सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठीचे उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित !

सावंतवाडी – येथील उपजिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे तात्काळ भरण्यासाठी युवा रक्तदाता संघटना आणि ‘सामाजिक बांधीलकी’ या संघटनांनी २४ मार्च  या दिवशी उपोषण चालू केले होते. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चौगुले यांनी मागण्यांच्या पूर्ततेविषयी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

युवा रक्तदाता संघटना आणि सामाजिक बांधीलकी या संघटनांनी उपजिल्हा रुग्णालयात हृदयरोगतज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, फिजिशियन यांच्यासह अन्य मान्यता मिळालेली कर्मचार्‍यांची पदे, तसेच सुरक्षारक्षक यांची पदे भरण्याची मागणी केली होती. ती पूर्ण न झाल्याने हे आंदोलन करण्यात आले.

‘या उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेच्या सूत्रावर वैयक्तिक लक्ष देऊन ती करून घेण्यात येईल. रुग्णांना विनाकारण संदर्भित (संदर्भित म्हणजे अन्य रुग्णालयात पाठवणे) केले जाणार नाही. वैद्यकीय अधिकारी रुग्णांसमवेत मराठीतून संवाद साधतील. अन्य समस्यांविषयी वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल’, असे डॉ. चौगुले यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात म्हटले आहे.

या वेळी प्रा. सतीश बागवे, रवि जाधव, देव्या सूर्याजी, अधिवक्ता संदीप निंबाळकर, अधिवक्ता नकुल पार्सेकर आदींनी विचार मांडले. ‘आरोग्य विभागाच्या गलथान  कारभाराच्या विरोधात लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

संपादकीय भूमिका

आरोग्याविषयीच्या समस्या सुटण्यासाठी जनतेला उपोषण किंवा आंदोलन करावे लागणे, हे आरोग्य यंत्रणेला लज्जास्पद !