जागतिक आनंद दिनाच्या निमित्ताने ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या ‘वेलबिइंग रिसर्च सेंटर’ने २० मार्च या दिवशी ‘जागतिक आनंद निर्देशांक २०२५’ घोषित केला. १४७ देशांच्या आनंदाच्या क्रमवारीत १० पैकी ७.७ गुण प्राप्त करून ‘फिनलंड’ देश पहिल्या क्रमांकावर आहे. सलग ८ व्या वर्षी ‘फिनलंड’ने जागतिक आनंद निर्देशांकाच्या क्रमवारीत पहिले स्थान प्राप्त केले, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. ४.३ गुण प्राप्त करून ‘भारत’ या क्रमवारीत ११८ व्या स्थानावर आहे. यापूर्वी वर्ष २०२१ मध्ये भारत १३९ व्या, वर्ष २०२२ मध्ये १३६ व्या, तर वर्ष २०२३ मध्ये १२६ व्या स्थानावर होता. त्यामुळे मागील काही वर्षांच्या क्रमवारीनुसार भारताची आणखी आनंदाच्या दिशेने वाटचाल चालू आहे, असे म्हणायला हरकत नाही; परंतु या अहवालामधील काही गोष्टी अचंबित करणार्या आहेत. केवळ अचंबित करणार्या नव्हेत, तर या अहवालाच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणार्या गोष्टी आहेत. याचे कारण युक्रेन, मोझांबिक, इराण, इराक, पाकिस्तान, पॅलेस्टाईन, काँगो, युगांडा, गांबिया आणि व्हेनेझुएला आदी युद्धाची स्थिती, राजकीय हेवेदावे, आर्थिक समस्या यांनी त्रस्त झालेले देश या क्रमवारीत भारताहून पुढे आहेत. राजकीय अस्थिरतेने ग्रासलेला, बेरोजगारीने जर्जर झालेला बांगलादेश १३४ व्या क्रमांकावर म्हणजे भारताहून केवळ ८ क्रमांकांनी मागे आहे. जेथे नागरिकांचे दैनंदिन जीवनही नरकयातनामय झाले आहे, जो महागाईने ग्रासला आहे, आतंकवादी कारवायांमुळे जर्जर झाला आहे, असा पाकिस्तानही भारताच्या पुढे म्हणजे १०९ व्या क्रमांकावर आहे. ज्या युरोपीय देशांतून प्रतिवर्षी सहस्रावधी नागरिक आनंदप्राप्तीसाठी भारतामध्ये येऊन भारतीय संस्कृतीचा अवलंब करतात, ते युरोपीय देश जागतिक आनंदाच्या पहिल्या २० क्रमांकांतील देशांमध्ये सर्वाधिक आहेत. त्यामुळे ऑक्सफर्डच्या ‘वेलबिइंग रिसर्च सेंटर’च्या सदस्यांनी हे सर्वेक्षण नेमके कोणत्या ‘आनंदावस्थेत’ (निकषांवर) केले आहे ? हे पडताळण्याची आवश्यकता आहे.
आनंदाच्या सर्वेक्षणामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, चीन, युरोपमधील देश किंवा अन्य कोणतेही देश भारतापेक्षा पुढे गेल्यास त्याचा भारताला आनंदच आहे; कारण भारत नेहमीच विश्वकल्याणाची कामना करत आला आहे आणि याचे गमक भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीमध्ये आहे. आनंदी असण्यामागे सर्वांत मोठे कारण असते, ते म्हणजे दुसर्याविषयी द्वेष, असुया न बाळगणे ! आनंदाचे गमकच यामध्ये दडलेले आहे. पाकिस्तान आणि चीन यांना भारत शत्रूराष्ट्र मानतो; मात्र त्यांच्याशी असलेले शत्रुत्व हे त्यांचे अहित करण्यासाठी नाही, तर त्यांच्या भारतविरोधी कारवायांपुरते सीमित आहे. याउलट पाकिस्तानचा भारतद्वेष हा भारतियांना नष्ट करण्यासाठी आहे. हा भारत आणि अन्य राष्ट्र यांच्यातील भेद आहे. असे असूनही पाकिस्तानसारखी राष्ट्रे आनंदाच्या क्रमवारीत भारताच्या पुढे असणे, हेच या सर्वेक्षणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
पाश्चात्त्य आनंदप्राप्तीसाठी भारतात येतात !

