काश्मीर पुन्हा भारतात आणण्याच्या उद्देशाने मार्गक्रमण करणारी ‘पनून कश्मीर’आणि तिचा उद्देश

२८ डिसेंबर २०२० या दिवशी ‘काश्मिरी हिंदूंचा ‘होमलॅण्ड डे’ आहे. यानिमित्ताने…

एकेकाळी विश्‍वगुरु म्हणवून घेणार्‍या भारताचे मूळ निवासी आज भारतातच असुरक्षित आहेत. अनेक ठिकाणी हिंदूंची संख्या सातत्याने घटत आहे आणि तेथे हिंदू अल्पसंख्यांक होण्याच्या मार्गावर आहेत. आज भारतात अनेक ठिकाणी जिहादी आतंकवादापासून वाचण्यासाठी हिंदू स्थलांतर करत आहेत. भारतात सर्वप्रथम काश्मिरी पंडितांना जिहादी आतंकवादाला तोंड द्यावे लागले. वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांच्या अत्याचारांपासून वाचण्यासाठी तेथील साडेचार लक्ष हिंदू निर्वासित झाले. आज तेच सगळे हिंदू ‘पनून कश्मीर’ संघटनेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये पुन्हा त्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहेत. याच ‘पनून कश्मीर’ची युवा शाखा ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे महाराष्ट्र प्रमुख श्री. राहुल कौल यांनी ‘पनून कश्मीर’ संघटनेची स्थापना, तिचा उद्देश आणि तिचे कार्य यांविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.

पनून काश्मीरचा नकाशा

१. ‘संपूर्ण काश्मीर पुन्हा भारतात आणणे’, हाच मूलमंत्र ठेवून ‘पनून कश्मीर’चा जन्म झाला असणे

काश्मिरातून आमचे (काश्मिरी हिंदूंचे) ७ वे पलायन आहे. मागील ७०० वर्षांत ७ वेळा पलायन झाले, म्हणजे सरासरी प्रत्येकी १०० वर्षांतून एकदा आम्हाला काश्मीरमधून पलायन करावे लागले. एकजण म्हणतो की, मला पाकिस्तान हवे, तर दुसरा म्हणतो की, मला स्वातंत्र्य हवे. तिसरा म्हणतो की, आम्हाला स्वनिर्णयाचा अधिकार हवा. तेथे कुणीही ‘मला भारत हवा’, असे म्हणत नाही. हेच ‘पनून कश्मीर’च्या जन्माचे मूळ कारण आहे. पनून कश्मीरचे हे एकच ध्येय आहे की, भारतात काश्मीर पुन्हा आणणे. हाच मूलमंत्र ठेवून ‘पनून कश्मीर’चा जन्म झाला.

२. ‘काश्मीर आमचेच आहे’, असे काश्मिरी हिंदूंचे म्हणणे असणे

जर काश्मिरी हिंदूंना आपल्या भूमीकडे परत जायचे असेल, तर ते आपल्या अटींवर तेथे जातील. त्याने तेथील सहजीवनाला नाकारले आहे. आम्ही तर काहीच केलेले नाही; पण स्वीकारले आहे की, आम्ही आमच्या अटींवर तेथे जाऊ. दुसरे म्हणतात की, आम्हाला काश्मीरचा एक कोपरा हवा. असे असेल, तर राहिलेल्या काश्मीरचे काय ? तेही काश्मीर आमचेच आहे. एखादे घर तुमचे स्वतःचे आहे. त्या घरातील शयनकक्षात तुम्ही झोपता. एका कोपर्‍यात तुम्ही अभ्यास करता; पण तो कोपरा तर तुमचाच आहे. आम्हीही असेच म्हणतो की, पूर्ण काश्मीर आमचेच आहे आणि ते अखंड भारताचे आहे; पण तुम्ही आम्हाला असा एक कोपरा तरी द्या की, निदान तेथून आम्हाला कुणी बाहेर काढणार नाही; म्हणून आम्ही पनून कश्मीरची संकल्पना मांडत आहोत आणि आम्हाला त्यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य हवे आहे.

३. काश्मिरी हिंदू काश्मीरमध्ये का जाऊ इच्छित नाहीत ?

अधूनमधून काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या संदर्भात चर्चा होते. काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी काही प्रस्ताव ठेवले होते. ते काश्मिरी हिंदूंना स्वयंपूर्ण करण्याच्या गोष्टी बोलतात. गिलानी यांनीही काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी काही प्रस्ताव मांडले आहेत. असे असूनही काश्मिरी हिंदू काश्मीरमध्ये जाऊ इच्छित नाहीत. इंग्रजीतील एका म्हणीनुसार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही जर हे नाणे पाहिले, तर ओमर अब्दुल्ला यांच्या आधी त्यांचे वडील फारूख अब्दुल्ला आणि त्यांच्या पूर्वी शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री होते.

४. काश्मीरमध्ये मुसलमान बहुसंख्य असल्याने तेथे इस्लामी चळवळ चालवली जाणे

वर्ष १९३१ मध्ये जेव्हा मुस्लिम लीगचा जन्म झाला, तेव्हाच काश्मीरमध्ये पहिल्यांदा बहुसंख्यत्वाचे बीज रोवले गेले. त्यापूर्वी टोळीवाले होते. ते लढाऊ आणि बाहेरचे होते. त्यांनी काश्मीरची लूट केली. लोकांचे धर्मांतर केले आणि नियोजनबद्ध पद्धतीने काश्मीरमध्ये इस्लामी चळवळ चालवली.

५. मुसलमानांचेच शासन असल्याने हिंदूंना परांगदा व्हावे लागणे

जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली, तेव्हा शेख अब्दुल्ला यांनी म्हटले की, तुम्ही कुठवर यांच्या मागे जात रहाल ? तुम्ही असे काहीतरी करा की, हेच लोक तुमच्या मागे येतील. ओमर अब्दुल्ला यांनीही असेच केले. ‘जे.के.एल्.एफ्.’ची निर्मिती होण्यामागे ओमर अब्दुल्ला आणि शेख अब्दुल्ला यांचा हात आहे. आज ओमर अब्दुल्ला म्हणतात की, काश्मीरमधील हिंदूंनी येथे परत आले पाहिजे; पण कळीचे सूत्र हे आहे की, जेव्हा काश्मीरमधून हिंदु बाहेर पडला, तेव्हा त्याच्या बाहेर पडण्याचे कारण काय होते ? तेथे भूकंप झाला कि सुनामी आली ? तेथील वातावरणात असा काय पालट झाला की, ज्यामुळे ४ लक्ष हिंदूंना काश्मीरमधून निर्वासित व्हावे लागले ? काश्मीरमधून हिंदू बाहेर पडला, तो त्याच्या धर्मामुळे !

६. काश्मिरी हिंदू निर्वासित होण्याचे कारण

काश्मिरी हिंदूंना तेथून निर्वासित होण्यामागे काय कारण होते, हे विचारात का घेतले जात नाही ? निर्वासित होण्याचे मूळ कारण हेच होते की, काश्मिरी हिंदु त्या धर्माचा (इस्लाम) नव्हता, ज्या धर्माचे तेथे प्राबल्य होते.

७. इस्लामची जागतिक लाट येणे

हिंदूंना त्यांच्या धर्मामुळे काश्मीरमधून पलायन करावे लागले; कारण काश्मीरमध्ये ‘निजाम-ए-मुस्तफा’ची लाट आली होती. ही इस्लामची जागतिक लाट आहे; कारण येथून पश्‍चिम-उत्तर आघाडी निघते. येथून रशियाही तुमच्यासाठी खुला आहे. जोपर्यंत ही इस्लामी लाट ओसरत नाही, तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकणार नाही. माझ्या म्हणण्याचा हा अर्थ आहे की, ओमर अब्दुल्ला आणि गिलानी जे बोलतात, त्यामागे ‘आम्ही तेथे पर्यटकांप्रमाणे येऊन रहावे’, हा अर्थ असतो, म्हणजे पुढे आमच्या सोयीनुसार त्यांना आम्हाला तेथून काढता येईल.

८. काश्मिरी हिंदूंची त्रिसूत्री मागणी

जर आम्ही या वेळी परत गेलो, तर त्यासाठी आमची सर्वप्रथम ३ सूत्रे असतील. एक म्हणजे काश्मीरमधून हिंदूंचे सतत पलायन का होत आहे ? दुसरे म्हणजे आम्ही आलो, तर आम्ही आमच्या भूमीच्या आकांक्षेसह येऊ आणि तिसरे म्हणजे काश्मीर हे केंद्रशासित राज्य बनवले जावे. जोपर्यंत हे राज्य सुरक्षित होत नाही, ते चालवण्याची इच्छाशक्ती निर्माण होत नाही, तोपर्यंत ते केंद्रानेच चालवावे.