Myanmar Earthquake : म्यानमारमध्ये ७.७ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप !

  • भारत, बांगलादेश, म्यानमार, थायलंड आणि चीन यांना बसले धक्के

  • २३ जणांचा मृत्यू, तर ८० जण कोसळलेल्या इमारतीखाली दबले

  • थायलंडमध्ये आणीबाणी घोषित

नेपिता (म्यानमार) – भारताच्या शेजारील देश म्यानमार आणि थायलंड या देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ७.७ इतकी होती. याची तीव्रता बांगलादेश, चीन आणि भारताची राजधानी देहलीपर्यंत जाणवली. भूकंपाचे केंद्र म्यानमारमधील मंडाले शहराजवळ भूमीच्या खाली १० किलोमीटरवर होते. या भूकंपात आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे.

१. भूकंपाच्या धक्क्यानंतर थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये शेकडो लोक इमारतींमधून बाहेर पडले. भूकंप इतका शक्तीशाली होता की, त्यामुळे उंच इमारतींमध्ये बांधलेल्या तलावांमधून पाणी वाहू लागले. भूकंपानंतर अनेक इमारतींमध्ये जोरदार कंपने जाणवल्याने त्या रिकाम्या करण्यात आल्या.

२. म्यानमारमध्ये नदीवरील एक मोठा पूल कोसळला आहे. बांधकाम चालू असलेली ३० मजली इमारत पूर्णपणे कोसळली. यात ८० जण दबले गेले, तर ३ जणांचा मृत्यू झाला.

३. मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसामुळे थायलंडचे पंतप्रधान पिथोंगटार्न शिनावात्रा यांनी आणीबाणी घोषित केली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून चिंता व्यक्त !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले की, म्यानमार आणि थायलंड येथील भूकंपानंतरच्या परिस्थितीविषयी मी चिंता व्यक्त करतो. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. भारत सर्वतोपरी साहाय्य करण्यास सिद्ध आहे. या संदर्भात आमच्या अधिकार्‍यांना सज्ज रहाण्यास सांगण्यात आले आहे. यासह परराष्ट्र मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंड सरकारांच्या संपर्कात रहाण्यास सांगण्यात आले आहे.