‘एल्गार परिषदे’चे आयोजक आणि वक्ते यांच्यावर दखलपात्र गुन्हा नोंद करा ! – अजय सिंह सेंगर, अध्यक्ष, महाराष्ट्र करणी सेना

करणी सेनेचे अध्यक्ष श्री. अजयसिंह सेंगर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई – ३१ जानेवारी या दिवशी पुणे येथे झालेल्या ‘एल्गार परिषदे’च्या सभेत जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण करण्यात आले आहे. त्यामुळे आयोजक आणि अलिगढ मुस्लिम विद्यापिठाचा विद्यार्थी शरजील उस्मानी, प्रशांत कनोजिया, लेखिका अरुंधती रॉय या सर्वांची भाषणे पडताळून आयोजक अन् वक्ते यांच्यावर दखलपात्र गुन्हा नोंद करावा, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी १ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

सेंगर यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, शरजील उस्मानी यांनी भाषण करतांना ‘हिंदु धर्म सडका आहे’, असे उद्गार काढले आहेत. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. हिंदु आणि मुसलमान समाजात जातीय दंगल निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी भाषण केले, तसेच लेखिका अरुंधती रॉय, प्रशांत कनोजिया यांनी प्रक्षोभक उद्गार काढून हिंदु धर्मावर आणि देशप्रमुखावर खोटी टीका-टिप्पणी केली. हिंदु धर्माची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला.