८८.६९ टक्के मुले, तर ९२.४२ टक्के मुली उत्तीर्ण
पणजी, २७ मार्च (वार्ता.) – गोवा शालांत आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल ९०.६४ टक्के लागला आहे. यामध्ये ८८.६९ टक्के मुले, तर ९२.४२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. कला शाखेचा ९१.०३ टक्के, वाणिज्य शाखेचा ९३.३१ टक्के, विज्ञान शाखेचा ९१.३२ टक्के आणि व्यावसायिक शाखेचा निकाल ८२.७१ टक्के लागला आहे. एकूण १७ सहस्र विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १६ सहस्र ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी माहिती गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी २७ मार्च या दिवशी दिली. मंडळाने २७ मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता एका पत्रकार परिषदेत हा निकाल घोषित केला. पत्रकार परिषदेत मंडळाचे सचिव विद्यादत्त नाईक, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे उपसचिव भारत चोपडे यांचीही उपस्थिती होती. ही परीक्षा एकूण २० केंद्रांवर घेण्यात आली होती. तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. पेडणे ९१.२४ टक्के, बार्देश ९४.९८ टक्के, डिचोली ८९.६८ टक्के, सत्तरी ८१.२२ टक्के, तिसवाडी ९४.१४ टक्के, मुरगाव ९०.३६ टक्के, फोंडा ८५.१८ टक्के, धारबांदोडा ८२.१४ टक्के, केपे ८७.८३ टक्के, सासष्टी ९१.६६ टक्के, सांगे ९५.९२ टक्के आणि काणकोण ८८.३९ टक्के.