जगामध्ये भारत अन्य देशांपेक्षा वेगळा समजला जातो, तो येथील आध्यात्मिकतेमुळे ! अन्य देश स्वत:च्या उत्कर्षापुरते सीमित आहेत; मात्र भारताची परंपरा विश्वकल्याणाची आहे. आपण सुखी व्हावे आणि शेजार्यांनी दु:खी असावे, ही भारताची संस्कृती नाही. संत ज्ञानेश्वर माऊली पसायदानामध्ये म्हणतात ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘जो जें वांच्छिल तो ते लाहो । प्राणिजात ।।’ विश्वाच्या कल्याणाची कामना करणारी येथील संत परंपरा आणि या महान परंपरेचे अनुकरण करणारे भारतीय आहेत. भगवद्गीता असो, वेद-उपनिषदे असो, रामायण, भागवत असो भारतातील कोणताही आध्यात्मिक ग्रंथ विश्वाला दु:खातून बाहेर पडून आनंदी होण्याचा मार्ग दाखवतो. असा एकही ग्रंथ पाश्चात्त्यांच्या इतिहासात शोधूनही सापडत नाही. भारताचा आध्यात्मिक वारसाच इतका श्रेष्ठ आहे की, तो तलवारीने किंवा कोणत्या आमिषाने कुणाच्या गळी उतरवण्याची आवश्यकता नाही. नुकत्याच प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वामध्ये शेकडो पाश्चात्त्यांनी हिंदु धर्मामध्ये प्रवेश केला. प्रतिवर्षी अनेक पाश्चात्त्य हिंदु संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतात येतात. आनंदाच्या सर्वेक्षणाकरता ‘वेलबिइंग रिसर्च सेंटर’ने जे निकष लावले आहेत, त्यांचा त्याग करून प्रतिवर्षी अनेक पाश्चात्त्य आनंदाच्या शोधात भारतात येतात आणि हिंदु धर्माचा स्वीकार करतात. यातून आनंद हा संपत्ती, स्वातंत्र्य, आरोग्य यांच्या पलीकडे आहे, हे ‘वेलबिइंग रिसर्च सेंटर’ने लक्षात घ्यावे. ते जे सर्वेक्षण करत आहेत, ते भौतिक सुखापुरते सीमित आहे.
आनंदाचे नव्हे, सुखाचे मोजमाप !
‘वेलबिइंग रिसर्च सेंटर’कडून वर्ष २०१२ पासून जागतिक आनंदाची क्रमवारी घोषित करण्यात येते. यासाठी विविध देशांमधील १ सहस्र नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येते. आरोग्य, संपत्ती, स्वातंत्र्य, औदार्यता, भ्रष्टाचारमुक्त जीवन आदी विविध घटकांच्या आधारे नागरिकांच्या जीवनमानाचे अवलोकन करून त्यांच्या आनंदाचे अनुमान काढले जाते आणि १० पैकी गुण दिले जातात. ‘वेलबिइंग रिसर्च सेंटर’, ‘गॅलप’ आणि ‘युनायटेड नॅशनल सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क’ यांच्या भागीदारीत म्हणजे आर्थिक साहाय्य घेऊन हे सर्वेक्षण करते. ‘गॅलप’चे विशेष कार्यकारी अधिकारी जॉन क्लिफ्टन यांनी आनंदाच्या या क्रमवारीविषयी मतप्रदर्शन करतांना ‘आनंद हा केवळ पैशाला केंद्रबिंदू मानून मोजमाप केला जात नाही’, असे म्हटले. जॉन क्लिफ्टन यांचे मत योग्यच आहे. आनंदाचे मोजमाप पैशावरून झाले असते, तर जगातील धनाढ्यच आनंदी दिसले असते. संपत्ती, आरोग्य, स्वातंत्र्यता आदी जे आनंदाच्या सर्वेक्षणासाठी त्यांनी निकष निवडले आहेत, ते अत्यंत तकलादू आहेत. हे आनंदाचे नव्हे, तर सुखाचे निर्देशांक आहेत.
जीवनातील हे घटक न्यून-अधिक होत असतात. जेव्हा ते असतील, तेव्हा मनुष्य स्वत:ला सुखी समजतो आणि नसल्यास तो दु:खी होतो. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील या सुख-दु:खाच्या पलीकडे आनंद असतो. पाश्चात्त्य देशांची सुखाची कल्पना ही भौतिक गोष्टींवर अवलंबून आहे; मात्र आनंद या भौतिक गोष्टींच्या त्यागातून मिळतो. भगवंत हाच शाश्वत आहे आणि ‘सच्चिदानंद’ हे त्याचे गुणवैशिष्ट्य आहे. भारतात अनेक संत भौतिक सुखाचा त्याग करून ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतात आणि निरंतन आनंद प्राप्त करतात. पाश्चात्त्यांना खरोखरच आनंदाचा निर्देशांक शोधायचा असेल, तर त्यांनी प्रथम भारतीय संस्कृतीचा अभ्यास करावा. साधना समजून घ्यावी. स्वत: साधना करून आनंदाची आत्मानुभूती घ्यावी लागेल. जीवनात आनंदाची अनुभूती न घेताही आनंदाचे सर्वेक्षण करणे, हेच मुळात हास्यास्पद आहे. सध्या भौतिक सुखाला आनंद समजून त्याचे सर्वेक्षण चालू आहे. यामध्ये पाश्चात्त्यांची काही चूक नाही; कारण त्यांचे पंथ तेवढ्यापुरतेच सीमित आहेत; मात्र यातून भारताच्या महान संस्कृतीची श्रेष्ठता अधोरेखित होते, हे निश्चित !
पाश्चात्त्यांना खरोखरच आनंदाचा निर्देशांक शोधायचा असेल, तर त्यांनी प्रथम भारतीय संस्कृतीचा अभ्यास करावा ! |