१. आर्मी डेला भारतीय सैन्याकडून ड्रोन युद्धाचे प्रदर्शन !
१५ जानेवारी २०२१ या दिवशी भारताचा आर्मी डे साजरा झाला. त्यात भारतीय सैन्याने संचलन केले. त्यात त्याने ड्रोन युद्धाचे प्रदर्शन केले. या वेळी ७५ ड्रोन आकाशात झेपावून त्यांनी भूमीवरील शत्रूच्या विविध लक्ष्यांवर एकाच वेळी आक्रमण कसे करतात, याचे प्रात्यक्षिक केले. यातून भारताची मोठी क्षमता जगासमोर आली. ड्रोन युद्धामध्ये सध्या अमेरिका सर्वांत पुढे असून त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. चीनने अनेक देशांना ड्रोनचा पुरवठा केला आहे. जी गोष्ट चीनकडे असते, ती पाकिस्तानकडे येतच असते. अलीकडे पाकिस्तानला भारताच्या हद्दीत येऊन आतंकवाद्यांना साहाय्य करता येत नाही. त्यामुळे तो ड्रोनच्या साहाय्याने भारतात शस्त्रे पाठवतो. आकाशाची सीमा ही अतिशय मोठी असते. त्यामुळे एखाद्या ड्रोनने आत प्रवेश केला, तर त्याला थांबवणे सुरक्षारक्षकांना सहज शक्य नसते.
२. १५ जानेवारी या दिवशी आर्मी डे साजरा होण्यामागील कारण !
१५ जानेवारी या दिवशी भारतीय सैन्याधिकारी सैन्याचे सर्वांत मोठे सेनापती झाले. जनरल के. एम्. करिअप्पा हे भारताचे पहिले चिफ ऑफ आर्मी स्टाफ होते. यापूर्वी देश स्वतंत्र होऊनही अनुमाने २ वर्षांपर्यंत भारतीय सैन्याचे नेतृत्व ब्रिटीश अधिकार्याकडे होते. भारत-पाकिस्तानचे वर्ष १९४७ चे युद्ध चालू झाले, तेव्हा भारतीय सैन्याचे नेतृत्व ब्रिटीश अधिकार्याकडे होते. ते भारतीय सैन्याला आक्रमक कारवाई करण्याची अनुमती देत नव्हते. जनरल करिअप्पा किंवा भारतीय सैन्याधिकारी यांनी सैन्याचे नेतृत्व करून आक्रमक लढाई लढली. भारतीय सैन्य मुझ्झफराबादपर्यंत पोचले होते. आपण काश्मीरला भारतात आणलेच; पण भारताच्या नेतृत्वाने सैन्याला पुढे जाण्याची संधी दिली असती, तर पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट, बाल्टिस्तानही भारताच्या कह्यात आले असते. हे आर्मी डेचे महत्त्व आहे. या दिवशी शौर्य पुरस्कार प्रदान केले जातात. या दिवशी भारताने आधुनिक शस्त्रे आणि ड्रोन युद्धाचे प्रात्यक्षिक करून आम्ही चीनपेक्षा न्यून नाही, हे जगाला दाखवून दिले.
३. अझरबैजानने ड्रोनच्या साहाय्याने आर्मेनियावर विजय संपादन करणे
आर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमधील लढाई नुकतीच झाली. त्यात ड्रोनचे कौशल्य दिसून आले. आर्मेनियाकडे रणगाडे, तोफा, आधुनिक शस्त्रे होती, तसेच रशियाच्या वायूदलाचाही त्यांना पाठिंबा होता. एवढे असतांनाही अझरबैजानने आर्मेनियावर स्वार्म ड्रोनच्या साहाय्याने आक्रमण केले. स्वार्म ड्रोन, म्हणजे एकाच वेळी ५०, १०० किंवा २०० ड्रोन अचानक आक्रमण करून विविध लक्ष्यांचा भेद करतात. या लढाईत ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अझरबैजानने आर्मेनियावर विजय संपादन केला. या विजयामागील महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेली ड्रोन युद्ध करण्याची क्षमता ! जेव्हा अशा प्रकारचे नवीन संशोधन किंवा शस्त्रे जगाकडे येतात, तेव्हा ते भारताकडेही असले पाहिजे आणि त्यांचा वापर केला पाहिजे. आर्मी डेच्या दिवशी भारतीय सैन्याने नेमके तेच केले. त्या दिवशी त्यांनी भारत ड्रोन्सचा वापर कशा प्रकारे करू शकतो, याचे प्रात्यक्षिकच जगाला दाखवले.
