हिंदूंचे मानसिक आणि सांस्कृतिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न पुष्कळ पूर्वीपासून चालू आहे. विशेष करून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दीपावली अशा सणांना हिंदूंच्या प्रथा-परंपरा यांना अयोग्य ठरवण्याचा प्रयत्न असतो. कोणताही हिंदू सण जवळ आला की, त्यात काहीतरी वैगुण्य शोधून त्यावर अप्रत्यक्ष टीका करणारे विज्ञापन आणि संदेश सामाजिक माध्यमांवर प्रसारित होऊ लागतात.
‘फॅब इंडिया’ नावाच्या आस्थापनाने नव्या कपड्यांचा संच ‘जश्न-ए-रिवाझ’ नावाने विक्रीला काढला, ज्यात जाणीवपूर्वक उर्दू नाव तर देण्यात आलेच; शिवाय विज्ञापनात दाखवण्यात आलेल्या अभिनेत्रीने कपाळावर कुंकू लावले नव्हते. याचप्रकारे पुणे येथील सोन्याचा व्यवसाय करणार्या प्रसिद्ध आस्थापनाने केलेल्या विज्ञापनात दाखवण्यात आलेल्या ‘मॉडेल’च्या कपाळी कुंकू नव्हते आणि तोंडावळ्यावर सुतकी भाव होते. यावर सामाजिक माध्यमांमध्ये सक्रीय असणार्या लेखिका शेफाली वैद्य यांनी आक्षेप घेऊन ‘नो बिंदी नो बिझनेस’, असा ‘हॅशटॅग’ (मोहीम) चालू केला. याला हिंदूंनी भरभरून प्रतिसाद दिला आणि अखेर या आस्थापनाला कुंकू असलेल्या आणि तोंडावळ्यावर हसरे भाव असलेले ‘मॉडेल’चे छायाचित्र त्या जागी घ्यावे लागले. याचप्रकारे ‘फॅब इंडिया’लाही ‘उर्दू’ नाव असलेले विज्ञापन मागे घ्यावे लागले.
अशाच प्रकारे ऐन दीपावलीच्या दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबरला कवी संदीप खरे आणि वैभव जोशी यांनी पुणे शहरात ‘ईर्शाद’ या नावाखाली कार्यक्रम आयोजित केला होता. याला सामाजिक माध्यमांद्वारे हिंदूंनी जोरदार विरोध केला. यामुळे अखेर नमते घेत वैभव जोशी यांनी कार्यक्रम रहित केल्याचे घोषित केले. वर दिलेली उदाहरणे केवळ प्रातिनिधीक असून हिंदू जागृत झाल्यास काय घडू शकते ? याची ही झलकच आहे. हिंदू आता शांत न रहाता त्यांना जे जे अयोग्य वाटते त्याला निवेदन देणे, दूरभाषद्वारे निषेध नोंदवून, पत्र पाठवून, सामाजिक माध्यमांवर पोस्ट करून विरोध करत आहेत. याच्या परिणामांमुळेच अनेक आस्थापने, व्यक्ती यांना त्यांची विज्ञापने पालटावी लागत आहेत. हिंदूंनी हीच जागरूकता ठेवल्यास हिंदूविरोधी विज्ञापन करण्यापूर्वी १० वेळा विचार करावा लागेल, किंबहुना हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विज्ञापन ते करणारच नाहीत !
– श्री. अजय केळकर, सांगली