रशियाकडून अमेरिकेच्या दूतावासातील उच्चाधिकार्‍याची हकालपट्टी

मॉस्को (रशिया) – येथील अमेरिकेच्या दूतावासातील दुसर्‍या क्रमांकाचे राजनैतिक अधिकारी आणि उपउच्चाधिकारी बार्ट गॉर्मन यांची रशियाने हकालपट्टी केली. गॉर्मन हे गेली ३ वर्षे रशियातील अमेरिकी दूतावासात कार्यरत होते. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी कोणतीही माहिती घोषित केलेली नसून अमेरिकेच्या दूतावासानेच रशियाच्या वृत्तसंस्थेला याची माहिती दिली.

‘युक्रेनवर आक्रमण केल्यास अमेरिका प्रत्युत्तर देईल’, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सतत देत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ही हकालपट्टी करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

युक्रेनवर आक्रमण झाले, तर भारत अमेरिकेला सहकार्य करील ! – अमेरिकेला विश्‍वास

‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय सीमेसाठी कटीबद्ध असणारा भारत अमेरिकेला सहकार्य करील’, असा विश्‍वास अमेरिकेने व्यक्त केला आहे.


ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या ४ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक झाली होती. या बैठकीत रशिया आणि युक्रेन यांच्या सूत्रावरही चर्चा झाली. त्या वेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी वरील विश्‍वास व्यक्त केला.