धर्मशिक्षण आणि क्षात्रतेज या दोन्ही गोष्टी एकसमान आवश्यक !

सध्या धार्मिक हिंदू आणि राजकीय हिंदू अशी एक विभागणी झालेली दिसते. यातील ‘धार्मिक हिंदू हे धर्मरक्षणासाठी कसे निरुपयोगी आहेत’, असेही एक ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) दिसते. ‘Those who play by the book in masses; win’, (जे मोठ्या प्रमाणात नियमांनुसार खेळतात, ते जिंकतात) हे कायम लक्षात ठेवा. माझे कित्येक पंथविशेषातील रुग्ण त्यांच्या आरोग्याला हानिकारक ठरत असूनही कट्टरपणे महिनाभर दिवसभराचे उपवास करतात. हे योग्य कि अयोग्य ? यामध्ये न जाता यामागची कट्टरता लक्षात घ्या. या कट्टरतेमुळेच रस्त्यावर झुंडी जिंकतात. ही मानसिकता त्यांच्या पंथशिक्षण किंवा त्याच्या पालनाविना होते का ? दुसरीकडे धर्मशिक्षण आणि इतिहास या दोन्हींचे ध्यान, भान नसलेला अन् अस्तित्वच हरवत चाललेला हिंदू समाज मात्र धार्मिक कि राजकीय या वादात अडकत असतो.

१. हिंदू म्हणून अस्तित्व जपण्यासाठी मूलभूत धार्मिक शिक्षण आवश्यक !

आद्यशंकराचार्य ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी ज्यांनी म्हणून धर्मरक्षण केले, ते स्वतः अत्यंत धार्मिक हिंदू होते याचे खंडीभर पुरावे मिळतील.

वैद्य परीक्षित शेवडे

समर्थ म्हणतात,

‘मुख्य हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकारण ।
तिसरें तें सावधपण । सर्वविषईं ।।’
– दासबोध, दशक ११, समास ५, ओवी ४

(अर्थ : ‘लोकसंग्रह करणार्‍याच्या अंगी कोणती लक्षणे हवीत ?’, हे सांगतांना समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘त्याला उत्तम प्रकारे हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण करता आले पाहिजे. दुसरे म्हणजे त्याच्या अंगी मुत्सद्दीपणा हवा आणि तिसरे म्हणजे सर्वच गोष्टींत सावधपणा हवा.)

समर्थांची धर्मरक्षणातील भूमिका राजकीय हिंदुत्वाचा कैवार घेणार्‍यांनाही मान्य असेल, अशी माफक अपेक्षा ! मुळात राजकीय हिंदू यातील केवळ ‘राजकीय’ हाच शब्द शिल्लक रहावा, अशी काहींची धडपड चालू आहे का ? इतपत शंका यावी, अशी ही मते असतात; कारण हिंदू म्हणून तुमचे अस्तित्व असण्यासाठी जे काही मूलभूत धार्मिक शिक्षण आवश्यक आहे, तेच नसेल, तर तुम्ही आज ना उद्या ओळखीच्या संकटामध्ये जाणारच आहात.

‘मीरी – पीरी’

२. राजकीय आणि धार्मिक या दोन्ही बाजू तितक्याच महत्त्वाच्या !

मग काय करावे ? मला व्यक्तीशः याविषयी शीख बांधवांतील ‘मीरी – पीरी’ ही संकल्पना आचरणीय वाटते. गुरु हरगोविंदसिंगजी महाराज यांनी गुरूंनी दोन तलवारी जवळ बाळगण्याची प्रथा चालू केली. यातील एक ‘मीरी’, म्हणजेच राजसत्तेचे वर्चस्व प्रतीक, तर ‘पीरी’ हे धर्मसत्तेच्या वर्चस्वाचे प्रतीक म्हणून असे. थोडक्यात राजकीय आणि धार्मिक या दोन्ही बाजू तितक्याच महत्त्वाच्या आहेत. धार्मिक हिंदूंना न्यून लेखून चालणार नाही; उलट तेच पायाभरणी आहेत.

३. धर्मशिक्षण आणि क्षात्रतेज या दोन्ही गोष्टी एकसमान हव्यात !

आवश्यकता आहे ती सजगता आणि कृतीप्रवणता निर्माण करण्याची. प्रत्यक्षात रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीच, तर इतर कुणीतरी आम्हाला वाचवेल, या गैरसमजातून बाहेर यावे लागेल. यासाठीही पुन्हा एकदा समर्थच आदर्श आहेत.

रामाचे दास हे मंदिरे कुणाची उभारतात ? रामाची ? छे… हनुमंताची ! केवळ मंदिरे नाहीत, तर त्यासह बलोपासनेचा आग्रहही.

एकीकडे ‘साधकासी सूचना । उपासना उपासना ।’, असे सांगणारे समर्थ दुसरीकडे,

‘गनिमाच्या देखतां फौजा । रणशूरांच्या फुर्फुरिती भुजा ।
ऐसा पाहिजे किं राजा । कैपक्षी परमार्थी ॥’
– दासबोध, दशक १९, समास ९, ओवी २५

(अर्थ : शत्रूच्या फौजा पहाताच ज्याचे बाहु लढण्यासाठी स्फुरण पावतात असा पराक्रमी राजा असावा. त्याने कायम प्रजेचे हित पहावे आणि रक्षण करावे’, असेही म्हणतात !)

धर्मशिक्षण आणि क्षात्रतेज

त्यामुळेच धर्मशिक्षण आणि क्षात्रतेज या दोन्ही गोष्टी एकसमान आवश्यक आहेत. केवळ राजकीय हिंदूंनी काही धार्मिकता, तर केवळ धार्मिक हिंदूंनी काही राजकीयता अंगी मुरवण्याची आवश्यकता आहे.

सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।।
– दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६

(अर्थ : प्रत्येकामध्ये फार मोठी चळवळ करण्याचे सामर्थ्य असते. काही जण त्या दृष्टीने प्रयत्न करतातही; परंतु ते प्रयत्न यशस्वी होण्यासाठी त्या प्रयत्नांना भगवंताचे अधिष्ठान असणे अत्यंत आवश्यक आहे.)

जय जय रघुवीर समर्थ ।

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (२४.३.२०२५)

संपादकीय भूमिका

राजकीय हिंदूंनी धार्मिकता आणि धार्मिक हिंदूंनी राजकीयता काही प्रमाणात अंगी मुरवणे आवश्यक !