशी स्वामीजींच्या विरोधातील प्रथमदर्शनी अहवाल रहित करून ही याचिका निकालात काढली. न्यायालयाच्या निकालाविषयी अधिक माहिती देतांना मठाचे अधिवक्ता म्हणाले, ‘‘या प्रकरणी याचिकादारांनी कोणताही गुन्हा केलेला नाही आणि त्यांचा गुन्हा करण्याचा उद्देशही नव्हता. त्याचप्रमाणे या प्रकरणी फोंडा पोलिसांनी सरकारने रहित केलेल्या भारतीय दंड संहिता या जुन्या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. न्यायालयाने याचिकादारांचे म्हणणे मान्य करून स्वामीजींच्या विरोधातील प्रथमदर्शनी अहवाल रहित केला आहे.’’