पुणे येथे खोटे आस्थापन स्थापन करून ११० जणांची फसवणूक !

अडीच कोटी रुपयांची फसवणूक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे – घन कचरा व्यवस्थापन क्षेत्राशी संलग्न खोटे (बनावट) आस्थापन स्थापन केले. आस्थापनाने भाडेतत्त्वावर मोटार, दुचाकी, जेसीबी यंत्र अशी वाहने घेण्यात आली. या वाहनांची परस्पर विक्री करून ११० जणांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी संकेत थोरात, सोनू हिंगे, रिजवान मेमन यांना अटक केली आहे. प्रणय खरे, वृषाली रायसोनी, विजय आशर यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. आरोपींनी अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे अनुमान व्यक्त करण्यात येत आहे. ज्ञानेश शिंदे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. (गुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचा परिणाम ! अशांकडून फसवणुकीचे पैसे सव्याज वसूल करून घ्यायला हवेत ! – संपादक) आरोपींनी वानवडीतील जगताप चौक परिसरामध्ये आस्थापनाचे कार्यालय चालू केले. आरोपी सोनू हिंगे याने तक्रारदाराशी संपर्क साधला. ‘आस्थापनाला जेबीसी यंत्र भाडेतत्त्वावर हवे आहे’, असे सांगितले. तक्रारदार शिंदे यांनी ३९ लाख रुपयांचे जेसीबी यंत्र १४ डिसेंबर २०२४ या दिवशी खरेदी करून संबंधित आस्थापनाला भाडेतत्त्वावर दिले. जानेवारीमध्ये ६० सहस्र रुपये भाड्यापोटी मिळाले. शिंदे यांनी जेसीबी कुठे आहे ? अशी विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली. ते यंत्र परस्पर विकल्याचे शिंदे यांना समजले. त्यानंतर शिंदे यांनी तक्रार प्रविष्ट केली.

आरोपींनी ‘बायोफिक्स प्रा. लि. कंपनी’, ‘म्युफ्याको कंपनी’, ‘भारत इंडस्ट्रीज’ अशा आस्थापनांमध्ये वाहने भाडेतत्त्वावर लावण्याचे आमीष दाखवून जवळपास १५० गुंतवणूकदारांनी तक्रार अर्ज केले आहेत. आरोपींनी आमीष दाखवून यंत्रे खरेदी करण्यास भाग पाडले.