|
सातारा – वारकरी संप्रदायाचे संतवीर आणि ‘व्यसनमुक्त युवक संघा’चे संस्थापक ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या झालेल्या निर्णया’च्या राज्य शासनाच्या निर्णयाच्या विरोधात ३ फेब्रुवारीला आंदोलन केले. कोरोनाच्या काळात बेकायदेशीर आंदोलन केल्याच्या प्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी केली. ‘ते चौकशीला सहकार्य करत असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाही’, असे सातारा पोलिसांनी सांगितले. ‘उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांच्यावरील कलमे ही ७ वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची नसल्याने त्यांना अटक होऊ शकत नाही’, असेही सातारा पोलिसांनी सांगितले. शहर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ आंदोलकांविरुद्ध कलम २६९, २७०, १८८, ३७(१), ३७(३) आणि १३५ अन्वये गुन्हे नोंद केला आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांच्याकडून ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात पुणे येथील न्यायालयात खटला प्रविष्ट !पुणे – ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अधिवक्त्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी पुणे येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला प्रविष्ट केला आहे.
न्यायालयाने बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याची नोंद घेऊन त्यांच्यावर कठोर करावी, अशी मागणी त्यांनी त्यात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही ‘बंडातात्या यांच्यावर काय कारवाई केली ?’, याचा अहवाल पोलिसांकडे दोन दिवसांत मागितला आहे. |
ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्याकडून क्षमायाचना !
आंदोलनाच्या वेळी नेत्यांविषयी काही वक्तव्ये केल्याच्या प्रकरणी गदारोळ झाल्याने क्षमायाचना करतांना ह.भ.प. बंडातात्या प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला आहे, त्यांच्याशी मी प्रत्यक्ष दूरभाषवर बोललो आहे. माझे चुकले असेल, तर मी क्षमा मागण्यास सिद्ध आहे. ५० वर्षांच्या जीवनात मी कुणाचे वैयक्तिक चारित्र्य माझ्या प्रतिष्ठेचा विषय कधीच केला नाही.’’
ह.भ.प. बंडातात्या कराडकर आंदोलनाच्या वेळी काय म्हणाले होते ?
व्यसनमुक्ती संघटनेचे ‘दंडवत आणि दंडुका आंदोलन’ करतांना ह.भ.प. बंडातात्या कराडकर म्हणाले होते, ‘‘कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारू पित नाही, त्याचे नाव सांगा. पतंगराव कदम यांच्या मुलाचे निधन कसे झाले होते विचारा.’’ याच सूत्रावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची नावे घेतली होती. सुप्रिया सुळे यांना ‘मी खोटे बोलत असीन, तर सांगावे’ असे आव्हानही त्यांनी दिले. ‘त्यांनी पुरावा मागितला, तर सिद्ध करू शकतो’, असेही ते म्हणाले होते. ह.भ.प. बंडातात्या कराडकर या वेळी उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्या संदर्भात ‘ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही; पण गुण लागला’ असेही वक्तव्य केले होते. ‘‘मंत्रीमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारूविक्रीचा हा अत्याचार लादला आहे. व्यसनमुक्त युवक संघ गेली २५ वर्षे काम करत आहे. शासनाला चेतावणी देण्यासाठीच हे आंदोलन केले. लोकांवर भयंकर असा निर्णय लादण्यात आला आहे. हे आंदोलन येथे थांबणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रूप धारण करेल. त्यानंतर राज्य सरकारवर वाईन विक्रीची जी धुंदी चढली आहे, ती अल्प होईल आणि शासनाला हा निर्णय मागे घ्यावाच लागेल.’’ |