Mamata Faces Heated Protest : ऑक्सफर्ड विद्यापिठात विद्यार्थ्यांनी ममता बॅनर्जी यांचे भाषण बंद पाडले : विद्यार्थ्यांनी ‘परत जा’च्या दिल्या घोषणा !

बंगालमधील हिंसाचार, महिलांची असुरक्षितता यांवरून संतप्त विद्यार्थ्यांकडून ममता बॅनर्जी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार !

लंडन – जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या केलॉग महाविद्यालयामध्ये भाषणाच्या वेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विद्यार्थ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. निदर्शकांनी बंगालमधील हिंसाचार, आर्.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील बलात्कार प्रकरण आणि संदेशखली येथील महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण, यांविषयी ममत बॅनर्जी यांना प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी ‘ममता बॅनर्जी परत जा’ अशा जोरदार घोषणा दिल्या. यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘येथे राजकारण करू नका, हे राजकारणाचे व्यासपीठ नाही. माझ्या राज्यात या आणि माझ्यासमवेत राजकारण करा.’ (विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापासून पळ काढणार्‍या ममता बॅनर्जी ! – संपादक)

१. निदर्शकांनी केलेल्या गदारोळामुळे ममता बॅनर्जी यांना त्यांचे भाषण थांबवावे लागले. ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ने (‘एस्.एफ्.आय – यूके’ने) या निषेधाचे दायित्व  स्वीकारले. ममता बॅनर्जी यांच्या खोट्या दाव्यांविरुद्ध हा निषेध आहे, असे या संघटनेने  म्हटले आहे.

२. भाजपने म्हटले आहे की, विदेशात रहाणारे बंगाली हिंदूदेखील ममता बॅनर्जी यांना  मुख्यमंत्रीपदावरून हटवू इच्छितात; कारण त्यांनी बंगालचा वारसा नष्ट केला आहे.

३. भारत वर्ष २०६० पर्यंत जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल का ?, या प्रश्नावर ममता बॅनर्जी यांनी असहमती दर्शवली आणि म्हणाल्या की, याविषयी त्यांचे वेगळे मत आहे.

४. ममता बॅनर्जी यांच्या भाषणाचा व्हिडिओ प्रसारित करतांना भाजपचे नेते अमित मालवीय म्हणाले की, ममता बॅनर्जी यांना भारत जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्याविषयी समस्या आहे. हे लज्जास्पद आहे. विदेशात त्यांनी घटनात्मक पदाचा अपमान केला आहे.