प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प्रश्न : लाभानां उत्तमं किं स्यात् ?
अर्थ : सगळ्यात उत्तम लाभ कोणता ?
उत्तर : आरोग्यम् ।
अर्थ : आरोग्य उत्तम असणे, हाच सगळ्यात चांगला लाभ आहे.
१. धर्माविषयी आक्षेप घेणारे आधुनिकतावादी अधिक बुरसटलेले !
मनु, महर्षि व्यास, श्रीमद्शंकराचार्य आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना मी प्रमाण मानतो; म्हणून मी परंपरावादी आणि बुरसटलेला ! ५-६ सहस्र वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या चार्वाकाला जसेच्या तसे प्रमाण मानतात, ते मात्र सुधारक, क्रांतीकारक आणि नवीन विचारांचे स्वागत करणारे असतात. या आधुनिकांनी धर्म किंवा संस्कृती यांच्या विरोधात घेतलेला एकही आक्षेप नवा नाही. हे घेत असलेले सर्व आक्षेप मुळात चार्वाकांनी धर्माच्या विरोधात घेतलेले आहेत, तेही ते वेदप्रामाण्य मानत नाहीत. ते आत्म्याचे अस्तित्व स्वीकारत नाहीत, ईश्वर नाकारतात, पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाहीत. ‘खावे, प्यावे आणि सुख भोगावे’ (‘यावत् जीवेत् सुखं जीवेत् ।’, म्हणजे ‘जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत सुखाने जगावे.’), हाच जीवनाचा आदर्श आहे’, असे तोही सांगतो. तेव्हा नवीन आक्षेपकही परंपरावादीच आहेत. महर्षि व्यास आणि संत ज्ञानदेव यांच्या परंपरांचा मी आदर करतो, तर हे चार्वाकाची परंपरा उचलून धरतात, तेव्हा ‘परंपरेला मान देणारा माझ्यासारखा माणूस बुरसटलेला, तर हे त्याहूनही अधिक बुरसटलेले आहेत’, असे मी का म्हणू नये ?
२. ईश्वराने निर्माण केलेल्या शरिराच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे !
आरोग्य इंद्रियातीत असल्यामुळेच स्वतःच्या आरोग्य रक्षणाकडे दुर्लक्ष होते. रोगांनी पीडित झाल्याविना ‘आरोग्याच्या रक्षणाकरता कुणी प्रयत्नशील आहे’, असे दिसत नाही. ‘आहे ते आरोग्य टिकवून ठेवले पाहिजे. आपण कधी रोगी होता कामा नये’, अशी दक्षता घेतांना सहसा कुणी दिसत नाही. रोग झाल्यानंतर धावपळ करता, यात काय विशेष आहे ? ‘रोग होऊ नये’, यासाठी सावधता बाळगली पाहिजे. त्या दृष्टीने ‘आहार-विहार नियंत्रित केले पाहिजेत’, याची जाणीव कितपत रहाते ? आरोग्य हाच उत्तम लाभ आहे, हे कळते; कारण ते अमान्य करण्याची सोय नसते. हे सर्व कळलेले वळत मात्र नाही.
शरीर ईश्वराने निर्माण केले आहे. ‘त्याची रचना आणि त्यात घडणार्या क्रिया या ईश्वराने (पाहिजे तर निसर्गाने म्हणा) कशा असाव्यात’, हे योजनापूर्वक ठरवले आहे अन् ‘सर्व परिस्थितीत त्यांची कार्यक्षमता दीर्घकालपर्यंत टिकून राहील’, अशी व्यवस्था ठेवली आहे.
३. मनुष्य आरोग्याचे बहुतेक नियम सुखलोलुपतेने मोडतो आणि स्वतःच्या शरिराची परीक्षा घेतो !
