अध्यात्मजीवनाचा प्रवासी

१. अध्यात्मजीवनासाठी निष्ठेची आत्यंतिक आवश्यकता 

‘सद्गुरूंवर निष्ठा असल्याशिवाय अध्यात्मजीवनात प्रवेशच नाही. अध्यात्मजीवन हा आत्म्याच्या प्रकाशात चालायचा मार्ग आहे. तो मार्ग निष्ठेशिवाय गवसण्याची सुतराम शक्यता नाही. वरवर अध्यात्मजीवन जगल्यासारखे वाटत असले, तरी निष्ठेशिवाय आंतरिक रस निर्माण होणार नाही. वरवधू मंगलसूत्राने विवाहबद्ध जरूर होतात; परंतु परस्परांची परस्परांवर आंतरिक प्रीती असल्याशिवाय वैवाहिक जीवनातील मंगलरस आनंदाने चाखणे शक्य होणार नाही. आनंदरस निर्माण होण्याकरिता ‘परस्पर परस्परांचे एकमेव त्राता, संरक्षणकर्ता तथा उद्धारकर्ता आहेत’, हीच भावना दृढ असावयास हवी. तिचेच नाव ‘निष्ठा.’

२. ईश्वराकडून प्राप्त होणार्‍या निखळ प्रेमासाठी धडपडणारा खरा अध्यात्मजीवनाचा प्रवासी ! 

प्रत्येक मनुष्य प्रेमाकरता आसुसलेला असतो. व्यक्ती-अधिष्ठित प्रेम सहसा निखळ प्रेम असत नाही. त्याला कुठेतरी बोचर्‍या स्वार्थाचे कंगोरे असतात. कुणीतरी एखादा ते जाणतो आणि निखळ प्रेमाकरता धडपडतो. त्याला ही जाण असते की, निखळ प्रेम केवळ ईश्वराकडूनच प्राप्त होऊ शकते. अशा धडपडीने जो मार्गस्थ होतो, तोच खरा अध्यात्मजीवनाचा प्रवासी. तोच आसुसलेला आणि तळमळीचा साधक.’

– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)