मुंबई – उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवावर बंदी आणल्यानंतर शिवसेनेने ‘पाकिस्तानात जाऊन दहीहंडी साजरी करायची का ?’ असा प्रश्न उच्च न्यायालयाला विचारला होता. मग ‘सत्तेत असतांना दहीहंडी उत्सव साजरी करण्यासाठी अनुमती का देत नाही ? कोणतीही गर्दी न करता आणि कोरोनाचे सर्व नियम पाळत दहीहंडी उत्सव साजरा करण्याची अनुमती द्यावी’, असे आवाहन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहीहंडीला अनुमती नाकारली आहे. यावर आशिष शेलार यांनी भूमिका व्यक्त केली.
या वेळी आशिष शेलार म्हणाले, ‘‘कोरोनाचे नियम पाळून उत्सवाला अनुमती देण्याची विनंती गोविंदा पथकाकडून करण्यात आली होती; मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही विनंती नाकारली. यातून महाविकास आघाडी सरकार तालिबानी संस्कृतीचा परिचय देत आहे का ? कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची चिंता गोविंदा पथक निश्चित घेतील.’’
कोणत्याही परिस्थितीत दहीदंडी साजरी करणारच ! – आमदार राम कदम, भाजप
मुख्यमंत्र्यांनी केवळ महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेला समर्थन करणार्या लोकांनाच चर्चेसाठी बोलावले होते. आम्ही स्वत: दहीहंडी उत्सवाचे आयोजक आहोत; मात्र आम्हाला चर्चेसाठी बोलावण्यात आले नाही. मद्याची दुकाने उघडण्यासाठी नियम आणि अटी लावून राज्य सरकार अनुमती देते, मग मंदिरे उघडण्यासाठी सरकार अनुमती का देत नाही ? महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ हिंदुविरोधी सरकार आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत दहीहंडी साजरी करणारच.