…तिसरे महायुद्ध चालू होण्याची शक्यता ! – डॉ. शैलेंद्र देवळणकर, परराष्ट्र व्यवहार तज्ञ

युक्रेनने रशियाशी ‘गुरिल्ला प्रॉक्सी वॉर’ (गनिमी कावा युद्धपद्धती) पद्धतीने लढणे आणि युक्रेनी नागरिकांनी लढण्याची सिद्धता दर्शवणे

डॉ. शैलेंद्र देवळणकर

‘रशिया-युक्रेन युद्ध चालू होण्यापूर्वी युक्रेनमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाचे निकाल बऱ्यापैकी बाहेर आलेले आहेत. त्यानुसार ७० टक्के लोकांना ‘युक्रेनने ‘नाटो’चे सदस्यत्व घ्यावे’, असे वाटत आहे. झेलेंस्की हे त्या जनलोकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. या सर्वेक्षणामध्ये ‘रशियाशी संघर्ष झाला, तर आम्ही त्यासाठी सिद्ध आहोत, आम्हाला बंदुका दिल्या, तर आम्ही लढू’, असे म्हणणारे ६० टक्के लोक होते. याचा अर्थ या युद्धासाठी युक्रेनची वर्ष २०१४ पासून मानसिकता बनली होती. जेव्हा रशियाने सैनिकी कारवाई करून क्रिमिया भाग त्याच्याकडे घेतला, तेव्हापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात ‘गुरिल्ला प्रॉक्सी वॉर’ (गनिमी कावा युद्धपद्धती) चालू होते. त्यामुळे युक्रेनची जनता सिद्ध होती; पण रशिया सैनिकी कारवाई करील, अशा प्रकारची शक्यता कुणाला वाटत नव्हती.

तिसरे महायुद्ध चालू झाल्यास त्याला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हेच उत्तरदायी असतील !

आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची प्रतिमा जगापुढे वेगळ्या स्वरूपात पुढे आली आहे. युक्रेनकडून गनिमी कावा पद्धतीने युद्ध लढले जात आहे आणि ते रशियाच्या सैन्याला महागात पडत आहे. हे युद्ध लांबू नये, अशी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची इच्छा आहे. युक्रेनकडून कठोर प्रतिकार होत असल्याने हे युद्ध लांबत चालले आहे. त्याप्रमाणे रशियावरील दबावही वाढत आहे. या युद्धातून तिसऱ्या महायुद्धाला प्रारंभ होणार असून त्याला पुतिन हेच उत्तरदायी असतील. त्यामुळे अमेरिकेच्या ‘टाइम्स’ नियतकालिकाने पुतिन यांची तुलना हिटलरशी केली आहे. (साभार : ‘लोकमत यू ट्यूब’ वाहिनी)