माणसाने निर्माण केलेल्या यंत्रामधील एखादा खिळा निसटला किंवा एखादा पेच ढिला झाला, तर यंत्राची कार्यक्षमता उणावते, एवढेच नव्हे, तर यंत्र बंद पडते. भूमीची समतलता थोडीशी बिघडली, तरी यंत्र काम करण्याचे थांबते; पण मानवी शरीर असे बळकट यंत्र आहे की, अनेक प्रकारची अपथ्ये ते दीर्घकालपर्यंत पचवते आणि स्वतःची कार्यक्षमता अधिकाधिक टिकवून ठेवते. ईश्वर उदार, क्षमाशील आणि कुशल असल्यामुळे त्याने हे सुदृढ यंत्र आपल्या स्वाधीन केले आहे. त्याचाच लाभ घेऊन आपण आरोग्याचे बहुतेक नियम सुखलोलुपतेने मोडतो आणि वर उन्मत्तपणे विचारतो, ‘एवढ्याने काय होते ? आम्ही कित्येक दिवस असेच वागतो आहोत, आमचे काय बिघडले ?’ ईश्वर दयाळू आणि क्षमाशील असल्यामुळे त्याने अधिकाधिक अपराध सहन करण्याची शक्ती शरिरात ठेवली आहे. झालेली हानी भरून काढून पुन्हा कार्यक्षम होण्याचे सामर्थ्य शरिराला दिले आहे. शरिराच्या या वैशिष्ट्याचा लाभ करून न घेता माणूस जणू त्याच्या सामर्थ्याची परीक्षा पहात असतो. ‘तू कसा बिघडत नाहीस, तेच पहातो’, अशी जणू प्रतिज्ञा करून माणसे वागत असतात.
कारण कळले, तर ‘जे योग्य त्याप्रमाणे वागतात’, असे खरोखरीच घडते का ? ‘धूम्रपान आरोग्याला घातक आहे, हे आता कुणाला ठाऊक नाही’, अशी स्थिती आहे का ? हा नियम त्या डबीवरच लिहिलेला असतो. ज्या वयात धूम्रपानाची कल्पनाही आम्ही करू शकत नव्हतो, त्या कोवळ्या तरुण वयात आधुनिकता मिरवण्यासाठी धूम्रपान वाढू लागले आहे.
४. आयुष्यभर केवळ सदाचरणानेच वागणारा मनुष्य आरोग्यसंपन्न रहातो !
उत्तम आरोग्य मिळवून देणार्या या ‘रसायनचिकित्सा’ प्रकरणाचा उपसंहार करतांना आयुर्वेदाने म्हटले आहे की,
सत्यवदिनमक्रोधमध्यात्मप्रवणेन्द्रियम् ।
शान्तं सदवृत्तनिरतं विद्यान्नित्यरसायनम् ।।
– अष्टाङ्गहृदय, उत्तरस्थान, अध्याय ३९, श्लोक १७९
अर्थ : सत्यवादी, क्रोधरहित, अध्यात्मनिष्ठ, इंद्रियांना वश करणारा, शांत, सदाचरणी आणि विद्वत्तेने आत्मनियंत्रण करणारा मनुष्य हा अमृतस्वरूप (रसायन) आहे.
जो नेहमी खरे बोलतो, कधी संतापत नाही, विषयांचा उपभोग घेतांना ज्याची इंद्रिये आत्मलाभाच्या दृष्टीने संयमाने रहातात, जो कोणत्याही परिस्थितीत प्रक्षुब्ध न होता शांत, प्रसन्न रहातो आणि आयुष्यभर केवळ सदाचरणानेच वागतो, तो मनुष्य ‘नित्य रसायनचिकित्सा घेणारा आहे’, असे समजावे. अर्थात् ‘सत्यवादित्वादी गुणांनी युक्त’, असे जीवन जगणारा मनुष्य रसायनचिकित्सा घेतलेल्या माणसाप्रमाणे प्रत्यक्षपणे त्यात सांगितलेल्या उपचारावाचूनही तसाच आरोग्यसंपन्न, स्वस्थ आणि कार्यक्षम रहातो.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)