नवीन शैक्षणिक वर्ष ७ एप्रिलपासून चालू करण्यास उच्च न्यायालयाची गोवा सरकारला अनुमती

पणजी, २४ मार्च (वार्ता.) – शिक्षण खात्याचा ७ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष चालू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून चालू करण्यासंबंधी मसुदा अधिसूचित करण्यास सरकाला अनुमती दिली आहे आणि एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष चालू करण्यास विरोध करणारी पालकांची याचिका निकाली काढली आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून चालू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी  याचिका २४ मार्च या दिवशी गोवा खंडपिठासमोर सुनावणीसाठी आली. या वेळी खंडपिठाने शिक्षण खात्याने एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष चालू करण्यासाठी सिद्ध केलेल्या मसुद्याची पडताळणी केली. या प्रकरणी २७ मार्चपर्यंत लोकांच्या हरकती स्वीकारल्या जाणार असल्याचे सरकारने खंडपिठाला सांगितले. या निवेदनानंतर न्यायालयाने शिक्षण खात्याला ही प्रक्रिया पूर्ण करून लवकरच मसुद्यातील नियम अधिसूचित झाल्यास एप्रिल मासाच्या पहिल्या आठवड्यात शैक्षणिक वर्षाला प्रारंभ करता येईल, असे सांगितले. मुसद्यानुसार इयत्ता १ ली ते ५ वी आणि इयत्ता ११ वी यांचे नवीन शैक्षणिक वर्ष नेहमीप्रमाणे जून मासाच्या पहिल्या आठवड्यात, तर इयत्ता ६ वी ते १० वी आणि इयत्ता १२ वी यांचे नवीन शैक्षणिक वर्ष ७ एप्रिलपासून चालू होणार आहे. ७ एप्रिलपासून प्रतिदिन सकाळी ११.३० वाजेपर्यंत वर्ग घेतले जाणार आहेत, तर मे मासात उन्ह्याळ्याची सुटी असणार आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा शाळा चालू होणार आहे.