
मुंबई, २७ मार्च (वार्ता.) – ब्रिटिशकाळातील काही विशिष्ट इमारतींमुळे मुंबईची वेगळी ओळख आहे. जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात वैशिष्ट्यपूर्ण आयकॉनिक (विशेष ओळख दर्शवणे) इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यशासनाने नवीन धोरण सिद्ध केले आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. ‘मुंबईच्या सौंदर्यीकरणामध्ये भर घालतांना पर्यटनाला चालना मिळेल, त्याचसमवेत मुंबईची विशिष्ट ओळख निर्माण होण्यास साहाय्य होणार आहे’, असेही त्यांनी सांगितले.
निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जगातील विविध शहरांना त्यातील विशिष्ट प्रकारची नगररचना पद्धती, परिसर, विशिष्ट इमारती यामुळे वेगळी ओळख निर्माण झाल्याचे दिसून येते. मुंबई शहरातही ब्रिटीशांच्या काळातील काही विशिष्ट इमारती असल्याने मुंबईची एक वेगळी ओळख आहे. मुंबई हे एक जागतिक दर्जाचे शहर असून आपल्या देशाला वास्तुकलेचा फार मोठा वारसा आहे. तो जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई शहरात अशा वैशिष्टयपूर्ण आयकॉनिक इमारती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून शहराच्या सौंदर्यीकरण आणि पर्यटन क्षमता वृद्धींगत होण्यास हातभार लागेल आणि त्यामुळे मुंबई शहराची एक विशिष्ट ओळख निर्माण होईल.