Amit Shah Blames Mamta Govt : बंगालमधील ममता सरकार बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी भूमी देत नाही !

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली माहिती !

  • बहुतेक घुसखोरांकडे बंगालचे आधार आणि मतदार कार्ड असल्याची माहिती  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

नवी देहली – बंगालमधील सत्ताधारी पक्षाचे गुंड बांगलादेशाची सीमा बंद करण्यात अडथळे निर्माण करत आहेत. सीमेवर तारेचे कुंपण लावण्यासाठी गेलेल्या सुरक्षादलांशी ते गैरवर्तन करत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारही या गुंडांच्या बाजूने आहे. सरकार बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी भूमीही देत नाही, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिली. २७ मार्च या दिवशी गृहमंत्री अमित शहा लोकसभेत ‘इमिग्रेशन’ आणि स्थलांतर विधेयकावर बोलत होते. हे विधेयक लोकसभेत संमत करण्यात आले. आता ते राज्यसभेत मांडले जाणार आहे. हे विधेयक संमत झाल्यानंतर घुसखोरीला आळा बसणार आहे. (स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांत घुसखोरांवर आळा न घालता येणारा कायदा नसणे, हे आतापर्यंतच्या सर्व सरकारांना लज्जास्पद होय ! – संपादक)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेली सूत्रे

१. बांगलादेशाशी असलेली आमची सीमा २ सहस्र २१६ कि.मी. आहे. यांपैकी १ सहस्र ६५३ कि.मी.वर कुंपण घालण्यात आले आहे, त्याच्या जवळ रस्ते बांधण्यात आले आहेत. कुंपणाजवळ चौक्याही बांधण्यात आल्या आहेत. उर्वरित ५६३ कि.मी.पैकी ११२ कि.मी.वर भौगोलिक परिस्थितीमुळे कुंपण घालणे व्यावहारिक नाही. या भागात नाले आणि नद्या आहेत, त्यामुळे कुंपण घालणे शक्य नाही.

२. अद्यापही ४५१ कि.मी. कुंपण घालणे का शेष आहे ? मी बंगाल सरकारला १० वेळा पत्र लिहिले आहे; पण सरकार कुंपण घालण्यासाठी भूमी देत नाही. गृह सचिवांनी बंगालच्या सचिवांसमवेत ४५१ कि.मी. कुंपणासाठी ७ बैठका घेतल्या आहेत; पण ते भूमी देत नाहीत. आम्ही जिथे कुंपण घालायला जातो, तिथे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते येऊन गोंधळ घालतात आणि धार्मिक घोषणाबाजी करतात. बंगाल सरकारमुळे ४५१ कि.मी.चे कुंपण घालता येत नाही. जर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भूमी दिली, तर ही सीमा बंद केली जाईल.

३. जेव्हा बांगलादेशी किंवा रोहिंग्या घुसखोरी करतात, तेव्हा त्यांना आधार कार्ड कोण देतो ? पकडलेल्या बहुतेक बांगलादेशींकडे बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यातील आधार कार्ड आणि मतदार कार्ड आहेत.

४. जर बंगाल सरकारने आधार कार्ड दिले नाही, तर कोणताही घुसखोर भारतात प्रवेश करू शकत नाही.

संपादकीय भूमिका

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतके मोठे सूत्र असतांना केंद्र सरकार ममता बॅनर्जी यांचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट का लागू करत नाही ?