बांगलादेशमध्ये हिंदूंच्या गावावर धर्मांध संघटनेचे आक्रमण : ८० घरांची तोडफोड

कथित आक्षेपार्ह फेसबूक पोस्टमुळे आक्रमण

  •  केंद्र सरकार परदेशातील विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंच्या रक्षणार्थ कधी कृती करणार ?
  • देशात प्रतिदिन धर्मांधांकडून हिंदूंचा धर्म, देवता, ग्रंथ आदींचे विविध माध्यमांतून अवमान केला जात असतांना हिंदू कधीही असे पाऊल उचलत नाहीत किंवा कायदा हातात घेत नाहीत; मात्र धर्मांध जगात कुठेही त्यांच्या धर्माच्या विरोधात काही घडले, तर थेट कायदा हातात घेऊन हिंसाचार करतात, हे पुन्हा एकदा दिसून आले !
  • सामाजिक माध्यमांतून हिंदूंकडून इस्लामविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट केले जात  असल्याचे सांगत हिंदूंवर आक्रमण करण्याचा हा धर्मांधांचा नवा जिहाद आहे का ?

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील उपजिल्हा शाल्ला येथील सुमानगंजमधील  हिंदूंच्या नौगाव या गावावर १७ मार्चच्या दिवशी हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या सहस्रो धर्मांधांनी आक्रमण करून हिंदूंच्या ८० घरांची नासधूस केली. या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

१. १५ मार्च या दिवशी देराई उपजिल्हा येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेचे आमिर अल्लामा जुनैद बाबुनागुराई, व्यवस्थापकीय सह-सचिव मौलाना मुफ्ती मामुनुल हक आणि संघटनेचे इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी मामुनुल हक यांनी भाषणामध्ये नौगाव येथील एका हिंदु तरुणाने फेसबूकवर केलेल्या कथित पोस्टचा उल्लेख करत ‘त्याने माझ्यावर टीका केली’, असे म्हटले होते.

२. या भाषणाच्या दुसर्‍या दिवशी हिफाजतच्या स्थानिक नेत्यांनी सुमानगंजमध्ये आंदोलन करून हिंदूने केलेल्या पोस्टचा निषेध करण्यास प्रारंभ केला. यानंतर १७ मार्चला सकाळीच काशीपूर, नाचीन, चंदीपूर आणि इतर भागातील धर्मांधांनी नौगाव गावावर आक्रमण करत हिंदूंच्या घरांची तोडफोड केली.

३. ‘ढाका ट्रिब्यून’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या गावातील अनेक हिंदु कुटुंबांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी गाव सोडले आहे. अनेक हिंदूंनी गाव सोडल्यानंतर हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेच्या समर्थकांनी गावामधील अनेक घरांतील वस्तू चोरल्या आहेत.

४. बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही ट्वीट करत यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

त्यांनी म्हटले आहे, ‘बांगलादेशमधील इस्लामच्या सैनिकांनी सुमानगंजमधील एक हिंदूंचे वास्तव्य असलेले गाव उद्ध्वस्त केले. तसेच असे घडणे हे बांगलादेशमध्ये फार दुर्मिळ चित्र नाही’, असा खोचक टोला लगावत धर्मांध आक्रमणकर्त्यांचे छायाचित्र ट्वीट केले आहे.