४. लढाऊ विमानापेक्षा ड्रोनचा वापर करणे सोयीस्कर !
ड्रोन हे वेगवेगळ्या क्षमतेचे असतात. ड्रोनची आकाशात रहाण्याची क्षमता ७ – ८ घंटे असते. एक ड्रोन १०० ते ४०० किलो किंवा २ टन वजनाची शस्त्रे वाहून नेऊ शकते. त्याची रेंज २०० किलोमीटरपासून ४०० ते ५०० किलोमीटरपर्यंत असू शकते. ड्रोनच्या किंमती लढाऊ विमानांच्या तुलनेत अतिशय अल्प असतात. उदा. एका राफेलची किंमत १ सहस्र ५०० कोटी ते १ सहस्र ६०० कोटी इतकी आहे. एका तेजस विमानाची किंमत ५०० ते ६०० कोटी रुपये आहे. याउलट सर्वांत आधुनिक ड्रोनची किंमत ५ किंवा ६ कोटींहून अल्प असते. लढाऊ विमान पडले, तर पायलटचा जीव जाऊ शकतो किंवा शत्रू त्याला कैदी बनवू शकतो; पण ड्रोनचे तसे नसते. ते पडले, तरी मोठी हानी होत नाही.
५. शस्त्रनिर्मितीमध्ये असलेली भारताची प्रगतीपथावरील घौडदौड !
यापूर्वी भारत एखाद्या शस्त्रावर संशोधन करून ते यशस्वीपणे सैन्यात समाविष्ट करेपर्यंत २५ ते ३० वर्षे निघून जायची. भारतीय बनावटीच्या तेजस लढाऊ विमानाला २५ ते ३० वर्षे लागली. अर्जुन रणगाडा सिद्ध करायला भारताला ५० वर्षे लागली. अरिहंत नावाची पाणबुडी किंवा सबमरिन बनवणे हे तर ३० ते ३५ वर्षांपासून चालू आहे. जग नवीन संशोधनाकडे वळायचे, तेव्हा आपण आणलेले शस्त्र पूर्णत: जुने झालेले असायचे. त्यामुळे ज्या गतीने भारताने ड्रोन आणले, ते प्रशंसनीय आहे. भारताने मागील ५ – ६ मासांमध्ये क्षेपणास्त्रांच्या ४० ते ५० चाचण्या केल्या आहेत. विविध प्रकारची क्षेपणास्त्रे असतात. त्यामुळे त्यांच्यात विविध परिस्थितीत कार्य करण्यासाठी पालट होत आहेत आणि त्यानंतर त्यांच्या चाचण्याही घेण्यात येत आहेत. ही गतीही पुष्कळ वाढलेली आहे.
६. ड्रोनमध्ये विविध प्रकारच्या कारवाया करण्याची क्षमता असणे
६ अ. आत्मघातकी बॉम्बर म्हणून काम करणारे ड्रोन ! : हे ड्रोन भारताने एका खासगी आस्थापनाच्या साहाय्याने विकसित केले आहेत. याला कामिकाझे प्रात्यक्षिक म्हटले जाते. कामिकाझे हे सर्वप्रथम जपानने चालू केले होते. जपानचे पायलट लढाऊ विमानात बसून त्याची अमेरिकेच्या लढाऊ जहाजाला धडक देऊन ते उद्ध्वस्त करत असे. या आत्मघाती कृतीमुळे कामिकाझे शब्दाचा उपयोग करणे चालू झाले. ड्रोनही एक आत्मघातकी बॉम्बर म्हणून काम करू शकतो. ही कार्यक्षमता भारताने त्या दिवशी दाखवली. ड्रोन आतंकवादी पॅड, लॉन्चपॅड, शत्रूंचे हेलिपॅड, इंधनाचे साठे, रणगाडे, चिलखती वाहने आदींना लक्ष्य करून त्यांना नष्ट करू शकते.
६ आ. ड्रोनच्या माध्यमातून विविध प्रकारचे साहाय्य पुरवले जाणे : ड्रोनमध्ये २-३ प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे मानवजातीची हानी टळते. हे ड्रोन सैन्याला अतिशय कठीण परिस्थितीत विशेषत: अतीउंच पर्वतीय भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करू शकते. ते प्रत्येकी ६०० किलोची रसद पोचवू शकते. अतिशय थंड हवामानामध्ये बर्फ पडत असतांना जेव्हा खेचर, उंट किंवा स्वत: सैनिक किंवा हेलिकॉप्टर हेही सैन्याला साहित्य पोचवू शकत नाही, तेव्हा ड्रोन्सचा वापर उपयुक्त ठरतो. ही क्षमता भारताने संपादन केली आहे.
६ इ. आक्रमणांमध्ये तरबेज असणे : मदर ड्रोन, म्हणजे एका मोठ्या ड्रोनमधून अन्य ४ – ५ ड्रोन्स बाहेर पडतात आणि विविध लक्ष्यांना नष्ट करतात. त्यांच्याकडे स्वत:चे रडार, छायाचित्रक, शस्त्रे असतात. हे ड्रोन हवेत गुपचूप उडत असतात आणि योग्य लक्ष्य दिसले की, त्याला पकडतात. ज्याप्रमाणे बहिरी ससाणा हा पक्षी हवेत उडतो. त्याला भूमीवर चांगले भक्ष्य मिळाले, तर तो अचानक त्याला पकडतो आणि उडून जातो. अगदी अशाच प्रकारच्या कारवाया हे भारतीय ड्रोन्स करू शकतात. एवढेच नाही, तर एका लक्ष्यावर आक्रमण करून त्याला नष्ट केल्यावर त्याच वेळी दुसरे लक्ष्य समोर आले, तर तत्क्षणीच त्यावरही आक्रमण करू शकतात.
७. नौदल आणि वायूदल यांच्याकडून होणारा ड्रोनचा उपयोग
७ अ. या ड्रोनचा उपयोग सैन्यामध्ये होईलच; पण अन्य ठिकाणीही त्यांचा उपयोग होऊ शकतो. अनेक दुर्गम ठिकाणी गस्त घालणे अशक्य असते. त्या ठिकाणी ड्रोनचा वापर करता येऊ शकतो. भारताचा समुद्रकिनारा ७ सहस्र ६०० किलोमीटरचा आहे. तेथेही ड्रोनचा उपयोग होतो. बोटी आणि जहाजे यांच्याद्वारे समुद्री सीमांची गस्त घालण्यात येते. हे काम स्वस्त ड्रोन्सच्या साहाय्याने केले, तर व्यय वाचतो. वायूदलामध्येही याचा उपयोग होण्याची शक्यता आहे; मात्र त्याविषयी संशोधन चालू आहे.
७ आ. युद्ध चालू असतांना शत्रूच्या बंदरावरील विमानरोधक यंत्रणा किंवा रडार यांना प्रथम नष्ट करावे लागते. अन्यथा त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. अशा वेळी ड्रोनचा वापर करून शत्रूची एअर डिफेन्स सिस्टीम, टेहळणी यंत्रणा, कमांड कंट्रोल सिस्टीम प्रथम नष्ट करावी लागते. यावर संशोधन चालू झाले आहे.
७ इ. भारताकडे असलेल्या जग्वार लढाऊ विमानाच्या आतमध्ये २४ लहान ड्रोन ठेवण्यात येणार आहेत. त्यांना हवेत सोडल्यावर ते शत्रूंच्या विविध ठिकाणांवर आक्रमण करतील. यासाठी भारतीय वायूदल हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.चे साहाय्य घेत आहे. आयआयटीच्या पदवीधर विद्यार्थ्यांनी स्टार्टअप आस्थापन सिद्ध केले आहे, याविषयी त्यांच्याकडून उत्पादन करणे चालू आहे. आयआयटीचे पदवीधर जगात बुद्धीमान समजले जातात. त्यांचे स्टार्टअप देशासाठी काम करत असेल, तर ते देशासाठी अतिशय चांगले आहे.
८. भारताने अल्प काळात ड्रोन युद्धाची क्षमता निर्माण करणे कौतुकास्पद !
भारतीय नौदल तटरक्षणासाठी ड्रोनचा वापर करत आहे. भारताच्या अंदमान-निकोबार, लक्षद्वीप यांसारख्या बेटांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर चालू झाला आहे. कदाचित् भारताची ड्रोनची मागणी ही पुष्कळ मोठी आहे. ही मागणी पूर्ण होण्यासाठी नक्कीच कालावधी लागेल; पण हा प्रवास चालू झाला आहे. भारताची ड्रोन युद्ध करण्याची कार्यक्षमता पुष्कळ आहे. आर्मी डेच्या दिवशी जे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, त्यातून भारताची सुरक्षितता अधिक सबळ होत असल्याचे दिसून आले. एवढ्या अल्प काळात अशा प्रकारची क्षमता निर्माण केल्याविषयी सर्वांचे अभिनंदनच केले पाहिजे.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे