सातारा, २४ मार्च (वार्ता.) – शहरातील अनेक रहिवासी इमारतींमध्ये लोकांनी थुंकू नये; म्हणून जीन्याच्या कोपर्यांमध्ये हिंदु धर्मातील देवी आणि देवता यांची चित्रे लावण्यात आली आहेत. लोक यावर नकळत थुंकतात. त्यामुळे देवतांचा अपमान होत आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे संबंधित इमारतींचे मालक, अपार्टमेंट तथा सोसायटीचे अध्यक्ष यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. विजय कृष्णा गाडवे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, या प्रकारामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन त्यांच्यात संताप निर्माण होत आहे. ते क्रोधित होत आहेत. त्यामुळे संबंधित इमारत मालक आणि हिंदु धर्मीय यांच्यात तंटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी संबंधित इमारतींमधील देवतांची चित्रे समयमर्यादेत हटवण्यासाठी इमारत मालक, अपार्टमेंट तथा सोसायटीचे अध्यक्ष यांना योग्य त्या सूचना द्याव्यात. याविषयी कोणतीही दिरंगाई झाल्यास संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात यावा.
संपादकीय भूमिकादेवतांच्या चित्रांवर थुंकणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी निवेदन द्यावे लागणे, हे हिंदूंसाठी दुर्दैवी ! |