Ban ‘Halal Certificates’ : महाराष्ट्रात ‘हलाल प्रमाणपत्रां’वर बंदीची मागणी !

  • हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

  • उपमुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !

उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना निवेदन देतांना समितीचे श्री. सतीश सोनार, श्री. रवि नलावडे आणि शिवसेनेचे आमदार श्री. आनंद तिकडे (बोंडारकर)

मुंबई – उत्तरप्रदेश राज्यात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बेकायदेशीर ‘हलाल प्रमाणपत्रां’वर बंदी घातली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने नुकतीच उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हलाल उत्पादनांवर बंदीची मागणी केली होती. या वेळी समितीचे मुंबई येथील श्री. सतीश सोनार, श्री. रवि नलावडे आणि नांदेड येथील शिवसेनेचे आमदार श्री. आनंद तिडके (बोंडारकर) हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा सचिव यांना प्रस्ताव सादर करण्याचे नुकतेच आदेश दिले. ‘सेक्युलर’ व्यवस्था असतांना धार्मिक आधारावर उत्पादनांचे प्रमाणीकरण घटनाबाह्य असून जर महाराष्ट्रात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घातली गेली, तर आम्ही या निर्णयाचे स्वागतच करू’, असे समितीने म्हटले आहे.


१. खाद्यपदार्थांच्या संदर्भात कायद्यानुसार ‘भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) या शासकीय संस्थेला खाद्यपदार्थांचे मानके ठरवण्याचा आणि प्रमाणपत्र देण्याचा अधिकार देण्यात आला आहे; मात्र ‘हलाल प्रमाणन’ ही समांतर प्रणाली उभी करण्यात आली आहे, जी खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेविषयी भ्रम निर्माण करून सरकारी नियमांचे उल्लंघन करते.

२. महाराष्ट्रासह देशभरात ‘हलाल इंडिया’, ‘हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद’, ‘जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र’ आदी अनेक संस्थांकडून बेकायदेशीरपणे हलाल प्रमाणपत्रांचे वाटप करून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात येत आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेशात त्यावर बंदी आणण्यात आली.

३. स्वत: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनीही ‘खासगी संस्थांना प्रमाणपत्र वाटप करून पैसे गोळा करण्याचा अधिकार नाही’, असे स्पष्ट केले आहे. तसेच हा पैसा लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आदी आतंकवादी संघटनांच्या सुमारे ७०० आरोपींना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी वापरला जातो, हे अतिशय धक्कादायक आहे. म्हणूनच या संदर्भात निवेदनासह काही कागदपत्रेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सादर करण्यात आली होती.

४. या संदर्भात महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे हलाल प्रमाणपत्रे देणार्‍या खासगी संस्थांवर तात्काळ गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करावी; हिंदूंच्या संविधानिक अधिकारांवर आघात करणार्‍या हलाल प्रमाणीकरणावर त्वरित बंदी आणावी आणि हलालच्या नावाखाली खासगी संस्थांनी जमा केलेल्या निधीची चौकशी करून कारवाई करावी, हलाल प्रमाणपत्रांतून जमा केलेली अवैध संपत्ती व्याजासह वसूल करावी, या पैशांचा उपयोग कुठे केला आणि त्यातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला का, याविषयीही सखोल चौकशी करावी, अशा मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहेत.