सूर्यनारायणाचा महिमा आणि सनातनच्या ३ गुरूंचा त्याच्याशी असलेला संबंध

आज माघ शुक्ल पक्ष सप्तमी म्हणजेच रथसप्तमी (१९.२.२०२१) आहे. या निमित्ताने…

सूर्यनारायणाची पूजा : रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर सात घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ, अरुण सारथी व रथात सूर्यनारायण काढतात. सूर्यनारायणाची पूजा करतात. अंगणात गोवर्‍या पेटवून त्यांवर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात; म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात.

मकरसंक्रांत ते रथसप्तमी या काळातील कौटुंबिक विधी : सुनेचे तीळवण, जावयाचे प्रथम वाण आणि बाळाचे बोरवण करतात. या वेळी सून, जावई आणि बाळ यांच्यासाठी हलव्याचे दागिने करतात.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र)

सूर्यनारायण म्हणजे साक्षात् श्रीविष्णुच ! प्रातःकाली ऋग्वेद, माध्यान्हकाली यजुर्वेद आणि संध्याकालात सामवेद त्याची स्तुती करतात. त्या संदर्भातील भविष्यपुराणातील ब्राह्मपर्वामध्ये ७६ व्या अध्यायात म्हटले आहे,

ऋचो यजूंषि सामानि मूर्तिमन्तीह सर्वशः । । तत्कृतैर्विविधैः स्तोत्रैः स्तुवन्ति ऋषयो रविम् ॥ ३॥
मूर्तिमत्यः स्थितास्तत्र तिस्रः संध्याः शुभाननाः । गृहीतवज्रनाराचाः परिवार्य रविं स्थिताः । । ४ ॥

१. सूर्यनारायणाची उत्पत्ती

श्री. विनायक शानभाग

भविष्यपुराणातील ब्राह्मपर्वात देवर्षि नारद श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला सूर्याच्या उत्पत्तीची कथा सांगतात, ती पुढीलप्रमाणे :

१ अ. श्रीविष्णूने वराह अवतार धारण करून जलप्रलयातील पृथ्वीला बाहेर काढणे, ब्रह्माचे रूप धारण करून सृष्टीची रचना करणे आणि त्यासाठी ब्रह्मदेवाने स्वतःसारखे १० मानसपुत्र उत्पन्न करणे : संपूर्ण पृथ्वीवर जेव्हा जलप्रलय होतो, तेव्हा भगवान श्रीमहाविष्णु मत्स्य अवतार धारण करतो. नंतर वराह अवतार धारण करून जलमय झालेल्या सृष्टीतून पृथ्वीला बाहेर काढतो. तेव्हा महाविष्णूच्या शरिरावरील एकेक रोम ऋषींचे रूप धारण करतो आणि ते सर्व भगवंताची स्तुती करतात. श्रीमहाविष्णु ब्रह्माचे रूप धारण करून सृष्टीची रचना करतो. त्यासाठी ब्रह्मदेवाने आपल्यासारखे १० मानसपुत्र उत्पन्न केले. त्यांची नावे भृगु, अंगीरस, अत्रि, पुलस्त्य, पुलह, क्रतु, मरिचि, दक्ष, वसिष्ठ आणि नारद, अशी आहेत.

१ आ. प्रजेच्या हितासाठी सूर्यनारायणाची आवश्यकता भासणार, हे लक्षात घेऊन कश्यपऋषींनी तपोबलाने तीन लोकांच्या संयुक्त भावाने एक अंडाकृती सिद्ध करणे आणि त्यात श्रीमहाविष्णु सूर्यरूपाने प्रगट होणे : मरिचिऋषींचे पुत्र कश्यप यांचा विवाह दक्षाची कन्या अदिती हिच्यासह झाला. तेव्हा कश्यपांच्या लक्षात आले, पुढे पृथ्वीवर प्रजेची उत्पत्ती होणार आणि प्रजेच्या हितासाठी सूर्यनारायणाची आवश्यकता आहे. कश्यपऋषींनी तपोबलाने भू, भुवर् आणि स्वर्ग यांच्या संयुक्त भावाने एक अंडाकृती सिद्ध केली. त्यात श्रीमहाविष्णु सूर्यरूपाने प्रगट झाला. सूर्याच्या १ सहस्र किरणांपैकी ४०० किरण पृथ्वीवरील पावसाला, ३०० किरण हिमशिखरांवरील हिम वितळवून पाण्याचे वहन  आणि उर्वरित ३०० किरण ऊन निर्माण करतात.

१ इ. सूर्यनारायण म्हणजे साक्षात् श्रीविष्णुच  ! : सूर्यनारायण म्हणजे साक्षात् श्रीविष्णुच असल्याने क्षण, मुहूर्त, दिन, पक्ष, मास, ऋतु, अयन, संवत्सर आणि युग यांची कल्पना सूर्याविना करणे अशक्य आहे.

२. सनातनचे तीन गुरु आणि सूर्य यांचा संबंध

२ अ. सनातनच्या तीनही गुरूंच्या राशी सूर्याशी संबंधित असल्यामुळे विश्‍वातील कुठलीही शक्ती सनातनला काही करू शकणार नसणे : सनातनचे तीन गुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा जन्म सूर्यदशेत झाला आहे, असा उल्लेख सप्तर्षींनी नाडीपट्टीमध्ये अनेक वेळा केला आहे. तिन्ही गुरूंचा जन्म अनुक्रमे मकर, कन्या आणि वृषभ या राशीत झाला आहे. या तिन्ही राशी सूर्याशी संबंधित आहेत. सूर्य या तिन्ही गुरूंच्या समवेत आहे. त्यामुळे विश्‍वामध्ये कोणतीही शक्ती सनातनला काही करू शकत नाही.

२ आ. सनातन प्रभात नियतकालिकाचे चिन्ह उगवता सूर्य असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चालू केलेल्या सनातन प्रभात नियतकालिकांचे चिन्ह उगवता सूर्य हे आहे. गुरुदेव द्रष्टे असल्याने त्यांनी सूर्याची महानता ओळखूनच हे चिन्ह ठेवले असावे.

२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले प्रतिदिन सूर्याकडे पाहून त्राटक करत असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले सकाळी अंघोळ झाल्यावर तुळशीला पाणी घालतात आणि ५ मिनिटे सूर्याकडे बघून त्राटक करतात. सूर्याकडे काही सेकंद बघणेही पुष्कळ कठीण आहे. अशा वेळी वयाच्या ७८ व्या वर्षी गुरुदेवांनी सूर्याकडे पाहून त्राटक करणे, हे त्यांच्यातील देवत्वाचे दर्शन घडवते.

३. सूर्यदेवाविषयी परात्पर गुरुदेवांनी सांगितलेली सूत्रे

३ अ. देवतांच्या मूर्तींची जागा पालटता येते; मात्र सूर्याची जागा पालटू शकत नाही ! : मार्च २०२० मध्ये रामनाथी आश्रमात बांधकामाच्या दृष्टीने स्वागतकक्षापुढे होमकुंडाच्या जवळ असलेल्या देवतांचे मंदिर आणि मूर्ती हलवण्यात आल्या. ते पाहून गुरुदेव म्हणाले, आपण देवतांच्या मूर्ती हालवू शकतो; पण सूर्यादेवाला हालवू शकत नाही. प्रतिदिन सकाळी सर्वांना सूर्यदेवाचे दर्शन आहे त्या ठिकाणीच होते. येणार्‍या काळात सूर्यदेवाचे महत्त्व समाजाच्या लक्षात येईल.

३ आ. पुढील आपत्काळात सौरऊर्जेचा वापर करावा लागेल, तेव्हा सूर्याचे महत्त्व समाजाच्या लक्षात येईल ! : पुढे नैसर्गिक आपत्तींमुळे आणि युद्धामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यावर केवळ सौरऊर्जेमुळे घरोघरी वीजपुरवठा होऊ शकेल. त्या वेळी सूर्याचे महत्त्व समाजाच्या लक्षात येईल, असे गेल्या अनेक वर्षांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले सांगत आहेत.

४. प्रार्थना

हे श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव, या आपत्काळात आम्हा साधकांवर सूर्यनारायणाची कृपा राहू दे आणि सूर्यनारायणाविषयी आमच्या मनात कृतज्ञताभाव जागृत राहू दे, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.

– श्री. विनायक शानभाग, बेंगळुरू, कर्नाटक. (२०.६.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक