राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करा आणि त्यांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी निवेदन

मुंबई , १३ नोव्हेंबर (वार्ता.) – त्रिपुरा राज्यात काही मशिदी पाडल्याच्या कथित घटनांच्या निषेधार्थ भिवंडी, मालेगाव, मनमाड, अमरावती, हिंगोली, नांदेड आणि सांगली येथील ईश्‍वरपूर (इस्लामपूर) आदी ठिकाणी धर्मांधांनी १२ नोव्हेंबर या दिवशी नमाजानंतर मोर्चा काढला. यांतील काही ठिकाणी धर्मांधांनी मोर्च्याच्या वेळी दुकाने फोडून, रस्त्यावरील वाहनांची हानी करून दंगलसदृश आणि दहशतीचेही वातावरण निर्माण केले. त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पाळणे आणि मोर्चा काढणे, याचे कारण काय ? या प्रकरणाची माहिती देतांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हिंसक आंदोलन रझा अकादमीने केल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. तरी राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अराजक स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्याविषयी आणि त्यांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घालावी, या मागणीसाठी नांदेड, जळगाव येथे स्थानिक जिल्हा प्रशासनास मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात आले. यासह नंदूरबार, नाशिक, धुळे आणि नगर येथे जिल्हा प्रशासनांस ‘ई-मेल’द्वारे निवेदन पाठवण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक वेळी देशात किंवा विदेशात कुठेही मुसलमानांवर कथित अन्यायाची केवळ अफवा पसरताच त्याच्या विरोधात लगेच राज्यात हिंसक घटना घडतात. यावरून या घटना पूर्वनियोजित असतात, असे लक्षात येते. भिवंडी, मालेगाव, मनमाड, अमरावती, हिंगोली, नांदेड अशा अनेक ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात धर्मांध एकत्र आले, याची पोलीस प्रशासनास माहिती मिळाली नाही, हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे.

नांदेड येथे यांना निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी (डावीकडे) निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

१. नांदेड येथे यांना निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री श्री. शशिकांत पाटील, शहरप्रमुख श्री. रविकुमार चटलावार, शहरमंत्री श्री. गणेश कोकुलवार, डॉ. रमेश नारलावार, शीतल खांडील, महादेवी मठपती, सविता गायकवाड, निकिता शहापूरवाड, सर्वश्री महेश देबडवार, दिलीपसिंघ सोडी, प्रेमानंद शिंदे, संतोष ओझा, श्रीराज चक्रावार, पत्रकार गौरव वाळिंबे, धर्मप्रेमी श्री. सोपान सोनटक्के, श्री. मधुकर भरडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गणेश कोंडलवार उपस्थित होते.

जळगाव येथे तहसीलदार पंकज लोखंडे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

२. जळगाव येथे तहसीलदार पंकज लोखंडे यांनी निवेदन स्वीकारले.

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या

१. राज्यात ज्या ठिकाणी धर्मांधांनी मोर्चा काढून दगडफेक करून दंगलसदृश वातावरण निर्माण केले, तेथील सर्व आयोजक आणि दोषी धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
२. उत्तरप्रदेशात दंगलखोरांकडून हानीभरपाई घेतली जाते, त्यांची मालमत्ता जप्त केली जाते, असा कायदा आहे, त्यानुसार राज्यातही कठोर कायदा करावा.
३. रझा अकादमीकडून आझाद मैदान दंगल प्रकरणातील हानीभरपाई अद्याप वसूल केलेली नाही, तरी त्यासह या घटनेची हानीभरपाईही तात्काळ करण्यात यावी आणि दंगलखोर रझा अकादमीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी.